बावचळलेले सुधारतील?

    दिनांक  10-May-2020 23:12:04
|


amit shah _1  H२०१४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळी देशातील जनतेने नरेंद्र मोदींच्या हाती देशाची कमान सोपवल्याने तथाकथित लिबरल-सेक्युलर टोळक्याच्या जळफळाटाचा कळस झाला आणि त्याच्या ओकार्‍या समाजमाध्यमांतून बाहेर पडू लागल्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मृत्युची कामना त्यातून आलेल्या निराशेची-हताशेची आणि राग-द्वेषाचीच झलक आहे.


अवघ्या जगाला शांती
, अहिंसा आणि करुणेची शिकवण देणार्‍या भगवान गौतम बुद्धांना रागवावयास भाग पाडायचेच, अशा निर्धाराने एक माणूस बुद्धांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला. तिथे येताच त्याने सर्वांसमोर तथागतांना अर्वाच्च, गलिच्छ शिव्या द्यायला सुरुवात केली. त्या माणसाच्या शिव्या ऐकून प्रवचनाला जमलेले लोक अस्वस्थ झाले, संतापले. पण भगवान गौतम बुद्ध शांत होते, त्यांच्या चेहर्‍यावरील स्मित जरासुद्धा ढळले नव्हते. अखेरीस शिव्या देणारा माणूस दमला, थकला आणि नुसतेच डोळे मोठे करुन बुद्धांकडे पाहात राहिला. त्याला थांबल्याचे पाहून तथागतांनी स्मित केले आणि ते अगदी शांत आवाजात म्हणाले, “मी तुला एकच प्रश्न विचारतो, जर तुला कोणी एखादी भेटवस्तू दिली आणि ती स्वीकारण्यास तू नकार दिला तर ती भेटवस्तू कोणाकडे राहील?” प्रश्न साधा-सोपा होता आणि तो माणूसही उत्तरला, “एवढेही कळत नाही? ती भेटवस्तू ज्याने दिली त्याच्याकडेच राहील.त्याचे उत्तर ऐकून तथागत स्मित करत म्हणाले की, “अगदी बरोबर! मग जर मी हे तुझे शिव्याशाप स्वीकारण्यास नकार दिला तर ते कोणाकडे राहातील?” भगवान गौतम बुद्धांचे हे उत्तर ऐकून तो माणूस खजील झाला आणि तथागतांच्या चरणांवर पडला.आज संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाने उद्भवलेल्या संकटाच्या काळात प्रत्येकजण एकमेकांच्या आयुरारोग्याची प्रार्थनाही करत आहे. आणि हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. कोणतीही संवेदनशील
, माणुसकी शिल्लक असलेली व्यक्ती अशा कठीण काळात असेच करेल. पण ज्यांची संवेदनशीलता, माणुसकी ठार मेलीय, तिरडीवर ठेवलीय, सरणावर जाळलीय, त्यांचे काय? हो, अशी अमानुष माणसेही आपल्याच देशात अस्तित्वात असून त्यांना शोधण्यासाठी फार काही प्रयत्न करण्याचीही गरज नाही. कारण द्वेषाने पिसाटलेली ही मंडळी आपल्या अवतीभवतीच वावरत असून फेसबुक, ट्विटर किंवा अन्य समाजमाध्यमांवरुन गरळ ओकताना दिसतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून यातल्या अनेकांनी ते ज्या कोणत्या देवाला किंवा गॉडफादरला मानतात त्याला पाण्यात बुडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मृत्युची कामना केली.एका काश्मिरी महिला पत्रकाराने आपल्या ट्विटर खात्यावरुन अमित शाह यांना कोरोना व्हावा
, असे विकृतीने बरबटलेले विधान केले. तर एनआरआय किंवा परदेशस्थ पत्रकार असलेल्या एका महिला पत्रकाराने आपल्या घाणेरड्या मानसिकतेचे प्रदर्शन घडवत अमित शाह यांच्या मृत्यूचा जल्लोष साजरा करण्याची इच्छा फेसबुकवरुन व्यक्त केली. दुबईतील एका मासिकाची संपादक असलेल्या एका पत्रकार महिलेनेही अमित शाह यांना कर्करोग किंवा कोरोनाने मरताना पाहायचे असल्याचे ट्विट केले आणि नंतर ते डिलिट केले. अर्थात नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याबाबतीत अशाप्रकारची घटना प्रथमच होतेय, असे अजिबात नाही. लिबरल, सेक्युलर टोळक्यातल्या पत्रकारांनी आणि बुद्धिजीवी, विचारवंतांनी याआधीही मोदी-शाह यांच्याबद्दल अशीच भाषा वापरलेली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी आणि त्याआधी एका वृत्तवाहिनीसाठी काम करणार्‍या महिला पत्रकाराने मोदींना स्वाईन फ्लू व्हावा, अशी कामना केली होती. इंडिपेडंट मीडिया-वेबसाईटसाठी काम करणार्‍या एका पत्रकाराने तर मोदींच्या मृत्यूची भविष्यवाणीही केली होती. इतकेच नव्हे तर माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनीही महिनाभरापूर्वी मोदींना कोरोना व्हावा, असे म्हटले होते. म्हणजेच एकीकडे स्वतःला उदारमतवादी, सहिष्णू आणि जगातील मानवतेचा एकमेव समुच्चय काय तो फक्त आमच्यातच, असे म्हणायचे आणि दुसरीकडे देशाच्या पंतप्रधान व गृहमंत्र्याबद्दल बोलताना हलकटपणाची परमावधी गाठायची, असा हा बेशरमपणा.२०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची केंद्रात एकहाती सत्ता आली
, तेव्हापासूनच देशातील पूर्वीच्या सत्ताकाळातील प्रस्थापित वर्गाने थयथयाटाला सुरुवात केली. तथापि, नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आणि अमित शाह तेथील गृहमंत्रीपदी होते त्यावेळीही अशा सर्वांनीच त्यांच्याविरोधात नाही नाही, ती बडबड केलीच होती. दरम्यान, मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात असहिष्णुता, पुरस्कार वापसीची नौटंकीही या लोकांनी करुन पाहिली. परंतु, सर्वसामान्य जनतेने त्यांच्या उचापत्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही व २०१९ साली पुन्हा मोदींच्याच हाती देशाची कमान सोपवली. इथे खरे म्हणजे अशा सर्वांच्याच जळफळाटाचा कळस झाला आणि त्याच्या ओकार्‍या समाजमाध्यमांतून बाहेर पडू लागल्या.मोदी-शाह यांना समाजातील प्रत्येक स्तरांतून मिळणारा भरघोस पाठिंबा
, जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७०चे निष्प्रभीकरण आणि तरीही काश्मीरमधील शांत असलेली जनता, सुधारित नागरिकत्व कायदा, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अशा प्रत्येक प्रसंगात मोदी-शाहविरोधकांना खणखणीत थोबाडीत बसली. कोरोनाचा प्रसारही भारतात अन्य विकसित देशांच्या तुलनेत कमी प्रमाणात झाल्याचेच पाहायला मिळते. परिणामी मोदी-विरोधकांचा गळू ठणकू लागला आणि त्यातूनच त्यांनी बेबंद टिवटिवाटाला सुरुवात केली.मोदी आणि शाहांना विरोध करण्याचा आणखी एक मुद्दा म्हणजे
, दुर्लक्ष. गेल्या सहा वर्षांपासून आपल्याला कोणी विचारत नाही, आपला सल्ला-सूचना मान्य करत नाही, आमच्या तंत्राने मोदी-शाह वागत नाही, आम्ही सांगू तो अजेंडा राबवत नाही, ही पराभूत मानसिकता अशा तथाकथित लिबरल आणि सेक्युलरिस्टांच्या झुंडीत खदखदताना दिसते. मोदी-शाहांच्या सत्तेत प्रत्यक्षात समाजात काम करणार्‍यांना पद-प्रतिष्ठा-पुरस्कार मिळू लागले आणि ही उंटावरुन शेळ्या हाकणारी प्रजात अदखलपात्र झाली, कोणी चार दमड्याही द्यायला तयार नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली. इथूनच आधी पद-प्रतिष्ठा आणि धन-दौलतीचा सुकाळ होता, पण हे दोघे सत्तेत आले आणि आपल्या आयुष्यात दुष्काळाच दुष्काळ निर्माण झाला, असा विचार या लोकांनी केला. परिणामी कमालीच्या निराशेच्या आणि हताशेच्या गर्तेत गेल्याने ही अवस्था मोदी-शाहांमुळेच आपल्या आयुष्यात आल्याचे त्यांच्या मनाने ठरवले आणि सगळा राग-द्वेष त्यांच्या वाणीतून उड्या मारु लागला.तसेच या शिव्याशापाला पावित्र्याचे प्रमाणपत्र देणार्‍या एकाच कळपातल्यांनी टाळ्या पिटत या सगळ्या प्रकाराला अनुमोदन दिले. तथापि
, अशा लोकांनी कितीही शिव्याशाप दिले तरी मोदी-शाह यांच्यावर प्रेम करणारे नि आशीर्वाद देणारी कोट्यवधी माणसे या देशात आहेत. त्यामुळे कोणत्याही कावळ्याच्या वा कावळीच्या शापाने काहीही बिघडणार नाही, उलट सुरुवातीला भगवान गौतम बुद्धांची जी कथा सांगितली, त्याप्रमाणे या शिव्याशाप त्या देणार्‍यांकडेच राहतील. आणि अमित शाह यांनीही अशा सर्वांनाच ट्विटरवरुन प्रत्युत्तर देत, “माझ्या मृत्यूची कामना करणार्‍या आणि तशी अफवा पसरविणार्‍यांबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग अथवा द्वेष नाही. हिंदू धर्मानुसार अशा प्रकारच्या अफवा या दीर्घायुरारोग्य प्रदान करणार्‍या असतात. त्यामुळे मी त्यांचे आभारच मानतो,” असे म्हटले. आता या उत्तराने मोदी-शाहांच्या सत्तेमुळे बावचळलेले, बिचललेले, बिथरलेले सुधारतील का, हे पाहायचे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.