पनवेल : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाघ्य पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी पनवेल भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल पोलीसांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना लेखी निवेदन दिले. यावेळी महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते.
कोरोनाच्या वैश्विक संकटातून बाहेर योण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून भाजप राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर सामाजिक माध्यमामध्ये काही ठराविक लोकांकडून असंसदीय शब्दात टिका होत आहे.
घाणेरडी अश्लील व्यंगचित्र पोस्ट करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत तसेच जनतेच्या मनात एक सुसंस्कृत आणि निष्कलंक म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. पण याचे भान न ठेवता काही विकृत मानसीकतेची मंडळी जो गलीच्छ प्रकार करीत आहे तो निंदनीय आहे. त्यामुळे या संदर्भात तात्काळ तपास करून विनाकारण बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.