आघाडीत पुन्हा ‘बिघाडी’ ? ; निवडणुकीमधील सहाव्या जागेवरून मतभेद पुन्हा समोर

10 May 2020 15:33:19

mahavikas aaghadi_1 
 
 
मुंबई : येत्या २१ मे राजी विधानपरिषदेच्या रिक्त जागेंसाठी निवडणूक होणार आहे. सर्व पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पण, यात आता महाविकास आघाडीमध्ये सहाव्या जागेवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून ५ जागा निश्चित होत असताना बिनविरोध निवडणुकीची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने सहाव्या जागेवरही उमेदवार दिल्याने शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आपल्या सहाव्या उमेदवारीच्या मुद्यावर ठाम असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. यानंतर 'असेच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही', असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मतभेदाचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. 
परंतू, कॉंग्रेसने या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवारही जाहीर केला. विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर केली. आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
Powered By Sangraha 9.0