नवनियुक्त आयुक्त चहल यांचा कोरोनाप्रतिबंधासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर

    दिनांक  10-May-2020 19:22:12
|


mumbai ayukta chahal_1&nbमुंबई : मुंबईत कोरोनाला आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त इकबालसिंग चहल यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. इकबाल सिंग चहल यांच्या मार्गदर्शनात शनिवारी संध्याकाळी महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकार्‍यांची एक विशेष आढावा बैठक घेण्यात झाली.


संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीला विशेष कार्य अधिकारी मनीषा म्हैसकर
, अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, विशेष कार्य अधिकारी प्राजक्ता लवंगारे, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू व रमेश पवार, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्यासह संबंधित उपायुक्त, विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त आणि संबंधित खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


'कोरोना कोविड १९'च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरु असलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्तांनी सदर बैठकीदरम्यान घेतला. अधिकारी व कर्मचारी चांगले काम करीत आहेत. तरीही अधिक नियोजनपूर्वक व अधिक प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. यासाठी आपापल्या कार्यक्षेत्राची परिस्थिती व गरज लक्षात घेऊन सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे. असे निर्देश महापालिका आयुक्तांनी बैठकीतील चर्चेदरम्यान दिले.


'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चे काम आणखी प्रभावीपणे आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे आहे. सध्या हे प्रमाण एका बाधीत रूग्णाच्या मागे ३ असे दिसते. हे प्रमाण किमान एकाच्या मागे ६ असे असावे. सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कार्य व जबाबदाऱ्या यांचे अधिक सुनिश्चित व अधिक परिणामकारक वाटप करावे.


सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त हे त्यांच्या विभागाचे
'आयुक्त' आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागात घडणाऱ्या विविध बाबींवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे व आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची 'बेड' क्षमता वाढविण्यासह 'बेड' व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी आढावा बैठकीदरम्यान दिले


महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या स्तरावर कार्यवाही करावयाची आहे. त्यामुळे एखाद्या विभागातील रूग्णालयात जागा नसल्यास
, ज्या विभागात व्यवस्था होऊ शकते, अशा अन्य विभाग क्षेत्रातील रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी असे निर्देश विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना आढावा बैठकीदरम्यान देण्यात आले. 'कंटेनमेंट झोन' विषयक कार्यवाहीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. याचे 'फलनिष्पती केंद्रीत प्रभावी व्यवस्थापन' व्हायला हवे. या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हायला हवी. यासाठी पोलिसांच्या स्तरावर आवश्यक तो समन्वय नियमितपणे साधावा. 'कंटेनमेंट झोन' विषयक कार्यवाही अधिक प्रभावी व्हावी, यासाठी प्रत्येक 'कंटेनमेंट झोन' साठी समन्वयक म्हणून कोविड योद्ध्यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात करावी. महापालिका क्षेत्रातील १०० कोविड केंद्रांवर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.


बैठकीदरम्यान पावसाळापूर्व कामांचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळापूर्व कामांच्या आढाव्यामध्ये प्रामुख्याने रस्ते
, पूल, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सागरी किनारा रस्ता इत्यादी विषय कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळापूर्व नियोजनाच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने यथायोग्य छाटणी केली जात असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागास दिले. महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामाचा प्रत्यक्षपणे आढावा घेणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी आढावा बैठकीदरम्यान सूचित केले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.