
‘लॉकडाऊन’मुळे जगभरातील प्रमुख शहरांसह देशाची आर्थिक राजधानी, मायानगरी मुंबईही ओसही पडली. पण, कोणे एकेकाळी अशाच ओसाड मुंबईला आकार दिला तो नाना शंकरशेठ यांनी... तेव्हा, मुंबईचे शिल्पकार, शैक्षणिक कार्यात ज्यांनी अमूल्य योगदान दिले, त्या नाना शंकरशेठ यांचे स्मरण करुया...
मुंबईच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे मुंबईचे शिल्पकार म्हणजे नाना शंकरशेठ. नाना शंकरशेठ म्हणजेच जगन्नाथ शंकरशेठ हे एक अत्यंत गुणी व्यक्तिमत्त्व. त्यांनी दोन शतकांपूर्वी मुंबईत अनेक लोकहितकारी विकासकामे आणि शिक्षण क्षेत्रातील कामांतून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. नानाजींचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण कुळात आणि पिढीजात धनिक कुटुंबात झाला. ते मुरबाड येथे जन्मले व त्यांचे संपूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे असे होते. त्यांचा जन्मदिन व स्मृतिदिन अनुक्रमे १० फेब्रुवारी, १८०३ व ३१ जुलै, १८६५ असा आहे. नानाजी हे वाडवडिलांच्या पेशाहून भिन्न प्रकाराच्या उद्योगात रमले आणि त्यांनी मुंबईत व्यवसाय उद्योगधंद्यांची अनेक कामे केली आणि समाजात नाव कमावले. व्यापारी जगतातील अरबदेशीय, अफगाणदेशीय आणि इतर परदेशी व्यावसायिकांच्या मनामध्ये त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी एक पक्के स्थान मिळविले. या परदेशी व्यावसायिकांचा नानांवर बँकेपेक्षा इतका विश्वास बसला की, त्यांनी त्यांचे मौल्यवान धन बँकेपेक्षा नानांकडेच ‘ठेव’ म्हणून ठेवले. त्यातून नानाजींनी उच्च व्यावसायिक म्हणून नाव कमावले. त्यांनी मुंबईच्या वास्तूंचे व अनेक संस्थांचे महत्त्व वाढीस आणले व अनेकांना मदत केली. नानांचे वडीलसुद्धा सावकारी पेढी चालवत असत. ब्रिटिश व ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे प्रतिनिधी नानांच्या बरोबर आर्थिक व्यवहार करत. असे म्हणतात की, नानांकडे त्या काळात १८ लाखांची संपत्ती होती. नाना गिरगावच्या एका वाड्यात राहत असत. तो वाडा पाडून आता तेथे उंच इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे.
नानाजींनी मुंबईतील विविध संस्थांकरिता विशेषत: शिक्षणक्षेत्रातील प्रांतात भरघोस कामे केली. त्यांनी शिक्षणक्षेत्रात सुधारणा व विकास घडविण्याकरिता ‘वेस्टर्न इंडिया’सारख्या संस्थेची उभारणी केली. या संस्थेचे नावे काही काळानंतर बदलून १८२४ मध्ये तिला मुंबईचे ‘नेटिव्ह स्कूल’ व १८४० मध्ये तिला लोकशिक्षणातील ‘बोर्डसंस्था’ म्हणू लागले. १८५६ मध्ये या संस्थेची लोकप्रियता इतकी वाढली की, तिला लोक ‘एल्फिस्टन इन्स्टिट्यूशन’ म्हणायला लागले. त्याकाळी या संस्थेमधून उच्चशिक्षण प्राप्त केलेले बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर इत्यादी मोठ्या व्यक्तिमत्त्वांचे विद्यार्थी या नानाजींच्या शिक्षण संस्थेला लाभलेले होते. या संस्थेच्या विस्तारित संस्थेमध्ये नंतरच्या काळात गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक असे अनेक पुढारी ‘जन एल्फिन्स्टन कॉलेज’मध्ये विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होते.
विद्यार्थी वर्गाच्या पुढाकारातून ‘स्टुडंट लिटररी व सायंटिफिक सोसायटी’ने मुलींची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आणला होता. तेव्हा काही मान्यवरांच्या विरोधाला न जुमानता नानाजींनी या प्रथम प्रस्ताव करण्यात आलेल्या मुलींच्या शाळेला मोठ्या प्रमाणात निधी पुरवून मदत केली. तसेच इंग्लिश स्कूल, संस्कृत पाठशाळा आणि संस्कृत वाचनालय इत्यादी शिक्षण संस्थाही गिरगाव भागात नानांनी सुरू केल्या.
पहिल्या रेल्वेचे ‘नाना कनेक्शन’
भारतात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी नानाजींनी ब्रिटिशांना मदत केली. १८४५ पासून नानाजींनी ब्रिटिश अधिकार्यांबरोबर व सर जमशेठजी जीजीभाय यांच्या बरोबर सहकार्य करून, भारतात रेल्वेसेवा (खपवळरप ठरळश्रुरू ईीेलळरींळेप) आणण्याचे महत्कार्य केले. देशात रेल्वे सुरू करण्याची कल्पना नानाजींची होती व ती कल्पना प्रत्यक्षात रुळावर आणण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. या प्रयत्नांती देशात ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे असोसिएशन’ स्थापन झाली आणि या रेल्वेच्या संचालकांमध्ये ब्रिटिश अधिकार्यांबरोबर जीजीभाय व शंकरशेठ हे दोघे भारतीय संचालक जीआयपी रेल्वेच्या दहा संचालकांमध्ये म्हणून नेमले गेले. जेव्हा मुंबईत १९५३ मध्ये प्रथम रेल्वे सुरू झाली, तेव्हा नानाजींनी स्वत: मुंबई ते ठाणे रेल्वेप्रवासामध्ये सहकार्यांबरोबर प्रवास केला. त्यावेळी त्या प्रवासाला सुमारे ४५ मिनिटांचा अवधी लागला.
नानाजींचे इतर महत्त्वाचे उद्योग-व्यवसाय
नाना शंकरशेठ, सर जॉर्ज बर्डवूड आणि डॉ. भाऊ दाजी लाड हे सर्वजण १८९७ मध्ये मुंबई शहरामध्ये सुरू झालेल्या मोठ्या बांधकाम कामांचे कर्तेधर्ते. या तिघांनी मिळून लोकांच्या सोईकरिता शहरात अनेक प्रशस्त रस्त्यांचे जाळे निर्माण केले. यात अनेक चौक केंद्रस्थानी ठेवले. नानांना मुंबईच्या ‘लेजिस्लेटिव्ह कौन्सिल’मध्ये ‘एक्सएक्सटीव्ही-२६’ नामांकनधारित म्हणून प्रथमच कोणा भारतीयाला संधी दिली गेली. तसेच ते शिक्षण क्षेत्रातील बोर्डाचे सदस्य व मुंबईच्या ‘एशियाटिक सोसायटी’चे सदस्य होते आणि त्यांनी अनेक सार्वजनिक इमारती जे. जे. हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, एल्फिन्स्टन कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, पाणीपुरवठा योजना, आरोग्य यंत्रणा, रस्त्यावरचे दिवे, पालिकेची स्थापना इत्यादी कामे करुन मुंबईचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यामुळे मुंबई शहर खर्या अर्थाने ‘सार्वजनिक’ बनले. त्यामुळे मुंबईला आर्थिक राजधानी बनविण्यात नानांचे अमूल्य योगदान खरंच अविस्मरणीय आहे.
त्यानी ग्रँट रोडला थिएटरकरिता शाळा व भूखंडाची देणगी दिली आणि सतीची चाल बंद करण्यासाठी सर जॉन मालकॉम यांच्याबरोबरच्या संपर्काकरिता व सतीची प्रथा बंद करण्याचे इप्सित साधण्यासाठी मोठे प्रयत्न केले. याशिवाय हिंदू समाजाच्या सोईकरिता सोनापूरच्या (ारीळपश श्रळपशी) स्मशानभूमीच्या व्यवस्थेकरिता यशस्वी प्रयत्न केले. नानाजींनी आपल्या मालकीची सर्व जमीन उदारपणे सार्वजनिक कामाला दानधर्मात देऊन टाकली. अनेक सोसायट्या व संस्था काढल्या, ज्यांची खूप मोठी यादीच तयार होईल.
नानांनी १८४५ मध्ये एतद्देशियांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी ‘बॉम्बे स्टिमशिप नेव्हिगेशन’ कंपनी काढली. मराठी, हिंदी, गुजराती व्यावसायिक रंगभूमीचा पाया घालणार्या बादशाही नाट्यगृहाचा पाया रचला. शासकीय मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, मर्कनटाईल बँक, सेंट्रल बँक आदी बँकांची स्थापना केली. नानांच्या कर्तृत्वातून मराठी, गुजराती व देवनागरीत प्रथमच क्रमिक पाठ्यपुस्तके छापली गेली. त्यामुळे अनेकांची मातृभाषेतून शिक्षणाची सोय झाली.
१८५७च्या स्वातंत्र्य चळवळीत नाना शंकरशेठ यांचा हात आहे, म्हणून ब्रिटिश अधिकार्यांना संशय आला होता. तेव्हा नानांची चौकशीही झाली. पण, त्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य आढळून आले नाही. पुराव्याच्या अभावामुळे ब्रिटिशांची तशी खात्री झाल्यावर नानांची सुटका करण्यात आली. १८६५ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ग्रँट रोडच्या चौकात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा पुतळा उभारला गेला व त्या चौकाला ‘नाना चौक’ असे नाव दिले गेले.
नानांचे वडील बाबुलशेट गणबाशेट हे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात कोकणातून मुंबईला आले होते. तेव्हा त्यांना नानांच्या उद्योगपती म्हणून केलेल्या कामाकडे बघून अभिमान वाटला होता. मुंबईतील फोर्ट विभागातील ‘रुस्तोम सिध्वा मार्ग’ (गनबो स्ट्रीट) नानांच्या वडिलांचे नाव ‘गनबो स्ट्रीट’ असे त्यावेळी ठेवले गेले होते.
भायखळ्याचे ‘डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम’ (व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम) हे लंडनच्या सुप्रसिद्ध वास्तुविशारद यांनी त्याकरिता रचना व आराखडाकार म्हणून काम केले होते, पण त्या कामाच्या सहयोगात शिक्षणशास्त्रप्रवीण नानांसारख्या अनेक उद्योगपतींचा, डेव्हिड ससून व सर जमशेटजी जीजीभाय यांचा अंतर्भाव झालेला होता.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात नाना चौकाजवळ भवानी शंकर मंदिर आणि राम मंदिर बांधण्यात बाबुलशेठ व नानांचा पुढाकार होता. सध्या ही मंदिरे व घोडबंदरला बांधलेले ठाण्याजवळचे मंदिर शंकरशेठ कुटुंबीयांच्या ताब्यात आहेत.
भवानी शंकर मंदिराला ‘बेसॉल्ट ब्लॅक स्टोन’च्या देखण्या भिंती आहेत. स्टोनच्या चिरांमध्ये (सिमेंट त्याकाळात नसल्याने) चुना व गुळाच्या मिश्रणाने भरलेले आहे. हे मिश्रण इमारतीला सिमेंटपेक्षा जास्त भक्कमपणे टिकाऊपणा आणते. या मंदिरात अनेक कोरीव कामांची चित्रे दाखविलेली आहेत. हे मंदिर म्हणजे १८०६ मध्ये बांधलेले एक वारसास्थळ मानतात. २०० वर्षांपूर्वीच्या या मंदिराची २००२ मध्ये जुन्या कोकणी आराखडा व रचना राखून ते न बदलता दुरुस्ती करण्यात आली. या मंदिरात भव्य असा सभामंडप आहे. ओवरीत असलेली बाके बर्माटीकची आहेत. शंकराच्या मूर्तीबरोबर सर्प विराजमान आहे. छतावर घुमट बांधलेला आहे.
दरवर्षी दत्तजयंतीला भवानी शंकर मंदिरात समारंभ साजरा केला जातो. शिवाय महाशिवरात्रीला, श्रावण सोमवारी व त्रिपुरी पौर्णिमेला पण सण साजरे करतात. प्रवेशद्वारच्या दोन भव्य द्वीपमाळा सणांच्या दिवशी उजळल्या जातात.
जवळ जवळ मुंबईतील सगळ्याच प्रांतांमध्ये नानाजींनी छटा उमटविली आहे. नाना शंकरशेठ यांनी केलेले काम व दिलेले दान याला तोड नाही. मुंबईकरांनी एवढ्या मोठ्या मनाच्या नायकाचे कौतुक केले पाहिजे.
२ एप्रिलला पार पडलेल्या श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर आपण श्रीरामचंद्राची आठवण ठेवावयास पाहिजे व प्रभू श्रीरामाकडे कोरोना विषाणूंची उपद्रवता नष्ट होण्यासाठी आणि लवकरच सर्व व्यवहार पूर्ववत सुरू व्हावे म्हणून श्रीरामचरणी चिंतन करून प्रार्थना केली पाहिजे.