मुंबईत सर्व विभागात रुग्णवाहिका उपलब्ध करा!

    दिनांक  10-May-2020 17:33:04
|
ambulamce 108 _1 &nb
 
 
 


भाजप नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

मुंबई : सध्याच्या अति कठीण प्रसंगात मुंबई महापालिकेच्या सर्व विभागात रुग्णवाहिका उपलब्ध करा, अशी मागणी मुलुंडचे भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा घरी मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी तसेच कोरोना पॉझिटिव्ह व अतिजोखमीच्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात पाठवण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने २४ विभागात कोरोनासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे.
 
 
 
 
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून बाधित रुग्ण आणि मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पालिकेच्या रुग्णालयात एखादा करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून पीपीई परिधान केलेल्या दोन कामगारांसह रुग्णवाहिकांमधून अंत्यसंस्कारासाठी पाठवले जातो. मात्र एखाद्याचा मृत्यू घरीच झाल्यास त्याच्या मृतदेहाला सुरक्षेच्या कारणास्तव कोणीही हात लावण्यास तयार नसतो. पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या व्यक्तींसह रक्तांच्या नात्यातील माणसेही हात लावायला तयार नसतात. त्यामुळे पालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच स्थानिक नगरसेवकांना रुग्णवाहिका व पीपीई धारक कामगारांची व्यवस्था करावी लागते.
 
 
 
यासाठी अनेकदा ८ ते १२ तासांचा कालावधी लागतो. मागील आठवड्यात दादरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकांचा मृतदेह १२ तास पडून होता. रुग्णवाहिकेतील कामगारांनीही मृतदेहाला हात लावण्यास नकार दिला होता. मृताच्या दोन्ही मुलांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्याची विनंती पालिकेने केली होती. त्यांनीही न ठेवल्याने तब्बल बारा तासांनी पीपीई किट देवून दोन कामगारांमार्फत मृतदेह उचलून रुग्णवाहिकेतून अंतिम संस्कारासाठी पाठवण्यात आला. भांडुपमध्येही अशाचप्रकारे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाला हात लावण्यास कुणी तयार होत नव्हते. अखेर समजूत काढून काही तासांच्या नाट्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला.
 
 
 
मुंबईतील ही स्थिती पाहता व पुढील धोका लक्षात घेता प्रत्येक विभागांमध्ये पीपीई किट असलेल्या प्रशिक्षित कामगारांसह सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यास विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे प्रकाश गंगाधरे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
गंगाधरे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार
 
 
कोरोनामुळे मृत रुग्णाला स्मशानभूमीत नेताना वा कोरोनाबाधिताला रुग्णालयात नेताना त्याची मोठी हेळसांड होते. अशावेळी नवनियुक्त आयुक्त इकबालसिंग चहल यांनी १०० कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी दोन अशा २०० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गंगाधरे यांच्या मागणीवर हा सकारात्मक निर्णय असल्याचे मानले जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.