चिंताजनक : रत्नागिरीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय!

12 May 2020 15:24:22

Ratnagiri_1  H



रत्नागिरीत आज नवे ५ रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर!


रत्नागिरी : मुंबई पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच ऑरेंज झोनमध्ये असलेल्या रत्नागिरीतही कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली होती. मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रत्नागिरीत आज ५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची संख्या आता ५२ वर पोहोचली आहे.


मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी रत्नागिरीत जिल्ह्यातील ५ जण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर पोहोचला होता. मात्र गावी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्याला त्याचा चांगलाच फटका बसला आहे.


ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, आठवडाभरात रत्नागिरीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक १३ रुग्ण हे मंडणगड तालुक्यातील आहे. मुंबईतून मंडणगडला चालत येण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. मुंबई ते मंडणगड हे अंतरसुद्धा कमी आहे. त्यामुळे बहुतेक चाकरमानी या ठिकाणी लपून छपून चालत आले. त्यामुळे मंडणगड तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला पहायला मिळत आहे.


मुंबई आणि पुण्याहून कोकणात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये विनापरवानगी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहरांतून कोकणात येणारे चाकरमानीच सध्या कोरोनाचे वाहक ठरत आहेत. कोरोनग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे इथल्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0