ठाण्यात लॉकडाऊनचे नियम कडक!

07 Apr 2020 13:07:30
thane lockdown_1 &nb

भाजीपाला दुकानं बंद मात्र ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार इथे मिळणार किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी



ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कळवा आणि मुंब्रा भागात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता प्रशासनाकडून या भागात संचारबंदी अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कळवा भागात मेडिकल स्टोअर्स वगळता दूध, किराणा माल, भाजीपाला यांची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले आहेत. तर, ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार नियोजित दुकानांमधून किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी देण्यात येणार आहेत. यासाठीचे संपर्क क्रमांक ठाणे महानगरपालिकेने ट्विटरवर शेअर केले आहेत. नागरिक या क्रमांकांवर संपर्क करून त्यांना हव्या असलेल्या जीवनावश्यक वस्तू घरपोच मागवू शकतात.





पुढील निर्णय होईपर्यंत ही कडक पावले उचलली जाणार आहे. दरम्यान कळवा आणि मुंब्रा प्रभाग संपूर्णत: लॅाकडाऊन करण्याबाबत स्थानिक नगरसेवक आणि पोलिसांशी समन्वय साधून निर्णय घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. दरम्यान काल त्यांनी स्थानिक स्थितीचा आढावा घेतला आहे. ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा भागातील परिस्थितीवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.


कळवा, मुंब्रा परिसरामध्ये २२ पैकी १२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचे वारंवार आवाहन केले जात होते. मात्र, नागरिक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे पाहून प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ठाण्याप्रमाणेच कल्याण, डोंबिवली परिसरामध्येही आता अशाप्रकारे कडक नियम लावले जाणार आहेत. सध्या भारतामध्ये कोरोना व्हायारसचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडण्याची मुभा आहे.
Powered By Sangraha 9.0