घरबसल्या कामाचे फायदे

    दिनांक  08-Apr-2020 21:18:24   
|


work-from-home_1 &nb


'गार्टनर' या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेचे नवे पैलू उघड झाले आहेत. कोरोना संकट काळात ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'घरातून काम' करण्याची मुभा दिली, अशा जगभरातील कंपन्यांमधील उच्चपदस्थ ३१७ अधिकाऱ्यांचे प्रश्नावलीद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आले.


कोरोनारुपी एक विषाणू संपूर्ण जग थांबवू शकतो, याचा अनुभव सर्वांना काही दिवसांत आला. चीनमध्ये सर्वकाही पूर्ववत होत असले तरीही अमेरिका, युरोप आणि इतर देशांनी 'लॉकडाऊन' परिस्थिती कायम ठेवली आहे. या काळात नोकरदारवर्गाला 'वर्क फ्रॉम होम' अर्थात 'घरून काम' करण्याची मुभा देण्यात आली. 'गुगल', 'मायक्रोसॉफ्ट'सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या असो वा अन्य कुठलाही लहानमोठा उद्योग, आज जगातील बहुतांश नोकरदार हे घरून काम करत आहेत. रोजच्या रोज आपल्या कामाचे अपडेट्स वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे, ई-मेल्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर आवश्यक त्या गोष्टींचा ससेमिरा रोजच्या रोज सुरूच आहे.

 

'लॉकडाऊन' सुरू झाल्यापासून घरच्या घरीच लॅपटॉप सुरू करून दिवसाच्या कामाची सुरुवात होते. इंटरनेटची मंदावलेली गती, घरातील लहानग्यांचा गोंधळ, घरातील इतर कामे अशा अडथळ्यांवर मात करत करत तुम्ही काम संपवलेलेही असते. मात्र, दिवसाअखेर तुमच्या लक्षात येते की, काहीही असो, पण आपल्या कामाची गती काही अपवाद सोडले तर तीच आहे. साधारणतः सायंकाळी काम आटोपून झाल्यावर आपल्याकडे प्रवासात वाया जाणारा बराचसा वेळ वाचल्याचे लक्षात येईल. कार्यालयात न गेल्याने वेळ, पैसा, ऊर्जा आदी गोष्टींची बचत आपसूकच झालेली असतेच. मात्र, या गोष्टींचा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, कंपनी मालकांनी कसा विचार केला असेल हेदेखील समजून घेतले पाहिजे.

 

'गार्टनर' या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेचे नवे पैलू उघड झाले आहेत. कोरोना संकट काळात ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'घरातून काम' करण्याची मुभा दिली, अशा जगभरातील कंपन्यांमधील उच्चपदस्थ ३१७ अधिकाऱ्यांचे प्रश्नावलीद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात अनेक सकारात्मक गोष्टी उमगल्या असून भविष्यात सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्या या बाबींना डोळ्यासमोर ठेवून नोकरभरती करू शकतो किंवा कर्मचाऱ्यांसाठी या प्रकारचे नवे प्रारुप तयार करू शकतो. खर्चातील कपात करण्यासाठी बहुतांश कंपन्यांनी पाच दिवसांचा आठवडा, अशी संकल्पना निवडली. मात्र, 'लॉकडाऊन'च्या काळात घरबसल्या काम केल्याने काहीही न अडणाऱ्या कंपन्या आता कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने घरून काम करण्याची परवानगी देऊ शकतात. या सर्वेक्षणातील ७४ टक्के अधिकाऱ्यांच्या मते, अशा प्रकारे काम केल्याने कंपन्यांच्या संसाधनांवर होणाऱ्या खर्चात कपात होते. दैनंदिन लागणारे खर्च अचानक बंद होत असल्याचेही आढळून आले.

 

कर्मचाऱ्यांचा प्रवासातील वेळ वाचल्याने स्वखुशीने जास्त वेळ काम करणाऱ्यांचीही संख्या अधिक असल्याचेही या वरिष्ठांच्या निदर्शनास आले. 'लॉकडाऊन'मुळे कामाचा व्याप कमी होईल, उत्पादकता मंदावेल, अशी भीती मालकांना होती. मात्र, या काळातही ज्या ज्या कंपन्यांना कार्यालयीन काम शक्य होते, त्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर काहीच परिणाम जाणवलेला नसल्याची बाबही निदर्शनास आली आहे. तसेच आगामी काळात कर्मचाऱ्यांची भरतीही याच प्रकारे करण्यात येईल आणि जे सध्याचे नोकरदार आहेत, त्यांनाही गरजेनुसार सवलती येत्या काळात देण्यात येतील, असे ८१ टक्के अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, 'लॉकडाऊन'च्या परिस्थितीत कर्मचारी कार्यालयात न आल्याने कामावर दीर्घकालीन परिणाम जाणवेल, अशी भीतीही ७१ टक्के जणांनी व्यक्त केली. 'वर्क फ्रॉम होम'मुळे कामातील सातत्य भंग पावत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, ही बाब जरी खरी असली तरीही 'वर्क फ्रॉम होम'मुळे होणाऱ्या इतर फायद्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. 'लॉकडाऊन' ही एक संधी असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले. कोरोनामुळे आलेली 'लॉकडाऊन'ची परिस्थिती मैलाचा दगड ठरू शकते, अशीही शक्यता आहे. 'एक आभासी कार्यालय' ही संकल्पना आता नव्याने रूजू पाहत आहे. यापूर्वी असे प्रयोग जगभरात झाले असतीलही; मात्र मोठ्या संख्येने त्यावर अंमलबजावणी होण्याची ही पहिली वेळ आहे. यापुढे नव्याने सुरू होणारे उद्योगधंदे अशा स्वरुपात मनुष्यबळाचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेक्सॉस विद्यापीठातील संशोधनकर्त्यांच्या मते, ही एक नवी धारणा आहे. यामुळे पैसा आणि वेळ बचत तर होईलच, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने या गोष्टी फायद्याच्या ठरतील. त्यामुळे घरून केलेले काम म्हणजे बदल्या 'वर्क कल्चर'चे एक पुढचे पाऊल म्हणायला हरकत नाही!

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.