'मिठी'तून गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |

mithi river_1  



आयुक्त इकबालसिंग चहल यांचे निर्देश


मुंबई : पावसाळ्यात मुंबईला धोकादायक ठरू पाहणाऱ्या 'मिठी' नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वीच झाले पाहिजे, असे निर्देश नवनियुक्त आयुक्त इकबालसिंग चहल यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना दिले. मुंबईतून वाहणारी प्रमुख नदी म्हणून 'मिठी'ची ओळख २००५ च्या पूरस्थितीपासून झाली आहे. तेव्हापासून सगळ्यानीच 'मिठी'चा धसका घेतला आहे. महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी प्रथम मिठीचा गाळ काढला जातो. आता पावसाळ्याच्या तोंडावरच इकबालसिंग चहल यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधाचे आव्हान पेलताना त्यांना पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांकडेही लक्ष द्यावे लागत आहे.


'मिठी' नदीतून गाळ काढण्याच्या कामाची चहल यांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त संजय दराडे, प्रमुख अभियंता संजय जाधव व संबंधित अधिकारी उपस्थित होते. चहल यांनी कामाच्या गतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करावे, त्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त संयंत्रे व मनुष्यबळ तैनात करून दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) काम करण्याचे निर्देश देण्याची सावधानताही आयुक्तांनी बाळगली आहे.


चहल यांनी माहिम कॉजवे येथील 'मिठी' नदीच्या पातमुखाचीही पाहणी केली. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात अमेरिकन स्कूलमागे आणि बीकेसी पूर्व- पश्चिम जोडणारा उड्डाणपूल येथील कामाचाही सविस्तर आढावा घेतला.
महानगरपालिका प्रशासनाची 'कोरोना'शी एकीकडे दिवस-रात्र लढाई सुरू असतानाच दुसरीकडे इतर आवश्यक नागरी सेवा-सुविधांची कामे आणि प्रकल्प देखील निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण होतील, याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. 'कोरोना'मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण होण्यास अनेक आव्हाने व अडचणी असताना देखील महानगरपालिकेच्या स्तरावर सुव्यवस्थित नियोजन करून कामे वेळेतच पूर्ण होतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. त्याची चहल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

लक्ष्य दीड लाख मेट्रिक टनाचे
वेलरासू यांनी माहिती दिली की, 'मिठी' नदीचा प्रवाह २१.५०५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातून गाळ काढून स्वच्छता करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कंत्राट कालावधीदरम्यान 'मिठी'तून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रिक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी ७० टक्के म्हणजे ९८ हजार ५०० मेट्रिक टन गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई म्हणून काढला जाणार आहे. या ९८ हजार ५०० मेट्रिक टन पैकी आतापर्यंत २६ हजार ११८ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या २९ टक्के काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण उद्दिष्ट गाठले जाईल, अशारीतीने कामास गती देण्यात आली असल्याचेही वेलरासू यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@