पुण्यात दारूसाठी मिळणार ई-टोकन सुविधा!

    दिनांक  12-May-2020 10:01:09
|

pune_1  H x W:राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘महसूल वाढीसाठी’ अनोखी उपाययोजना


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाईन शॉप्समध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही उपायोजना करण्यात आली आहे. या हायटेक उपाययोजनेमुळे मद्यप्रेमींचा रांगेत ताटकळत उभे राहण्याचा त्रास वाचणार आहे. राज्याला महसूल प्राप्त व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


पुण्यातील मद्यप्रेमींसाठी ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घेणे आवश्यक आहे. या संकेत स्थळावर ग्राहकाने सुरुवातीला आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचे आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी मिळेल. त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल.


आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळणार आहे. त्यानंतर सदर टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधित दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात. सध्या तरी या टोकनवर फक्त पुणे विभाग दिसत असल्याने ही सुविधा केवळ पुण्यात उपलब्ध असणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.