मुख्यमंत्री कारवाई करणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |


Jitendra Awhad_1 &nb

 


खरेतर तुम्ही रस्त्यावर उतरल्यास मनुवादी जातसंघर्ष पेटवत कोरोना तुमच्यामुळेच पसरला असे म्हणतील, या आव्हाडांच्या शब्दांत जातीयवादाचा इतका विखार दडलेला आहे की, अशांना चौकात उभे करून चाबकाने फटकावले पाहिजे.


परवाच एकाएकी सेक्युलर झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या चिरपरिचित शैलीत मानभावी, पण रोखठोकपणाचा आव आणत कोरोनाच्या निमित्ताने समाजात दुही माजवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गोड गोड धमकी दिली. धमकी गोड असली तरी महाराष्ट्रासारख्या गौरवशाली इतिहास असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने दिलेली असल्याने ती गांभीर्याने घेतली पाहिजे. परंतु, कोरोनाविरोधात अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, मात्र ज्यांच्यामुळे कोरोना सर्वाधिक पसरला त्यांच्याबद्दल चिडीचूप, असे राज्यातील सध्याच्या शासनाचे उफराटे धोरण असल्याचे गेल्या आठवडाभरातील घटनाक्रमावरुन दिसून येते. कसे? दिल्लीतील 'तबलिगी जमाती'ने आयोजित केलेल्या मरकजमध्ये सामील असलेल्यांच्या, त्यांनी घातलेल्या गोंधळाच्या बातम्या सारख्या-सारख्या दाखवू नका, असे शरद पवारांनी सोमवारीच प्रसारमाध्यमांना सांगितले. अशा प्रकारच्या वृत्तांमुळे सांप्रदायिक ज्वर, कलह वाढीस लागेल, असे म्हणणे पवारांनी फेसबुक लाईव्हमधून मांडले. शरद पवारांना कोणाचा बचाव करायचा आहे, हे त्यांच्या या विधानांतून तात्काळ लक्षात येते. तत्पूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख 'लॉकडाऊन' तोडणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी एका पोलिसाला वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत बोलावत त्याचा दंडुका दाखवत जनसामान्यांनी घरी बसले पाहिजे, असे म्हणाले होते. मात्र, त्याच गृहमंत्र्यांनी दिल्लीतील 'तबलिगी जमाती'च्या मरकजमध्ये सामील झालेल्यांनी स्वतःहून पुढे यावे, अशी विनंती काकुळतीला येत केल्याचे आपण पाहिले. म्हणजेच शरद पवार असो की अनिल देशमुख 'तबलिगीं'समोर मुळमूळीत भूमिका घेत असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात मनोबलवाढीसाठी घरातील विजेचे दिवे मालवून सर्वांनी एकभारतीयत्वाने पणत्या, निरांजने, दिवे, टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनावर मात्र राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी मूर्खपणा म्हणावा असा प्रतिवाद केला आणि सगळ्यांसमोर हसू करुन घेतले. मोदींना विरोध करताना या सर्वांनीच 'तबलिगीं'ना मात्र कधी ठोस शब्दांत फटकावले नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज इसापनीतीच्या गोष्टी सांगणाऱ्या आजीसारखी भाषांकुरांनी नटलेली प्रवचने देत असतात.

 

आता याच सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे वक्तव्य तपासले पाहिजे, हे मंत्री म्हणजे जितेंद्र आव्हाड. येत्या १४ एप्रिलला असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मनुवादाला शिव्याशाप घालत आव्हाडांनी दिल्लीतील 'तबलिगी जमाती'च्या मरकजचा व त्या घटनाक्रमाचा एका वेगळ्या अर्थाने या व्हिडिओ संदेशात उल्लेख केला आहे. दिल्लीत जे काही झाले, त्यावरुन मनुवाद्यांनी, जातीयवाद्यांनी धर्मद्वेष पसरवला, काम फत्ते केले, असे ते यात म्हणताना दिसतात. १४ तारखेलाही आंबेडकरानुयायी रस्त्यावर आल्याने, जमा झाल्याने कोरोना वाढला, असे म्हणत आपले अपयश झाकण्यासाठी मनुवादी जातसंघर्ष पेटवतील, कोरोनाला जातीय रंग देतील, असे भाकीत आव्हाडांनी यात केले आहे. “असे होऊ नये, कोणालाही आयते कोलीत मिळू नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागायला जाऊ नका, रस्त्यावर येत बँडबाजा, गाणी लावून जयंती साजरी करू नका, तर आपापल्या घरामध्ये तुमच्या-माझ्या बापाच्या म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर नतमस्तक व्हा,” असे जितेंद्र आव्हाडांनी या व्हिडिओत म्हटले आहे. वस्तुतः घरी बसून डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करा, असे साध्यासोप्या भाषेत आव्हाडांना सांगता आले असते. परंतु, ज्यांच्या राजकीय कारकिर्दीच जातीय विद्वेषाच्या खतपाण्यावर बहरल्या, त्यांच्याकडून असे कसे घडावे? खरेतर तुम्ही रस्त्यावर उतरल्यास मनुवादी जातसंघर्ष पेटवत कोरोना तुमच्यामुळेच पसरला असे म्हणतील, या आव्हाडांच्या शब्दांत जातीयवादाचा इतका विखार दडलेला आहे की, अशांना चौकात उभे करून चाबकाने फटकावले पाहिजे. व्हिडिओ संदेशातला आणखी संतापजनक प्रकार म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भक्तिभावाने स्मरण करणारी आंबेडकरी जनता आणि जगाच्या मानवतेसमोर प्रश्नचिन्ह म्हणून उभ्या राहिलेल्या धर्मांध इस्लामी पिलावळीची परस्परांसोबत केलेली तुलना!

 

'तबलिगी जमात' ही इस्लामची मूलतत्त्वे मुस्लिमांनी पाळावी व इस्लाममधील चांगल्या गोष्टींच्या अनुसरण आग्रहासाठी निर्माण झाल्याचे म्हटले जाते. मात्र, जे सर्वांसमोर सांगितले जाते, त्याहूनही 'तबलिगी जमाती'ची असलियत काही निराळीच आहे. जमियत-उलेमा-ए-हिंद, सिमी, जैश-ए-मोहम्मद यांच्याप्रमाणेच 'तबलिगी जमात' हीदेखील मूलतत्त्ववादी देवबंदी विचारांचेच अपत्य आहे. हजरत निजामुद्दीन व त्यांच्या वंशजांनी केलेल्या घाऊक धर्मांतरानंतरही अनेक धर्मांतरित मुस्लीम हिंदू चालीरितींचेच पालन करीत असत. अशा धर्मांतरितांच्या हिंदू धर्म पुनर्प्रवेशाची चळवळ १९२१ साली आर्य समाजाने सुरू केली होती. आर्य समाजाच्या शुद्धीकरण व धर्मोत्थानाच्या कार्याला मिळणाऱ्या यशाला उत्तर म्हणून 'तबलिगीं'चे काम उभे राहिले. आर्य समाजाच्या शुद्धीकरण चळवळीचे नेतृत्व त्यावेळी स्वामी श्रद्धानंद यांच्याकडे होते आणि त्यामुळेच त्यांची हत्या ही अब्दुल रशीद नावाच्या 'तबलिगी'नेच केली. मदरशांचा प्रभाव तिथून बाहेर पडल्यावर कमी होतो म्हणून मेवाती तरुणांना एकत्र ठेवण्याच्या व कट्टर इस्लामला अनुसरण्याच्या या प्रयोगाला वेळोवेळी यशही मिळाले. फाळणीच्या काळात दिल्लीतील धर्मांतरित मुस्लिमांकडे 'तबलिगीं'ना पाठविण्यात आले व ते चांगले मुस्लीम नसल्याने त्यांच्यावर अल्लाहचा कोप झाल्याचेही या संघटनेकडून ठसविण्यात आले होते. तर माझा देश, माझा प्रदेश, माझे लोक हे दुहीला जन्म देतात. आपण एकत्र राहणे गरजेचे आहे. इतर गट किंवा राष्ट्रांवर इस्लामी 'उम्मा'चे किंवा इस्लामी विश्वबंधुत्वाचे वर्चस्व असले पाहिजे, असे वक्तव्य तत्कालीन तबिलगीप्रमुख मौलाना मोहम्मद युसूफ याने ३० मार्च १९६६ रोजी केले होते.

 

दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणारे, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारे लाखो अनुयायी कित्येक वर्षांपासून आंबेडकर जयंती मोठ्या उल्हासाने साजरी करतात. औरंगाबाद आणि परिसरात तर संपूर्ण निळा जल्लोष पसरलेला असतो. निळे फेटे, निळे झेंडे आणि निळ्या गुलालाची उधळण सुरू असते. सोलापूरमध्ये भीमपथके विविध वाद्यांसह, लेझीमच्या तालावर आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकांत सहभागी होतात, तर मुंबईतदेखील आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी होते. मात्र, या उत्साहाची तुलना रक्तबंबाळ पद्धतीने जुलूस काढणाऱ्यांशी करणे हीदेखील एकप्रकारची तेढ निर्माण करणारी कीडच आहे आणि तेच काम जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या व्हिडिओतून केले. तथापि, अशा कितीतरी किडीचे प्रकार विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अंगावर सरपटत असले तरी ते झटकण्याची हिंमत त्यांच्यात नाही. कारण या किड्यांनी विणलेल्या कोषावरच त्यांचे सरकार अवलंबून आहे. आपल्या व्हिडिओत जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचा व सगळ्यांचा 'बाप' म्हटले. मंत्री झाल्यावर त्यांनी शरद पवार यांना आपला 'बाप' म्हटले होते. कागदपत्रात मात्र ते वडिलांचे नाव 'सतीश' असे लिहितात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणी कोणाला 'बाप' म्हणावे वा आपल्या नावासमोर 'बाप' म्हणून कोणाचे नाव लावावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, कोरोनासारख्या जगावर दाटलेल्या संकटातसुद्धा जे लोक गलिच्छ राजकारण करण्याचे सोडत नाहीत, अशांना मुख्यमंत्र्यांनी माफ करता कामा नये, हीच एक इच्छा!

 
 
@@AUTHORINFO_V1@@