डॉक्टरांवर दगडफेक झालेल्या भागात १० जणांना करोना

05 Apr 2020 12:09:50


indore_1  H x W



इंदूर : मध्यप्रदेशातील इंदूर येथील टाटपट्टी बाखल भागात संशयितांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. या भागात एकूण १० जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात डॉक्टरांच्या पथकावर १ एप्रिल या दिवशी दगडफेक करण्यात आली होती.आरोग्य विभागाने रात्री उशिरा जारी केलेल्या मेडिकल बुलेटीननुसार ३ आणि ४ एप्रिल रोजी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एकूण १६ जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या १६ जणांपैकी १० जण हे टाटपट्टी भागातील आहेत. या रुग्णांमध्ये ५ पुरुष आणि ५ महिला आहेत. हे १० जण २९ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील आहेत.



१ एप्रिल रोजी स्क्रिनिंगसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकावर इंदूरच्या टाटपट्टी बाखलमधील रहिवास्यांनी दगडफेक केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या या लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करत त्यांची रवानगी तुरुंगात केली.या घटनेवर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने डॉक्टर आणि त्यांच्या पथकाला सुरक्षा पुरवण्याबाबत राज्यांमधील सरकारांना पत्र लिहिले आहे. जे कर्मचारी आणि अधिकारी आरोग्यसेवेत काम करत आहेत
, अशांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात यावी, अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी दिली. यूपीपासून ते बिहारपर्यंत तसेच इतर राज्यांमध्येही डॉक्टरांवर हल्ले झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0