लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हे!

07 Apr 2020 12:22:57

cyber crime_1  



पोलिसांनी जनतेला दिला सतर्कतेचा इशारा


मुंबई : मुंबई सायबर पोलिसांनी सोमवारी सायबर हल्ल्यांपासून सावध राहण्यासाठी जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेत अनेकांना ऑनलाइन गंडा घातला जात आहे, त्यामुळे लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे.


लोक घरात असल्याने ऑनलाइन बँकेचे व्यवहार पूर्ण करत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत आहेत. बँक कर्मचारी बोलत असल्याचे भासवून लोकांकडून बँक खात्याची माहिती, ओटीपी मागून घेतला जात आहे, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली. त्यामुळे असे फोन आले तर सावध राहा, खबरदारी घ्या अशा सूचना सायबर पोलिसांनी दिल्या आहेत.


गेल्या दहा दिवसांत सायबर पोलिसांकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगार लोकांना मेसेजद्वारे Anydesk, Quick Support, Airdroid, Team Viewer सारख्या अॅपलिकेशनची लिंक पाठवत आहेत. या लिंक ओपन केल्यानंतर व्यक्तीचे फोन हॅक करुन त्यांच्या बँक खात्याच्या डिटेल्स चोरल्या जात आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
Powered By Sangraha 9.0