क्रिकेटमधील 'पाटलीणबाई'

07 Apr 2020 20:10:22
Anuja Patil _1  





अपार कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणार्‍या कोल्हापूरमधील अनुजा पाटील हिच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...

 

 
क्रिकेट या खेळाला भारतात अनन्यसाधारण महत्त्व. देशातील सर्वाधिक नागरिकांची याच खेळाला पसंती असून आजही प्रत्येक गल्लीबोळात हा खेळ खेळला जातो. 'क्रिकेटवेडा देश' म्हणवणार्‍या या भारताने दोनवेळा विश्वचषक आणि एकदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरत क्रिकेटविश्वात आपले एक वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात भारताचा एक वेगळाच दबदबा आहे. भारतीय खेळाडूंनी रचलेले विक्रम अद्याप कोणत्याही खेळाडूंना मोडता आलेले नाही. केवळ पुरुष क्रिकेटपटूंचीच नाही, तर महिलांनीही क्रिकेट विश्वातील भारताची वाटचाल यशस्वीरित्या पुढे सुरू ठेवली आहे.
 
 

ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या पहिल्याच 'टी-२०' विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास करत भारतीय महिलांनी क्रिकेट विश्वातील आपले अस्तित्व सिद्ध केले. त्यामुळे या संघातील महिला खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच! पुरुषांप्रमाणेच क्रिकेट विश्वात आपला एक वेगळा दबदबा निर्माण करणार्‍या भारतीय महिला संघातील अनेक खेळाडूंनी येथपर्यंत पोहोचण्यात आपल्या जीवनात जीवापाड मेहनत केली आहे. २७ वर्षीय अनुजा पाटील ही त्यांपैकीच एक. अपार कष्ट, जिद्द, आणि मेहनतीच्या जोरावर अनुजाने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले आहे. तिच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी असून ती कौतुकास पात्र आहे, यात शंकाच नाही.

 

अनुजा पाटील ही मूळची कोल्हापूरची. २८ जून, १९९२ रोजी कोल्हापूरमध्येच तिचा जन्म झाला. भारताच्या महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवणारी कोल्हापूरची ती पहिली खेळाडू ठरली आहे. कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असणारी अनुजा एके दिवशी मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू होईल, असा विचारदेखील कुणी केला नव्हता. मात्र, कोल्हापूरमधील या मुलीने आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पूर्णही केले.

 

अनुजाला अगदी लहानपणापासूनच खेळाची आवड होती. बालवयातच तिचे मन विविध खेळांमध्ये रमायचे. अभ्यासाची आवड तशी कमीच. मात्र, खेळांमध्ये मन अधिक रमत असल्याने ती लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला जाई. अनुजा ही जेमतेम पाच ते सहा वर्षांची होती, तेव्हापासूनच तिने मैदानी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. लहानपणी क्रिकेट खेळताना तिला फार काही वाटतही नव्हते. मात्र, ती मोठी होऊ लागल्यावर अनेकांनी तिला डिवचण्यास सुरुवात केली. 'क्रिकेट हा मुलींचा खेळ नाही. राष्ट्रीय स्तरावर काही महिला खेळत असल्या तरी श्रीमंत महिलांचेच ते चोचले. गावातील मुलींनी याचा नाद सोडायला हवा,' अशा प्रकारे टोचून बोलत अनेकांनी तिचे मानसिक खच्चीकरण केले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत मैदानावर खेळायला जाणे अनुजाने सुरूच ठेवले. मोठे होऊन आपल्याला क्रिकेटमध्येच करिअर करायचे आहे, असे अनुजाने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांना हा निर्णय न पटणारा होता. मात्र, मैदानावरील तिच्या क्रिकेटच्या कर्तृत्वाबाबत प्रशिक्षकांनी पाटील कुटुंबीयांना सांगितले. अनुजाची क्रिकेट खेळण्याची असाधारण शैली, विशिष्ट पद्धत ही फारच प्रभावी असून क्रिकेटमध्ये तिला करिअर घडविण्यासाठी वाव आहे, असे प्रशिक्षकांनी सांगितले. त्यानंतर घरातूनही तिच्या क्रिकेटमधील करिअरसाठी पाठिंबा मिळाला. येथूनच तिच्या प्रवासाची वाटचाल सुरू झाली.

 

कोल्हापूरमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ती जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा आदी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर २००९ साली महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली. येथेही अनुजाच्या उत्तम कामगिरीचा धडाका सुरूच राहिला. अष्टपैलू खेळाडू असणार्‍या अनुजाला संघाच्या नेतृत्वपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली. ही जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळत तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले. अनुजाच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांनीही घेतली.

 
 

भारतीय महिला संघाच्या 'अ' संघात तिला स्थान मिळाले. येथेही आपल्या कौशल्याच्या जोरावर अनुजाने या संघाचे कर्णधारपद मिळवले. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान यांसारख्या प्रतिपस्पर्धी संघांना धूळ चारण्यात यश मिळविल्यानंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात अनुजाला खेळण्याची संधी मिळाली. लहानपणी पाहिलेले स्वप्न अखेर प्रत्यक्षात पूर्ण झाले. यावेळी आनंद गगनात मावेनासा झाल्याच्या आठवणी आजही पाटील कुटंबीय आवर्जून सांगतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर अनुजाने आणखीन एक ध्येय निश्चित केले आहे. भारतीय महिला संघाला विश्वचषक मिळवून देण्याचा निर्धार अनुजाने केला असून यासाठी ती प्रयत्नशील आहे. पुढील वाटचालीसाठी तिला 'दै. मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा...!

 
 
 

- रामचंद्र नाईक

Powered By Sangraha 9.0