‘कोळी महिलांची अवहेलना करणाऱ्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई करा’

    दिनांक  14-May-2020 16:49:01
|


tandel_1  H x W


मुंबई : सातपाटी बंदरात उपरे, शिंपले गोळा करणाऱ्या कोळी महिलांना उठाबशा काढायला लावून त्यांची अवहेलना करणाऱ्या पालघर पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मच्छीमार नेते, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.कोळी महिलांना शिक्षा देणाऱ्या पोलिसांचा व मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांचा तिव्र शब्दात निषेध करित मच्छीमार नेते दामोदर तांडेल म्हणाले की
, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीत मासेमारीला बंदी घातली नव्हती. तसे पत्र मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी कोकणातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. त्याप्रमाणे आयुक्तांनी ते पत्र सर्व पोलीस अधीक्षकांना पाठवायला पाहिजे होते. मात्र ते त्यांनी पाठविले नाही. त्यामुळेच पोलीस अधीक्षक जीतेंद्र पाटील यांच्या सूचनेनुसार कर्तव्यावरील पोलिसांनी कोळी महिलांना उठाबशा काढायला लावून त्यांची अवहेलना केली.सातपाटी बंदरात उपरे
, शिंपले गोळा करणाऱ्या कष्टकरी कोळी महिलांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळले होते. त्या काही समुद्रावर फिरायला गेल्या नव्हत्या. त्यामुळे कोणताही गुन्हा नसताना सातपाटी बंदरात उठाबशा काढायला लावणाऱ्या पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे, असे दामोदर तांडेल यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस अधीक्षक जीतेंद्र ठाकूर व मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही दामोदर तांडेल यांनी केली आहे.लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असताना हातावर पोट असलेल्या मच्छीमार बांधवांची उपासमार होत आहे. कोळी बांधव किनाऱ्यावर मासेमारी करतात
, तर कोळी महिला नेहमी उपरे, शिंपले गोळा करून उदरनिर्वाहाचा प्रयत्न करतात. मात्र मत्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा नोकरशहांवर अजिबात वचक नसल्याने सदर प्रकरणी मानवाधिकार आयोगकडे दाद मागण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने घेतल्याचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सांगितले. एका बाजूला महसूल मिळावा म्हणून दारूची दुकाने सुरू करून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविला गेला. त्यामुळे कोरोनाला पोषक वातावरण तयार करण्यात आले. मात्र आपल्या गरीब कुटुंबासाठी मासेमारी करणाऱ्या माता-भगिनींनी अमानवी वागणूक देणारे पोलीस जागच्या जागी दंड व शिक्षा द्यायला लागले तर न्यायालयांची काय गरज आहे, असा सवालही तांडेल यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने ८ मे २०२० रोजी रस्त्यावर लाठीमार करण्यास मनाई केली आहे. रस्त्यावर लाठीमार केल्यास पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल असे नमूद केले आहे. त्यामुळे कोळी माता-भगिनींनी भर किनाऱ्यावर शिक्षा करून त्यांची अवहेलना करणारे पोलीस शिक्षेस पात्र ठरत आहे. त्यांच्यावर कारवई करावी, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे.


अर्नाळ्यातही नुकसान

सातपाटीत पोलिसांकडून कोळी माता-भगिनींची अवहेलना झाली असताना, अर्नाळ्यातही पालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडून मच्छीविक्री करणाऱ्या कोळी महिलांचे मच्छीचे ट्रे आणि मासळीची मांडणी करण्यात येणारे पाटे उडविले गेले. त्याचाही अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून निषेध करण्यात आला आहे. हातावर पोट असणाऱ्या कोळी समाजाची कोंडी होत असेल तर त्यांनी जगावे तसे, असा प्रश्नही तांडेल यांनी उपस्थित केला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.