मुख्यमंत्री झोपलेत का?

    दिनांक  08-Apr-2020 21:32:20
|


agralekh_1  H x

 


उद्धव ठाकरे यांचीही या सगळ्या प्रकाराला मूकसंमती असल्याचे म्हणावे लागेल. तसे नसेल तर झोपलेल्या मुख्यमंत्र्यांनी जागे व्हावे आणि कठोर निर्णय घेत खमकेपणाचा दाखला द्यावा, अन्यथा राज्याला कणाहीन शासक लाभल्याचेच स्पष्ट होईल.


सोशल मीडियावर मीम शेअर केला आणि विरोधात कमेंट केली म्हणून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात अनंत करमुसे या अभियंता तरुणाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. देशभरात कोरोनाने उच्छाद मांडलेला असताना आणि महाराष्ट्राने कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा उच्चांक गाठलेला असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या संविधानिक अधिकाराच्या जोरावर पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचाही या प्रकारात गैरवापर करून घेतला. वस्तुतः कोणीही कोणाही व्यक्तीचे चारित्र्यहनन करणे चुकीचेच आणि म्हणूनच करमुसे चुकले असतील, तर त्याचे समर्थन करता येणार नाहीच, त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेतच. पण, उठसुट फुले, शाहू, आंबेडकर, गांधींचे नाव घ्यायचे आणि कृती मात्र नेमकी दहशतवादी करायची हे कुठल्या तत्त्वात बसते? अर्थात, जितेंद्र आव्हाड यांसारख्या गुंडगिरी प्रमाण मानणाऱ्या मंत्र्याचेही काही तत्त्व वगैरे असेल, असे समजणे खुळेपणाच! मात्र, 'आपण अहिंसेचे तत्त्व पाळतो,' अशी विधाने आव्हाडांकडूनच ट्विटर, फेसबुक, मुलाखत, भाषणांच्या माध्यमातून सातत्याने समोर आलेली आहेत. तथापि, जितेंद्र आव्हाड यांच्या झुंडशाहीने ते अहिंसेचे तत्त्व केवळ जनतेसमोर अभिनय करण्यासाठीच उच्चारत असल्याचे आणि प्रत्यक्ष जीवनात अहिंसेला मूठमाती देणारी कृत्येच करत असल्याचे स्पष्ट होते. आव्हाड स्वतःला 'संविधानाचे पाईक' म्हणवून घेतात, त्यांच्या बोलण्यात संविधानाचा वारंवार उल्लेख येतो. परंतु, संविधान, संविधानाची जपमाळ ओढणाऱ्या आव्हाडांच्या मवाली टोळक्याने त्यांच्याच समोर संविधानाची हत्या केली. संबंधित तरुणाला लाठ्या-काठ्यांनी फोडून काढले, तेव्हा आव्हाड जल्लोष साजरा करण्यात मश्गूल राहिले. संविधानाधारित न्यायव्यवस्थेला फाट्यावर मारुन स्वतःलाच न्यायाधीशाच्या खुर्चीत बसवून जितेंद्र आव्हाडांनी ठोकशाही राबवली. म्हणजेच ओठावर नाव संविधानाचे आणि डोक्यात किडे हुकूमशाहीचे असे आव्हाडांचे एकंदरीत वर्तन असल्याचे सिद्ध होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अशी व्यक्ती स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस म्हणवून घेते, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचा 'बाप' म्हणते. अर्थात कोणी कोणाला 'बाप' म्हणावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. परंतु, जितेंद्र आव्हाडांची कामगिरी पाहता त्यांची पात्रता संविधानाच्या शिल्पकाराचे नाव घेण्याइतकीही नाही, मग 'बाप' मानणे तर दूरचीच गोष्ट!

 

आव्हाडांनी आपल्या १५-२० पंटरांकडून एका सर्वसामान्य व्यक्तीला मरेस्तोवर मारले, घटना घडून ४८ तास उलटले, पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर एका शब्दानेही बोललेले नाहीत. घटनाही फार काही लांब नाही, तर मुख्यमंत्र्यांच्याच नाकाखाली आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातच घडली. तथापि, दररोज फेसबुकवर येऊन कॅरम खेळा, पत्ते खेळा, असे सल्ले देणारे मुख्यमंत्री कदाचित अतिश्रमाने थकले असतील आणि श्रमपरिहार्थ झोपलेलेही असतील, त्यामुळे त्यांना ही घटना समजलीही नसेल. पण, आता त्यांनी खडबडून जागे झाले पाहिजे. कारण, ते राज्याचे मुख्य कारभारी आहेत आणि जनता-जनार्दनाचे रक्षण करणे हे त्यांचे घटनात्मक दायित्व आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही जनतेला दिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत राज्यात आता शिवशाही अवतरल्याची भावनाही त्यावेळी ठाकरे आणि शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. मात्र, शिवशाही बाजूलाच राहिली, शिवरायांच्याच चैत्र पौर्णिमेला असलेल्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचे सहकारी जितेंद्र आव्हाडांनी अवघ्या महाराष्ट्राला राज्यातल्या मोगलाईचे दर्शन घडवले. सर्व कायदे-कानून, नियमांहूनही आपण वरचढ असल्याचे दाखवून देत आव्हाडांनी समांतर सरकार चालवले. मंत्रिपदाची शपथ घेताना जितेंद्र आव्हाड यांनी संविधानालाच समोर ठेवले होते, पण आता त्यांनी संविधानिक पदाची आणि जबाबदारीचीच लक्तरे वेशीवर टांगली. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आव्हाडांबद्दल तोंडातून 'ब्र'ही काढताना दिसत नाहीत. जितेंद्र आव्हाडांनी तर आपल्या कामातून संविधानावर विश्वास नाही व म्हणूनच कायदा हाती घेतला, हे सांगितले, पण उद्धव ठाकरेंनाही संविधान मान्य नाही का? हा प्रश्न निर्माण होतो. कारण, संविधानाचा अपमान आणि स्वतःच न्यायनिवाडा करणाऱ्या प्रवृत्तीला त्यांनी अजूनही धारेवर धरलेले नाही. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, माधव भांडारी, संजय केळकर आदी भाजप नेत्यांनी मागणी करूनही आव्हाडांना त्यांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ केलेले नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचीही या सगळ्या प्रकाराला मूकसंमती असल्याचे म्हणावे लागेल. तसे नसेल तर झोपलेल्या मुख्यमंत्र्यांनी जागे व्हावे आणि कठोर निर्णय घेत खमकेपणाचा दाखला द्यावा, अन्यथा राज्याला कणाहीन शासक लाभल्याचेच स्पष्ट होईल.

 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी झाल्या प्रकारावर स्पष्टीकरणही दिले. अनंत करमुसे यांच्या फेसबुकवरील मीमसारखा प्रकार कितपत सहन करायचा, असा सवाल त्यांनी केला. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीतच असे का होते वा का घडते, हा खरा मुद्दा आहे. आव्हाड असे काय करतात की, ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मस्तकात तीडिक जाते, तो संतप्त होतो? याचाही विचार केला पाहिजे. जितेंद्र आव्हाडांच्या आतापर्यंतच्या राजकारणातूनच त्याची उत्तरे मिळतात आणि पुरोगामी, धर्मनिरपेक्षतेचा आव आणणारा हा मनुष्य पक्का जातीयवादी असल्याचे उघड होते. मुखातून जात-धर्म संपवून मानवतेचा घोष करायचा पण बारा महिने अठरा काळ एका समाजासमोर दुसरा समाज कसा उभा राहील, याचे बेत आखायचे असा आव्हाडांचा खाक्या आहे. देशातील हिंदुत्ववादी व्यक्ती, संस्था, संघटनांना संबंध असो वा नसो दूषणे देत बोंबा मारायच्या हा जितेंद्र आव्हाडांचा जन्मभर पुरणारा कार्यक्रम आहे. 'मनुवाद, मनुवाद' म्हणत बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांना नाकारायचे आणि प्रतिमाभंजन करायचे हा आव्हाडांचा आवडता उद्योग आहे. जितेंद्र आव्हाडांची विविध कार्यक्रमातील, सभांतील विधाने तपासून पाहिल्यास त्याची तत्काळ खात्री पटते. आपल्या असल्या कारवायांतून आव्हाडांना केवळ हिंदुत्ववाद्यांना गुन्हेगार ठरवायचे असते आणि द्वेषाचा विखार पसरवायचा असतो. अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकाराआधी जितेंद्र आव्हाडांनी आपल्या याच मानसिकतेचा परिचय करुन दिला होता. "येत्या १४ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रस्त्यावर येऊन साजरी केल्यास जसे दिल्लीतील 'तबलिगीं'नी कोरोनाचा प्रसार करण्यात हातभार लावल्याचे चित्र रंगवण्यात आले, तसेच आंबेडकरानुयायी रस्त्यावर आल्यानेे कोरोना वाढला, असे म्हणत मनुवादी जातसंघर्ष पेटवतील," असे आव्हाडांनी व्हिडिओसंदेशात म्हटले होते. खरे म्हणजे संपूर्ण देशाला कोरोनाच्या संकटात ढकलण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या, क्वारंटाईन केंद्रात शौच, महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तणुकीसारखे गलिच्छ प्रकार करणाऱ्या आणि धर्मवेडाच्या धुंदीत वावरणाऱ्या 'तबलिगीं'शी भक्तिभावाने आंबेडकरांचे स्मरण करणाऱ्यांची तुलना करणे ही विकृतीच, पण ती जितेंद्र आव्हाडांनी केली. म्हणूनच आव्हाडांनी आधी आत्मपरीक्षण करावे आणि एखाद्याला आपल्याविषयी मिम वा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोणत्याही थराला का जावेसे वाटते, हे तपासावे. जितेंद्र आव्हाडांनी तसे केल्यास, स्वतःच्या मनातली इतरांप्रतिची दुर्गंधी, द्वेष फेकून दिल्यास नक्कीच त्यांच्याबद्दल कोणी वेडेवाडकडे बोलणार वा लिहिणार नाही.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.