न्युयॉर्कच्या टाईम स्क्वेअर इमारतीवरील ‘ट्रम्प डेथ क्लॉक’ चर्चेत!

13 May 2020 14:59:27

Trump Death Clock_1 


अमेरिकेतील कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या दाखवते हे घड्याळ!


न्यूयॉर्क : संपूर्ण जगातच कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. रोज हजारो लोक या विषाणूच्या प्रभावामुळे मृत्युमुखी पडत आहेत. जगात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे नागरिकांचे जीव जाण्याचे प्रमाण अजूनही म्हणावे तसे कमी झालेले नसतानाच, न्युयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम स्क्वेअरवर लागलेले ‘ट्रम्प डेथ क्लॉक’ चर्चेत आले आहे. हा एक मोठा बिलबोर्ड असून त्यावर कोरोना साथीमध्ये जीव गमावलेल्या लोकांची संख्या दाखविली जात आहे. ट्रम्प सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांना जीव गमवावा लागला, असे म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी वेळीच उपाययोजना केली असती तर हा आकडा निम्म्याने कमी होऊ शकला असता, असे म्हटले जात असून ट्रम्प डेथ क्लॉक या विचारातूनच लावले गेले आहे. वेळीच उपाय योजना झाली असती तर कोविड-१९ मुळे झालेले ६० टक्के मृत्यू टाळता आले असते.


या क्लॉकचे डिझाईन चित्रपट निर्माता युजीन जेर्की यांनी केले आहे. करोना महामारीमुळे रिकाम्या पडलेल्या टाईम स्क्वेअर या’ उंच इमारतीवर हे क्लॉक लावले गेले आहे. हे क्लॉक बनवणाऱ्या युजीन यांना दोनवेळा ‘सनडान्स फिल्मफेअर अवॉर्ड’ मिळाले आहे. कोरोना प्रसाराच्यावेळी ट्रम्प यांनी वेळीच योग्य निर्णय घेतले असते तर या साथीत बळी पडलेल्या अनेकांचे प्राण वाचू शकले असते. सरकारी दुर्लक्षामुळे सोमवारपर्यंत फक्त न्युयॉर्कमध्ये ४८ हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत, तर संपूर्ण अमेरिकेत ८० हजाराहून अधिक लोकांचा करोनाने जीव घेतला आहे. सरकारला त्यांच्या कृतीचा आरसा दाखवण्यासाठी हे घड्याळ लावण्यात आल्याचे युजीन यांनी सांगितले आहे.


ट्रम्प प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी १६ मार्च ऐवजी ९ मार्चपासून सोशल डीस्टन्सिंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेऊन शाळा, ऑफिसदेखील बंद करायला हवे होते, असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.
Powered By Sangraha 9.0