कुठलंही संकट येवो ! देश एकसंध आहे हे नऊ मिनिटांनी दाखवलं

05 Apr 2020 21:17:29
Narendra Modi_1 &nbs
 


मुंबई : 'आओ फिर से दियाँ जलाए', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलच्या रात्रौ ९ वाजता एक दिवा लावून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एक सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर या रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून नऊ मिनिटांपर्यंत देशवासीयांनी आम्ही कुठल्याही संकटात एकत्र आहोत, हे दाखवून दिले. गरीब असो वा श्रीमंत, कुठलाही धर्मीय असो वा कुठल्या पंथाचा असो आज नऊ मिनिटांत मनाने एकत्रच असल्याचे दाखवून दिले आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. त्यामुळे कोरोनाच काय कुठलेही संकट आम्हाला हरवू शकणार नाही, अशी भावना रविवारच्या सायंकाळी प्रत्येकाच्या मनामनामध्ये दिसली. 
कोरोना विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारा प्रत्येकजण झटत आहे. समाजातील प्रत्येकजण घरी थांबून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. कुणी आपापल्या जमेल तशी मदत करत आहे. कुठे अन्नदान, कुठे वैद्यकीय तर कुठे अन्य कुठली लागेल ती मदत कोरोना संदर्भातील सर्व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या काळात एक दिवा या कोरोना विरोधात लढाईच्या प्रेरणेसाठी लावण्याचे आवाहन केले होते. घरातील दिवे नऊ मिनिटे बंद ठेवून टॉर्च, मोबाईल फ्लॅश बाल्कनीत येऊन चमकवण्याचे आवाहन केले होते. 
रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून देशभरातील सर्वच ठिकाणी एक दिवा कोरोना विरोधात लढाईसाठी लावण्यात आला. तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या दीपप्रज्वलाने एक आशेचा किरण जागा केला. देशातील प्रत्येक घराने विजेचे दिवे बंद करत बाल्कनीत पणत्या तेवत ठेवल्या. मुंबईतील उपनगरांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळला. दिल्लीसह सर्वच राज्यांतही हा कार्यक्रम करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0