तब्लीगी जमातने भारतीयांची जाहीर माफी मागावी : मुस्लिम सत्यशोधक मंडळ

06 Apr 2020 15:22:28

tablig_1  H x W

मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून मागणी


पुणे : तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून करण्यात आली आहे. दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे असे मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनी म्हटले आहे.


दिल्लीतील निजामुद्दीन इथे भरवण्यात आलेल्या 'मरकज'वरून देशात सध्या वादंग माजले आहे. लॉकडाऊननंतरही 'मरकज' सुरू राहिल्याने करोनाच्या फैलावाचा धोका वाढला आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्यास तलबिगी जमातची मरकज कारणीभूत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुस्लिम सत्यशोधक मंडळाने एक पत्रक काढले असून तबलिगी जमातवर जोरदार टीका केली आहे.


'तलबिगींच्या वर्तनाचे पडसाद सोशल मीडियात उमटले. धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकूर शेअर करण्यात आला. त्यामुळं समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुही माजवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. तसंच, पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी 'तबलिगींवर उपचार कसले करता? त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे, असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल व करोनाच्या फैलावाला कारण ठरल्याबद्दल तबलिगींनी माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0