जगीं निर्बंध ये कैसा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020   
Total Views |


tourism_1  H x


वर्षाच्या अखेरपर्यंत जागतिक स्थिती पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत असली तरी हौशी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून जगभ्रमंतीला पसंती देतील का, हाच खरा प्रश्न. यासंबंधी संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यटन संघटना अर्थात युएनडब्ल्यूटीओनेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.



जगाचे बंध कोणाला
,

जगाला बांधला त्याला!

मला जो थांबवी ऐसा,

जगीं निर्बंध ये कैसा?


‘उद्याचा संसार’ या नाटकातील बालकवींच्या गीतातील हे बोल. ‘मला थांबवू शकेल, असा जगात कोणता निर्बंध आहे,’ असा काव्यात्मक प्रश्न बालकवी उपस्थितीत करतात खरा. पण, आज त्याचे उत्तर अगदी सहजपणे देता येईल. कोरोना हाच तो बंध आहे, ज्याने अवघ्या जगावर अखंड निर्बंध लादले आहेत. या एका जीवघेण्या विषाणूमुळे अख्खे जग एकाएकी थांबले. लोकं घराच्या चार भिंतीत बंदिस्त झाली. ही परिस्थिती आगामी काही महिने थोड्याफार फरकाने का होईना, अशीच कायम राहील. स्वच्छंदी, मनविहारी आणि स्वातंत्र्यप्रिय माणसाला जगायचे असेल, तर या बंधनाचा दाह सहन करावाच लागेल. भविष्यातील मुक्तसंचारासाठी आताच्या या संचारबंदीला गोड मानून तिला आपलेसे करावेच लागेल. पण, इतरांना जग फिरवून, रम्य पर्यटनस्थळांचे दर्शन घडवणार्‍या पर्यटन क्षेत्राला मात्र कोरोनाच्या बंधनांचा जोरदार तडाखा बसला आहे. कारण, वर्षाच्या अखेरपर्यंत जागतिक स्थिती पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत असली तरी हौशी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून जगभ्रमंतीला पसंती देतील का, हाच खरा प्रश्न. यासंबंधी संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यटन संघटना अर्थात ‘युएनडब्ल्यूटीओ’नेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.


‘युएनडब्ल्यूटीओ’च्या एका अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय पर्यटनात ६० ते ८० टक्क्यांची मोठी घट नोंदवली जाणार असून त्याची सुरुवात फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच झाली आहे. २०२०च्या पहिल्या तिमाहीत पर्यटकांची संख्या ही २२ टक्क्यांनी आधीच घसरली असून २०२०च्या अखेरीस हे प्रमाण ६० ते ८० टक्के असेल, असा अंदाजही या अहवालात वर्तविण्यात आला आहे. नुकसानीचा हा आकडा ९१० अब्ज डॉलर ते १.२ ट्रिलियन डॉलर इतका प्रचंड असून देशोदेशीच्या सरकारांना पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. यामुळे प्रत्यक्ष पर्यटनाशी संबंधित सेवाक्षेत्र तसेच त्यावर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणार्‍या अब्जावधी लोकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होईल.



पर्यटन कंपन्या
, हॉटेल उद्योग आणि विमान वाहतुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम होणार असून या सर्व क्षेत्रांशी संबंधित लघु उद्योगांवरही उपासमारीची वेळ येऊ शकते. एकीकडे अमेरिका, ब्रिटनसारखे देश आहेत, ज्या देशांतील पर्यटक मोठ्या संख्येने जगभ्रंमतीसाठी देशाबाहेर पडतात. मात्र, कोरोनाच्या धास्तीपायी आणि खिशातील खडखडाटाअभावी आता हीच मंडळी पर्यटनासाठी सातासमुद्रापार सीमोल्लंघन करतील, याची शक्यता तशी धूसरच आणि जरी त्यांची इच्छा असेल तरी थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया यांसारखे पर्यटनप्रिय देश या कोरोनाबाधित देशांतील पर्यटकांना प्रवेश करु देतील का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाला पर्यटनाची कवाडे ही संपूर्ण खबरदारी घेतल्यानंतरच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी खुली करावी लागतील, अन्यथा त्या देशात कोरोनाची दुसरी लाट उसळण्याचा धोका नाकारता येत नाही.



एका अंदाजानुसार
, भारतीय पर्यटन क्षेत्राचे पाच लाख कोटींचे प्रचंड नुकसान होणार असून या क्षेत्रावर रोजीरोटी असणार्‍या चार ते पाच कोटी लोकांच्या रोजागाराचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. गेल्या वर्षी एकूण १०.८९ दशलक्ष पर्यटकांनी भारताला भेट दिली होती, त्यातही फेब्रुवारी महिन्यात भारतात दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या ही १.०८ दशलक्ष इतकी होती. पण, कोरोनामुळे २०२०च्या फेब्रुवारीत हीच संख्या १.०१ दशलक्ष इतकी रोडावली असून यामध्ये ६.६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सरकारसमोर कोरोनाशी लढण्याबरोबरच उद्योगधंदे सुरळीत करण्याचे दुहेरी आव्हान सध्या आ वासून उभे आहे.



गोवा
, राजस्थान, केरळ, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हे पर्यटनकेंद्रित आहेत. तेव्हा, या राज्यांना ही झळ अधिक बसू शकते. सरकारने पर्यटन क्षेत्राला आर्थिक साहाय्य देऊन सावरण्याबरोबरच, देशांतर्गत पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना देण्याची ही नामी संधी आहे. सरकारी पातळीवरही, काही अटी-शर्तींसह सवलती आणि १०० टक्के सुरक्षेची हमी देऊन पर्यटकांना आकर्षित केल्यास पर्यटन उद्योग काहीअंशी का होईना तग धरु शकतो.

@@AUTHORINFO_V1@@