संधीचे सोने करणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2020   
Total Views |


ninad samel_1  


सध्या निनादची कंपनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष १५ हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये आजवर कंपनीने सहकार्य केले आहे. भविष्यात याच क्षेत्रात एक मोठा उद्योजक व्हायचं स्वप्नं निनादने उराशी बाळगलेलं आहे.

 



सध्या या टाळेबंदीच्या काळात अनेक तरुण मुलं कोणता उद्योग-व्यवसाय करावा, याचा शोध घेत आहेत. बहुतांश मुलांना वाटतं की, पैसा असेल तर उद्योग करता येतो. मात्र, अनेक उद्योगधंदे असे आहेत, जिथे भांडवल लागतं ते जिद्दीचं, कष्टाचं आणि कल्पकतेचं. आपल्याला काय येतं? आपल्यातली सुप्त कला काय आहे? हे ज्याला कळलं, तो चांगला उद्योजक होऊ शकतो. आपण सभोवताली नजर टाकली तर अशा स्वरुपाचे अनेक उद्योजक आपल्या नजरेस पडतील. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, टाळेबंदीनंतर आपण जो व्यवसाय कराल तो परस्पर सहकार्यानेच करावा लागेल. एकटा माणूस सद्यकाळात तग धरण्याची शक्यता फारच कमी आहे. या सगळ्या मुद्द्यांचा विचार बाविशीतल्या त्या मुलाने पाच वर्षांपूर्वींच केला होता. मित्रासोबत त्याने त्याला जे जमतं त्यातूनच उद्योग उभारला आणि आज आठ जणांचं घर तो सांभाळतोय. हा उद्योजक मुलगा म्हणजेच ‘एडुक्राफ्टर’चा निनाद समेळ होय.
 

उंचापुरा, शिडशिडीत बांधा, चष्म्यातून डोकावणारे बोलके डोळे, फ्रेंच कट असं व्यक्तिमत्त्व लाभलेला निनाद समेळ कोणालाही आपलंसं करतो. निनादचे बाबा सतीश समेळ भायखळ्याच्या गिरणीमध्ये कामाला होते. १९८२ साली गिरणी कामगारांचा तो ऐतिहासिक संप झाला आणि त्यांनादेखील घरीच बसावे लागले. गिरणीत असल्यापासूनच त्यांनी फुलांच्या हाराचा छोटासा व्यवसाय माहीममध्ये सुरु केला होता. त्यांची पत्नी शैला त्यांना कामात मदत करायच्या. दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये पदरात होती. निनाद सगळ्यात लहान. माटुंग्याच्या सरस्वती मंदिर शाळेत त्याचं शालेय शिक्षण झालं. दुसरीत असल्यापासून तो बाबांना त्यांच्या फुलांच्या दुकानात मदत करायचा, चिमुकल्या हातांनी हार बनवायचा. त्या नकळत्या वयापासून एकप्रकारे तो व्यावसायिक कौशल्यच शिकायला लागला होता. जसजसा मोठा होत होता, तसतसे हार बनवण्यात तो ‘एक्सपर्ट’ झाला. मुंबईत प्रसिद्ध असणार्‍या माहीम हलवाल्याजवळ यांचं फुलांचं दुकान आणि तिथून काहीच अंतरावर जगप्रसिद्ध माहीमचा दर्गा. त्यामुळे दर्ग्यावर चढवण्यासाठी मुस्लीम बांधव चादर नेत. त्या फुलांची चादर पण निनाद बनवू लागला.
 
गणपतीचं मखर फुलांनी सजवण्यात तर निनाद पारंगत होता. ख्यातनाम क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या घरातील गणपतीच्या फुलांची आरास निनाद करायचा. लग्न असो वा साखरपुडा, बारसं असो की कोणताही सण. मित्रपरिवारात आणि कुटुंबात फुलांची सजावट म्हटलं कीनिनादच असायचा. एकीकडे अशाप्रकारे आपल्या बाबांना व्यवसायात मदत करत असतानाच, निनादने दादरच्या किर्ती महाविद्यालयातून विज्ञान शाखेची माहिती व तंत्रज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ज्यादिवशी निनाद उत्तीर्ण झाला, त्याच दिवशी त्याला एका छोट्या आयटी कंपनीतून नोकरीची ऑफर आली. १० हजार रुपये महिना पगार आणि जर विक्री केली तर १० टक्के कमिशन. इंजिनिअरिंग करणार्‍या मुलांचे प्रोजेक्ट तयार करुन देणारी ती कंपनी होती. दरम्यान, निनादचं कुटुंब डोंबिवलीत राहण्यास आले होते आणि त्याची नोकरी होती ती कांदिवलीला. दररोज डोंबिवली ते कांदिवली तो प्रवास करायचा. काही दिवसांनी कंपनीने त्याला वाशीच्या शाखेत पाठविले. दोन वर्षे त्या कंपनीसाठी निनाद राबला. अनेक गोष्टी तो शिकला. याच वेळी त्याचा एक मित्र निनादला म्हणाला की, त्याने एक फ्लॅट घेतलाय. फ्लॅटच्या हॉलमध्ये तो इंजिनिअरिंगच्या मुलांचे ट्युशन्स घेणार आहे. एक रुम शिल्लक आहे तिथे तो स्वत:चं काहीतरी सुरू करू शकतो. तसं तर व्यवसायच करायचा हे निनादने पहिल्यापासून ठरवलेलं. जे काही आपल्याकडे कौशल्य आहे, त्याचा वापर स्वत:साठी करुन पैसा कमवायचा. त्याने आपला मित्र हर्षद सातारकरला या संधीविषयी सांगितले. हर्षदने होकार दिला आणि यातूनच उभी राहिली ‘निंबस टेक्नॉलॉजी.’ या कंपनीच्या माध्यमातून वेबसाईट बनविणे, अ‍ॅप्लिकेशन्स तयार करणे, आयटी सोल्युशन्स पुरविणे, डिजिटल मार्केटिंग करणे आदी सेवा ही कंपनी देऊ लागली. ही कंपनी २०१५ मध्ये सुरु झाली तेव्हा निनाद अवघ्या २३ वर्षांचा होता.
 
कॉलेजमध्ये असल्यापासूनच निनाद इंजिनिअरिंग करणार्‍या मुलांचे प्रोजेक्ट्स तयार करुन द्यायचा. असे प्रोजेक्ट्स तयार करुन देणार्‍या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. वैयक्तिक पातळीवर करत असलेल्या कामाला संघटनात्मक स्वरुप देण्याचं निनादने ठरवलं आणि ‘एडुक्राफ्टर’ आकारास आली. या कंपनी अंतर्गत इंजिनिअरिंग व आयटीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रकल्प करण्यासाठी त्यांना मदत केली जाते. घरातील पंखे, लाईट्स, एसी हे आपण बाहेर कुठेही असलो तरी आपल्या मोबाईलवरुन चालू अथवा बंद करु शकतो. किंवा त्याचं व्यवस्थापन करु शकतो. अशा स्वरुपाचं तंत्रज्ञान ही कंपनी विकसित करते. नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित संशोधन विकासाचंही काम केलं जातं. एकदा एका कंपनीने चोरीपासून संरक्षण करणार्‍या एका उपकरणाची माहिती निनादला विचारली. त्यांना अशा १० हजार उपकरणांची आवश्यकता दरवर्षी लागणार होती. हीच ती संधी ओळखून निनादने तशा स्वरुपाचे उपकरण संशोधन करुन विकसित केले. त्या कंपनीची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढले. त्यांची ऑर्डर वेळेत पूर्ण केली. दुर्दैवाने त्याचे पैसे अडकले. मात्र, निनादने हार मानली नाही, याच चौर्यविरोधी उपकरणाचे मार्केटिंग करुन आतापर्यंत आठ हजारांपेक्षा जास्त उपकरणं त्याने विकली. सध्या निनादची कंपनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष १५ हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये आजवर कंपनीने सहकार्य केले आहे. भविष्यात याच क्षेत्रात एक मोठा उद्योजक व्हायचं स्वप्नं निनादने उराशी बाळगलेलं आहे. संधीमध्ये सोनं शोधण्याची नजर आपल्याकडे असेल तर कोणताही व्यवसाय निश्चितच यशस्वी होऊ शकतो. कोरोनाच्या सावटामध्ये आपण ‘पॉझिटिव्ह’ विचाराने पुढे जायचं की ‘निगेटिव्ह’ विचाराने ‘क्वारंटाईन’ व्हायचं, हे प्रत्येकाने आपलं ठरवायचं. निनादसारखा विचार आणि कृती प्रत्येक मराठी तरुणाने केली तर अल्पावधीतच अवघा मराठी समाज उद्योजक म्हणून आकारास येईल, यात शंका नाही. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@