परळ बेस्ट वसाहतीत कोरोनाचा शिरकाव

07 Apr 2020 16:58:19

best_1  H x W:
 
 
मुंबई : परळ येथील बेस्ट कामगारांच्या वसाहतीतही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली असून इमारत सील करण्यात आली आहे. या प्रकारानंतर आता बेस्ट उपक्रमाच्या इमारतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाची मुंबईत सर्वात मोठी वसाहत अशी परळच्या वसाहतीची ओळख आहे. या वसाहतीत राहणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्याची मुलगी काही दिवसांपूर्वी घरच्यांना भेटण्यास म्हणून आली होती. त्यावेळी तिच्यात कोरोनाची लक्षणे असल्याचे समोर आले नव्हते. परंतु घरी गेल्यावर तिला व तिच्या नवऱ्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर तपासणी केली असता दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
 
 
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच इमारत सील करण्यात आली. या इमारतीत ६० कुटुंबे राहतात. इमारत निर्जंतुक करण्यात आली आहे. तर त्या कर्मचाऱ्यांसोबत राहत असलेल्या इमारतीतील इतर रहिवाशांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. परळ वसाहतीत इतर कोणाला ती मुलगी भेटली होती का, कोणाच्या संपर्कात आली होती का, याचा शोध पालिका आरोग्य विभागातील कर्मचारी घेत आहेत.
 
 
मुंबईत कुलाबा, ससून डॉक, घाटकोपर, वडाळा, कुर्ला, सांताक्रूझ, मालाड, बोरिवली आदी ठिकाणी बेस्ट कामगारांच्या वसाहती आहेत. सध्या बेस्ट उपक्रमातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला कुठलाही धोका होऊ नये, यासाठी सगळ्याच वसाहतीतील कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना विषाणूची बाधा पोहोचल्याच्या वेळेपासून कर्मचाऱ्यांमध्ये काळजी घेण्याबाबत समाज माध्यमांमार्फत जागृती करण्यात येत असल्याचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0