उशिरा सुचलेले शहाणपण ! अखेर राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

    दिनांक  13-May-2020 20:55:09
|
Anil Deshmukh_1 &nbs


मुंबई : राज्यात जनता पोलिसांना गृहीत धरत असल्याने कोरोना रुग्णात वाढ होत आहे. त्यामुळे अखेर राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या मागवाव्या लागल्या. राज्याच्या गृह विभागाने केंद्राकडे २० कंपन्यांची मागणी केली आहे. खरे तर हे उशिरा सुचलेले शहाणपण असेच म्हणावे लागेल.
 
खरे तर राज्यात कोरोना जास्त प्रमाणात फैलावू लागला तेव्हाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात मिलिटरी बोलवावी लागेल असा इशारा दिला होता. इतकेच नव्हे तर कोरोनाबधितांची संख्या काळजी करण्यासारखी झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी १८ पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठक घेतली तेव्हा भाजप नेते प्रवीण दरेकर आणि मनसेचे राज ठाकरे यांनी लोक पोलिसांना गृहीत धरत असल्याचे लक्षात आणून दिले होते. मात्र मुख्यमंत्री "मी मिलिटरी बोलावणार नाही. जवान कशाला? तुम्हीच माझे जवान. तुम्हीच कोरोनाला हरवणार, याचा मला पूर्ण विश्वास आहे," असे भावनिक आवाहन करीत होते. अखेर जवानांना नाही बोलावले, पण केंद्रीय सशस्त्र पोलीस दल बोलावण्याची वेळ आली आहे.
 
 
राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.