योग्य माहितीसाठी गुगलचे पाऊल

    दिनांक  05-Apr-2020 19:49:00   
|


google fact check_1 


विविध फॅक्ट चेकर्स आणि स्वयंसेवी संस्थांना गुगलच्या माध्यमातून मदत करण्यात येणार असल्याचे गुगलच्या वतीने नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ब्लॉगमध्ये सांगण्यात आले आहे.


आजच्या आधुनिक युगात सामाजिक संकटे आली असता सर्वात जिकिरीचे आणि महत्त्वाची बाब समोर येते ती म्हणजे त्या संबंधित घटनेची सत्य माहिती. एखादी घटना घडली असता, त्या घटनेबाबत येणारी माहिती ही इतकी पराकोटीची येत असते की, त्यातील नेमके सत्य काय हे समजणे मुश्कील होत असते. त्यामुळे सामाजिक शांतता, सौहार्दता यांना बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. तसेच, अतिशयोक्तीपूर्ण माहितीमुळे सामाजिक भीती आणि त्यातून निर्माण होणार्‍या इतर समस्यांची भर पडणे हे वेगळेच आव्हान समाजासमोर उभे ठाकत असते. अशावेळी योग्य आणि बिनचूक माहिती प्राप्त होणे, हे अत्यावश्यक असते. आधुनिक समाजाची हीच गरज ओळखून आता याकामी गुगलने पुढाकार घेतला आहे. घटनेची नेमकी सत्यता काय हे जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेकर्स आणि काही बिगर शासकीय संस्था यांना आता गुगल मदत करणार आहे. त्यातच सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाबाबत अनेकविध खोटी आणि अतार्किक माहिती वारंवार समोर येत आहे. या खोट्या आणि अतार्किक माहितीशी मुकाबला करण्यासाठी गुगल जवळपास ६५ लाख डॉलर खर्च करणार असल्याचे वृत्त आहे.याचा फायदा भारतासारख्या खंडप्राय देशाबरोबरच जगभरातील कोरोना विषाणूशी सामना करणार्‍या देशांनादेखील होणार आहे. गुगलच्या माध्यमातून उभारण्यात येणारी ही रक्कम कोरोना विषाणूशी संबंधित जगभरात उपलब्ध होणारी माहिती तथ्यांच्या आधारावर पडताळून पाहण्यासाठी वापरली जाणार आहे. यासाठी विविध फॅक्ट चेकर्स आणि स्वयंसेवी संस्थांना गुगलच्या माध्यमातून मदत करण्यात येणार असल्याचे गुगलच्या वतीने नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ब्लॉगमध्ये सांगण्यात आले आहे. अत्याधुनिक साधनांनी युक्त जगात वावरत असताना माहितीचा महापूर येणे
, हे स्वाभाविक आहे आणि अशा प्रकरचा महापूर येत असल्याचा प्रत्यय आपल्या हातातील स्मार्टफोन आपल्याला रोजच देत असतो. कोरोनासारखी जागतिक आपदा आली असता माहितीच्या महापुराचे माहितीच्या त्सुनामीत कधी रूपांतरण होईल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे या माहितीच्या अतिरेकामुळे लोकांना या महामारीशी निगडित विश्वसनीय माहिती मिळणेदेखील अवघड होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.कोरोनासारखी भीषण आपदा आल्यावर चुकीच्या माहितीपासून लोकांना वाचविणे आवश्यक असते. त्यासाठी समाजातील वैज्ञानिक
, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे यांनी पुढाकार घेत योग्य आणि तथ्यावर आधारित प्रतिक्रिया आणि बातम्या देणे हे आवश्यक असते. मात्र, जगभरात असे होताना दिसत नाही. त्यामुळे जगभरातील या खोट्या माहितीच्या विरोधात लढण्यासाठी कार्यरत असलेले फॅक्ट चेकर्स आणि ना नफा ना तोटासंस्थांच्या मदतीसाठी ६५ लाख डॉलरचा निधी गुगलच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे. विविध विषय गुगलच्या संकेतस्थळावर नागरिक कायमच शोधत असतात आणि त्यांना आपल्याजवळील उपलब्ध माहितीच्या आधारे गुगल उत्तरदेखील देत असते. त्यामुळे लोक ऑनलाईन सर्चिंगमध्ये जे विषय शोधत आहेत, ते विषय फॅक्ट चेकर्स आणि आरोग्य संघटनांनी निवडण्यासाठी त्यांना मदत करणे गरजेचे आहे. जेथे चांगली ऑनलाईन माहिती उपलब्ध होण्यात फरक आहे, तेथे अशा प्रकारची माहिती चिन्हांकित करण्याची आवश्यकता असल्याचेदेखील गुगलच्या वतीने सांगण्यात आले आहे.या कामासाठी भारतात
बम लाइव्हतर नायजेरियामध्ये आफ्रिका चेकयांच्याबरोबर भागीदारी करून डेटा लीड्सची मदत गुगलद्वारे करण्यात येणार आहे. गुगलच्या माध्यमातून उचलण्यात आलेले हे पाऊल लोकसंख्या जास्त असणार्‍या भारत, चीनसारख्या देशांबरोबरच, तुलनेने कमी विकसित असलेल्या आफ्रिका खंडातील देशांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणारे आहे. भारतात अपुर्‍या माहितीच्या आधारवर आणि ब्रेकिंग न्यूजच्या नादात काही प्रसारमाध्यमेदेखील सध्याच्या स्थितीत चुकीची माहिती प्रदान करताना दिसून येतात. तसेच, विविध समाजमाध्यमांवर देखील फॉरवर्ड करणारे तथाकथित माहितीचे उद्गाते आपले अस्तित्व दाखविण्यात अग्रेसर असतात. याचा अनुभव आपणा सर्वांना सर्रास येत असतो. अशा वेळी गुगलच्या माध्यमातून फॅक्ट चेकर्स आणि ना नफा ना तोटा तत्वावर कार्य करणार्‍या बिगर शासकीय संस्थांना आर्थिक पाठबळ देण्याचा घेण्यात आलेला हा निर्णय संयुक्तिक असाच म्हणावा लागेल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.