‘कोरोना’ आणि घरगुती हिंसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2020   
Total Views |
File Pic _1  H



‘लॉकडाऊन’च्या काळात घरीच राहत असल्यामुळे आपल्या पार्टनरला कसे मारावे, असा व्हिडिओ युनायटेड किंगडमचा बॉक्सर बिली जो सौनडर्स याने सोशल मीडियावर टाकला होता. त्याच्या या व्हिडिओबद्दल नंतर त्याला सपशेल माफीही मागावी लागली. इतकेच नाही तर या बिलीचे बॉक्सिंगचे लायसन्सच ‘ब्रिटिश बॉक्सिंग बोर्ड’ने काढून घेतले.



आता काही लोक म्हणतील की
, कोरोनामुळे अख्खे जग ‘लॉकडाऊन’ झाले आहे. जनता या ‘लॉकडाऊन’मुळे घरातच कैद झाली आहे. या कंटाळ्यावर उपाय म्हणून बहुतेक लोक सोशल मीडियावर नवनवीन कल्पक, सल्ला देणारी, आव्हान देणारे पोस्ट टाकतात. त्यामुळे बिलीनेही असा व्हिडिओ पोस्ट केला असावा.

 

या पार्श्वभूमीवर वाटते की, विनोदाच्या कोणत्याही प्रकारात महिला याच प्रमुख केंद्रबिंदू असतात. त्यामुळे बिलीने बनवलेला व्हिडिओ हा गंमत म्हणून घ्यावा का? पण, ‘लॉकडाऊन’ परिस्थितीमध्ये बिलीचा व्हिडिओ हा गंमतीचा भाग होऊ शकत नाही. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आपत्ती काळामध्ये महिलांच्या शारीरिक आणि मानसिक शोषणाची संख्या वेगाने वाढते आहे. आज कोरोनामुळे जगावर आपत्तीचे सावट आहे. भय, रूग्ण, मृत्यू याशिवाय दुसरे काहीच महत्त्वाचे घडताना दिसत नाही.

 

समाजशास्त्रज्ञांच्या आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते, ही घाबरलेली, निराश माणसे आपल्या भीतीला लपवण्यासाठी, विसरण्यासाठी आपल्यापेक्षा दुर्बल असलेल्यांवर सत्ता गाजवतात. या सर्वांचा बळी कोण ठरत असेल? सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे जगभरच ‘लॉकडाऊन’ आहे. त्यामुळे या असल्या मनोरूग्णांचे बळी ठरत आहेत ती घरातली लहान मुले आणि महिला. तसेही ‘लॉकडाऊन’पूर्वी अशा घरांत महिलांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागायचेच.

 

मात्र, त्यावेळी त्या घराबाहेर पडायच्या. शेजारीपाजारी, नातेवाईक, पोलीस स्टेशन किंवा सामजिक संस्थांकडे दाद मागायच्या. तसेच त्यांना त्रास देणारेही काही २४ तास घरात नसायचे. त्यामुळे काही काळासाठी का होईना, या पीडित महिलांची शोषणापासून सुटका असायची. पण, आता ‘लॉकडाऊन’च्या काळात घरगुती हिंसा करणारी माणसेही घरातच असतात. त्यामुळे जागतिक स्तरावर घरगुती हिसेंचे अक्षरश: पेव पुटले आहे.

 

उदाहरणार्थ, फेब्रुवारी महिन्यात घरगुती हिंसेच्या घटना चीनमध्ये तिपटीने वाढल्या, तर फ्रान्समध्ये घरगुती हिंसेचे प्रमाण ३२ टक्के झाले. इटली, अमेरिका, स्पेन या देशामध्येही हेच आढळले, तर अरब देशांमध्ये या हिंसेचा आलेख भयानकरित्या वाढला. आपल्या देशातही स्थिती काही फारशी समाधानकारक नाही. यावर कित्येक देशांनी उपाययोजनाही केली आहे. जसे फ्रान्समध्ये मेडिकल आणि किराणा मालाच्या दुकानांमध्ये या पीडित महिलांसाठी मदतकेंद्र उभे केले आहे, तर युनायटेड किंगडममध्ये महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. यामध्ये महिलांनी ‘९९९’ क्रमांकावर संपर्क साधायचा. काहीच न बोलता त्याच संपर्कातून ‘५५’ क्रमांकावर संपर्क साधायचा आणि फोन ठेवून द्यायचा. पोलिसांना यावरुन लगेच कळते की महिलेवर घरात अत्याचार होत आहे.

 

कोरोनाच्या या संकटसमयी महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या काळजीने संयुक्त राष्ट्राने नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. त्यात संयुक्त राष्ट्राचे सचिव जनरल अँटोनिओ गुटेरस यांनी घरगुती हिंसेबाबत जगभरच्या देशातील सत्तापक्षांना आवाहन केले की, कोरोनाशी लढताना आपल्या देशातील महिलांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. तसेच ‘लॉकडाऊन’च्या काळात जगभरातून कैदीही पॅरोलवर सोडले जात आहेत. पण, ज्या कैद्यांना मुली-महिलांवर अत्याचारासाठी शिक्षा झाली आहे, त्यांना सोडू नका. तसेच ‘लॉकडाऊन’च्या काळातही महिलासांठी काम करणार्‍या संस्था काम करू शकतील, अशा सुविधा त्या संस्थाना द्या.

 

असो, तर कोरोनाच्या संकटात जागतिक स्तरावर घरगुती हिंसाचार वाढतोय. यावर आपण काय करू शकतो, तर पोलीस प्रशासन, जग काय करेल ते करेल ; पण प्रत्येकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी, न्याय, संवेदनशीलता आणि माणुसकीवरचा विश्वास अबाधित ठेवायला हवाच. कारण, हा विश्वासच माणसाला दुसर्‍यावर अत्याचार करण्यापासून परावृत्त करेल.

@@AUTHORINFO_V1@@