कोरोना संक्रमण काळात पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

11 May 2020 20:23:46


animal lockdown_1 &n


दूध काढणे हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते आणि त्यासाठी पशुधनाचे व्यवस्थापन करावे लागते. गाई-म्हशीला वेळच्यावेळी चारापाणी करावे लागते. त्यांना रोगराईपासून दूर ठेवावे लागते आणि रोज सकाळ-संध्याकाळ त्यांच्यापासून दूध काढणार्‍या लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीला ‘लॉकडाऊन’मधून सध्या वगळले असले तरी बर्‍याच पशुपालकांना त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणावर कसे काम करावे, हे सांगण्यासाठी सदर लेखात माहिती दिलेली आहे.
 

पशुधनाच्या प्रक्षेत्रावर गोठ्यामध्ये काम करताना प्रथम आपले बाहेर वापरण्याचे कपडे काढून बाजूला ठेवावे. प्रक्षेत्रावर काम करण्याचे कपडे परिधान करावे. त्यानंतर स्वच्छ साबणाने हात धुवावे. दिवसभर तोंडावर मास्क लावावा व हातात मोजे घालावे. पशुधनाच्या गोठ्यामध्ये काम करताना पायात गम बूट वापरावे. प्रक्षेत्रावरील इतर कामगारांबरोबर सुरक्षित अंतर, सामाजिक अंतर ठेवूनच म्हणजे एक मीटरचे अंतर ठेवावे. गोठ्यातील पशुधनाचे चारापाणी मुक्त संचार पद्धतीने केल्यास मनुष्यबळात बचत होईल. काम करताना सकाळच्या पारगीमध्ये ११ वाजेपर्यंत उन्हामध्ये सर्व कामे करावीत व दुपारची कामे ४ नंतर सावलीच्या वेळी करावी. काम करताना ताप-खोकला-सर्दी आणि थकवा येणे यांसारखी लक्षणे जाणवल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 

दूध, अंडी, मटण हे सामाजिक अंतर ठेवूनच काढावी व विक्री करावी. जनावरांचे गोठे नेहमी कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करावा. जनावरांना खाद्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुराक घरच्या घरी बनवावे. यामध्ये ज्वारी-बाजरी-मका भरडून तीन ते चार किलो प्रतिदिन खाऊ घालावे. त्यामध्ये डाळीची टरफले, गव्हाचा भुसा इत्यादी भरडून एका वयस्कर जनावराला अंदाजे चार ते पाच किलो भिजवून दिल्यास त्यांचा चांगला फायदा होतो. कोरोना संक्रमण काळात साहजिकच दुधाची गरज व मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने पशुधनाचे व्यवस्थापन करून स्वच्छ दूध उत्पादन मुबलक प्रमाणात करता येईल. बर्‍याच वेळा कोरोना संक्रमण काळात फार मोठ्या प्रमाणात अफवा पसरवतात. यामध्ये पशूंपासून मानवाला कोरोना होतो. अंडी-मांस खाल्ल्याने कोरोना फैलावतो. मात्र, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.माझी पशुपालक कामगार, मजूर, शेतकरी यांना कळकळीची विनंती आहे की, पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा प्रसार होत नाही. पाळीव प्राण्यांमधून माणसांमध्ये ‘कोविड-19’चा संसर्ग झाल्याची उदाहणे नाहीत. पशूंच्या मलमूत्रांतूनहीते मानवामध्ये कोरोनाचा प्रसार होत नाही. तरी पशुधनाशी निगडित काम करताना स्वयंशिस्त पाळावी.

 
सर्वांनी दररोजच्या आहारात दूध, दही, अंडी व मांस इत्यादीचा आपल्या कुवतीनुसार वापर करावा. जेणेकरून वरील प्राणिजन्य पदार्थांच्या सेवनाने प्राणिजन्य प्रथिनांमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून कोरोनाला हरवण्याचे बळ प्राप्त होईल. कोरोनाला हरवण्यासाठी आणि स्वतः सुरक्षित राहण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे, आदेशांचे एक भारतीय नागरिक म्हणून पालन करावे. आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे.
 
 

- डॉ. पालम पल्ले
 

Powered By Sangraha 9.0