अर्थमंत्री निर्मला सीतारमण बुधवारी ४ वाजता घेणार पत्रकार परिषद!

13 May 2020 12:01:26

nirmala sitharaman_1 


२० लाख कोटींच्या विशेष पॅकेजची देणार सविस्तर माहिती


दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेत २० लाख कोटींच्या मदत पॅकेजची विशिष्ट माहिती दिली जाणार आहे. २० लाख कोटी कोणत्या क्षेत्रात वापरले जातील? ही रक्कम कशी वापरली जाईल? या विभागणीचा पहिला टप्पा आज जाहीर करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटामुळे त्रस्त झालेल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना संकटापासून भारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. ही रक्कम भारतीय जीडीपीच्या सुमारे १० टक्के इतकी आहे. यासह, मदत पॅकेज देण्याच्या बाबतीत भारत जगातील पाचवा क्रमांकाचा देश ठरला आहे. सर्वात मोठे मदत पॅकेज देणारे जपान हे पहिले स्थान असून अमेरिका दुसर्‍या क्रमांकावर आहे.





पंतप्रधान मोदी म्हणाले की, अर्थमंत्री सर्व क्षेत्रांशी संबंधित घोषणा बुधवारीपासून जाहीर करतील. तथापि, या पॅकेजने समाजाशी संबंधित प्रत्येक घटकाची काळजी घेतल्याचे संकेत त्यांनी निश्चितपणे दिले. गरीब, मजूर, स्थलांतरित आणि मच्छीमार यांच्यासह सर्व घटकांना बळकटी देण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये मजुरांना विशेष सवलती असलेल्या कंपन्यांना करात सवलत देण्यासह शेतकऱ्यांनादेखील अनेक सवलती मिळू शकतात. चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्यांचे सरकारकडे लक्ष आहे. अशा परिस्थितीत सरकार परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष सवलतीची घोषणा देखील करू शकते.
Powered By Sangraha 9.0