कोरोना अपडेट; स्पाईसजेटच्या विमानाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

    07-Apr-2020
Total Views |
 spicejet _1  H
 
 

दिल्ली ते चेन्नई दरम्यान उड्डाण

मुंबई (प्रतिनिधी) - लाॅकडाऊनमुळे खासगी विमानसेवा बंद असल्याने आता या विमांनाचा वापर मालवाहू विमान म्हणून करण्यास सुरुवात झाली आहे. स्पाईसजेट या खासगी कंपनीचे विमान आज ११ टनांचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन दिल्ली ते चेन्नई दरम्यान उड्डाण केले. एखाद्या नागरी उड्डाण विमानाचा मालवाहू विमानासारखा उपयोग केल्याचे हे देशातील पहिलेच उदाहरण आहे.
 
 
 
सध्या लाॅकडाऊन सर्व राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय नागरी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या परिस्थितीत खासगी कंपनीने आता नागरी उड्डाणांच्या विमानांचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरी उड्डाणाच्या विमानांमधून करण्यासाठी स्पाईसजेटने 'नागरी उड्डाण मंत्रालया'कडून परवानगी मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर कंपनीने बोईंग ७३७ हे विमान मालवाहुतकीसाठी तयार केले आहे. आज या विमानाने दिल्ली ते चेन्नई दरम्यान ११ टन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला.
 
 
 
 
आज दिवसभरात हे विमान पाच वेळा सामानांची ने-आण करणार आहे. गेल्या महिन्यात कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन सुरू झाल्यापासून स्पाईसजेटने २०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहूक विमानांनी जवळपास १,४०० टन जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक केली आहे. प्रवासी कक्षामधून सामानाची ने-आण करण्यासाठी फ्लेम-प्रफू मटेरियलपासून तयार केलेले सीट कव्हर वापरण्यात येत आहेत. तसेच जागेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रवासांच्या डोक्यावर असणाऱ्या खणाचा देखील वापर करण्यात येत आहे. आज स्पाईसजेटच्या विमानाने चेन्नई ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली या दरम्यान विमानवाहतूक होणार आहे.