कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती चिंताजनक!

11 May 2020 11:49:31

trump obama_1  



माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका


मुंबई : चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसने पसरायला सुरूवात केली आणि त्याचे संक्रमण संपूर्ण जगभरात झाले. याचा सगळ्या जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. दिवसेंदिवस अमेरिकेतली परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.


ओबामा यांनी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांशी आणि त्यांच्याबरोबर काम केलेल्या सहकाऱ्यांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. जागतिक संकटात सरकारचे नेतृत्व किती भक्कम असावे लागते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांना टोला लगावला आहे. ट्रम्प सरकारच्या अस्थिर दृष्टीकोनाला काही प्रमाणात दोष द्यावा लागेल, असेही ओबामा म्हणाले.


अमेरिकेतली कोरोनाची परिस्थिती हाताळताना डोनाल्ड ट्रम्प पार वैतागून आणि गोंधळून गेले आहेत. ट्रम्प यांच्या कमकुवत आणि ढिसाळ प्रतिसादामुळे अमेरिकेची सध्या ही अवस्था झाल्याची टीका ओबामा यांनी केली आहे.


एप्रिलमध्ये कोरोना लॉकडाउनमुळे अमेरिकेत तब्बल २०.५ दशलक्ष नोकर्‍या गेल्याचे कामगार विभागाने सांगितले. कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. अमेरिकाही यात चांगलीच भरडली गेली नाही. यूएसमध्ये कार्यालये, कारखाने, शाळा, बांधकाम ऑपरेशन्स आणि स्टोअर बंद आहेत. या व्हायरसचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर तीव्र परिणाम झाला आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर १४.७ टक्के झाला आहे. अमेरिकेतील व्यवसाय बंद झाल्यामुळे जवळजवळ सर्व उद्योगांमध्ये बेकारी झाली आहे.


दुसरीकडे, अमेरिकामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांच्या आकड्यात सतत वाढ होत आहे. कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक विनाश झाला आहे. येथे जगभरात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, लष्करी सहाय्यकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये आता रोज कोरोनाची तपासणी केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0