मराठीतला ‘शेर’ दक्षिणेतला ‘सव्वाशेर’

    दिनांक  04-Apr-2020 19:44:54
|


sayaji shinde_1 &nbs


मूळ मराठी असणारा, पण दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक हरहुन्नरी नट. जो खर्‍या अर्थाने मराठीतला ‘शेर’ आहे व आता दक्षिणेतला ‘सव्वाशेर’ आहे. असा मला भावलेल्या माणसांपैकी एक मनस्वी वृक्षप्रेमी कलावंत आणि आजचा आघाडीचा सुपरस्टार सयाजी शिंदे.दिवस कुठला, हे नेमकं मला आठवत नाहीये. नाहीतरी दिवसांच्या हिशोबाचा कंटाळा आहे मला. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. ‘कमळी’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. शिफ्ट सकाळी ७ वाजताची होती आणि हा माणूस चक्क सकाळी साडेसहा वाजता सेटवर हजर होता. कुठलाही लवाजमा नाही किंवा कुठलाही गर्व नाही. ‘एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.’ ‘व्हॅनिटी व्हॅन’ तयार असतानादेखील हा मनस्वी कलावंत झाडाच्या खाली खुर्ची टाकून बसला. सगळ्यांना ‘नमस्कार’, ‘गुड मॉर्निंग’ करत, कुठलंतरी पुस्तक वाचत होता. तेव्हा मला जाणवलं की, खर्‍या अर्थाने या कलाकाराचे हात जरी आभाळाला टेकलेले असले, तरी पाय मात्र जमिनीवर आहेत. मूळ मराठी असणारा, पण दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक हरहुन्नरी नट. जो खर्‍याअर्थाने मराठीतला ‘शेर’ आहे व आता दक्षिणेतला ‘सव्वाशेर’ आहे. असा मला भावलेल्या माणसांपैकी एक मनस्वी वृक्षप्रेमी कलावंत आणि आजचा आघाडीचा सुपरस्टार सयाजी शिंदे.


सयाजीची खरी ओळख सांगायची ठरली तर आठवतो त्याचा ‘शूल’ हा सिनेमा.सुरुवातीच्या काळात मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्याने ‘नेक’ काम करता करता शेवटी तो ‘खलनायक’ म्हणूनच लोकप्रिय झाला. आज मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू एवढचं काय अगदी कन्नड, मल्याळम या सिनेमांमधील खलनायकांची नावे आठवायची म्हटली तर या सर्व भाषांमधील सिनेमातील एका खलनायकाचे नाव ‘कॉमन’ असेल ते म्हणजे ‘सयाजी शिंदे’ यांचं. हा माणूस वेगळाच आहे. एकदम साधी राहणी, साधाभोळा चेहरा, पिळदार मिशा आणि चेहर्‍यावर गोड हास्य.असं त्याचं जरी वर्णन असलं तरी भूमिकेत शिरल्यानंतर त्याच्या आत कुठला ‘व्हिलन’ शिरतो ते माहित नाही; तो त्या भूमिकेतच जातो. त्याचं याबद्दल जितके कौतुक करावे तेवढे कमी आहे. कला त्याच्या रक्तातच भिनलीय. त्यामुळे १७ वर्षे बँकेत नोकरी करूनही नाटक लिहिणं अन् त्यात कामं करणं असं त्याचं सुरूच होतं. तिामळ, तेलुगू, कन्नड, इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा सहा भाषांतील नाटकं अन् चित्रपटांत त्याने काम केलंय. त्याने लिहिलेल्या ‘तुंबारा’ या नाटकाविषयी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहून आलं होतं. ‘सत्या’ मधील अभिनेता मनोज वाजपेयीच्या वाचनात तो लेख आला अन् त्यानं रामगोपाल वर्मांना ‘शूल’ मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याचं नाव सुचविलं. अर्थात, तेव्हा त्याला ना मनोज वाजपेयी जवळून ओळखत होता ना रामगोपाल वर्मा. पण, इथूनच सुरु झाला त्याचा बॉलीवूड प्रवास आणि तो ही खलनायक म्हणून.


योगायोगानं दाक्षिणात्त्य चित्रपटांत त्याच्या पदार्पणास ‘शूल’चं कारणीभूत ठरला. आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या, त्यात त्याच्या बँकेतील फोनचा मोठा वाटा आहे, असं तो हक्काने सांगतो. बँकेचा फोन खणखणला अन् त्याला ‘शूल’ची ऑफर आली. ‘शूल’मधला त्याने रंगवलेला ‘बच्चू यादव’ हा खलनायक अधिक भावला. म्हणून तर चक्क अभिनयाचा बादशहा ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन यांनी त्याला बँकेत फोन करून शुभेच्छा दिल्या.इतकंच नाही तर ‘आप बहुत नाम कमाओगे’ असे त्यांचे त्यावेळचे बोल आज खरे ठरले आहेत. कारण, त्यानंतर ‘शूल’ मधील काम पाहूनच त्याला दक्षिणेकडील चित्रपटात काम करण्याची ‘ऑफर’ आली अन् बघता बघता तो तिकडचा कधी झाला, हे त्यालादेखील कळलंच नाही. मला वाटतं यालाच बहुदा म्हणतात, ‘तो आला त्यानं पाहिलं अन् त्यानं जिंकलं.’‘शूल’मुळे दक्षिणेचा पहिलाच बिग बजेट चित्रपट त्याच्या नावावर जमा झाला. ‘सुब्रमण्यम भारती’ हे त्या तामिळ चित्रपटाचे नाव होते. आपल्याकडे संत तुकारामांना जसं आपण पूज्य मानतो, तसंच दक्षिणेकडे सुब्रमण्यम भारतींबद्दल दक्षिणेत श्रद्धा आहे.कवी, पत्रकार, आधुनिक विचारांचे परखड तत्वज्ञ अशी त्यांची ओळख आहे. ही मध्यवर्ती भूमिका साकारताना त्याला भाषेचा अडसर तर जाणवत होताच, पण त्याहीपेक्षा तिथल्या लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी त्याला या व्यक्तिरेखेस कौशल्याने वटवण्याच्या जबाबदारीचं दडपण अधिक होतं. पण, हळूहळू त्याने भाषेवर विजय मिळवला. या चित्रपटासाठी डबिंग करताना त्याचा आवाज तिथल्या लोकांना इतका आवडला की त्यानंतर त्याने अनेक तेलुगू चित्रपटांसाठी डबिंग केलंय. दक्षिणेकडील अनेक चित्रपटांत त्याने नायक-खलनायक अशा दुहेरी भूमिका केल्या आहेत. चिरंजीवी, रजनीकांत अशा दक्षिणेतल्या सुपरस्टार्ससोबतही काम केलंय. तिकडची सारी माणसं ‘डाऊन टू अर्थ’ अतिशय काळजी घेणारी, तुम्हाला समजून घेणारी आहेत. त्यामुळे केवळ तिकडच्या चित्रपटात काम मिळतंय म्हणून नव्हे; तर तिकडच्या लोकांच्या चांगल्या मनोवृत्तीमुळे तो दक्षिणेत अधिक रमला. चांगल्या भूमिका फार कमी लोकांच्या वाट्याला येतात; पण त्याबाबतीत सयाजी स्वतःला फार सुखी समजतो. आता मुंबईतील तामिळ, तेलगू भाषिकही त्याला आश्चर्याने विचारतात, ‘‘तुम्ही इथे कसे?” आता कधी कधी तो ही भांबावून जातो. पण, मग स्वतःलाच समजावतो, ‘‘मी मराठी दक्षिणेकडचा!”


‘शूल’मधील त्याने साकारलेला खलनायक ‘बच्चू यादव’ तळागाळातील अनेकांना आवडला. अनेक दिग्गज कलावंत व समीक्षकांनी त्याच्या या भूमिकेचे विशेष कौतुक केले. त्यानंतर ‘खिलाडी ४२०’ मधील त्याने रंगवलेला ‘गँगस्टर’ही अनेकांच्या लक्षात राहिला. त्यानंतर त्याने विविधांगी रोल करून स्वतःला सिद्ध केले व स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. ‘काबू’ मधील अण्णा असो वा ‘अंश’मधील गोविंद किंवा ‘कलकत्ता मेल’मधील लखन यादव वा ‘सौदा’ मधील ब्लकमेलर किंवा ‘सरकारराज’ मधील करुनेश कांगना अशा प्रत्येक भूमिका तो खर्‍याअर्थाने जगला. हिंदीमधील त्याने साकारलेले खलनायक हे गाजलेच, पण त्याहून तो अधिक रमला तो दाक्षिणात्त्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तामिळमध्ये त्याने ‘भारती’, ‘थोराणाई’, ‘अझागीया’, ‘धूल’, ‘थी’, ‘आधवन’, ‘वेट्टाइकरन’ आदी सिनेमांमधील त्याच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या.तेलगू सिनेमांमध्ये तर त्याने साकारलेले खलनायक हे खूपच गाजले. डॉन सिनू, ‘अथाडू’, ‘देवाडासू’ , ‘बॉस’, ‘गोडावा’ व ‘किक’ अशा काही गाजलेल्या सिनेमांची नावे सांगता येतील. ‘आर्या २’ सिनेमातील त्याची भूमिका सर्व स्तरातून वाखाणली गेली होती. जे काम करायचं ते अगदी मनापासून करायचं, या स्वभावामुळे त्याच्या भूमिकेत तो खरेपणा दिसून यायचा. त्याने मराठी, हिंदी, तामिळ व तेलगू सिनेमांबरोबरच कन्नड व मल्याळम भाषेतील सिनेमात काम केले. मराठीमध्ये तर त्याने मोजकेच चित्रपट केले. ‘बोकड’,’वजीर’, ‘कुंकू झालं वैरी’ व ‘दोन घडीचा डावयामध्ये त्याने साकारलेल्या खलनायकी भूमिका अनेकांच्या लक्षात राहिल्या. तसेच त्याने ‘डॅम्बीस’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ व ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ अशा काही आशयघन चित्रपटांची सहनिर्मिती केली.


दाक्षिणात्त्य चित्रपटांची स्तुती करत असताना आपल्या मराठी चित्रपटांविषयी त्याला कुतूहल नाही असं नाही. एक जमाना होता की, मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ होता अन् आजही पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते आहे, असे त्याला वाटते. काही काळाने पुन्हा मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत, असे त्याने हक्काने सांगितले. त्याने अनेक मराठी चित्रपटात काम केलंय. पण, मराठीत त्याला व्यावसायिकतेचा अभाव दिसला. रंगभूमी, चित्रपट, बॉलीवूड आणि दाक्षिणात्त्य चित्रपटनगरीचा सांग्रसंगीत प्रवास केल्यावर त्याला अधिक भावली ती दक्षिणेकडची चित्रपटनगरी अन् तिथला प्रेक्षकवर्ग. एवढ्या सर्व भाषेत काम करूनसुद्धा हा माणूस थकत नाही. त्याची सिनेमाच्या शूटिंगची भटकंती ही कायमच सुरु असते; पण शूटिंग नसताना देखील हा माणूस निसर्गात व्यस्त असतो. त्याचे वृक्षप्रेम सर्वांना माहीत आहे. मुलांचे वाढदिवस थाटामाटात साजरे होतात. आता आपण मोठ्या प्रमाणावर झाडं लावू. त्यांची काळजी घेऊ आणि झाडांचे वाढदिवस साजरे करू,’ अशी अभिनव कल्पना त्याला सुचली. पर्यावरणाशी असलेलं सुंदर नातं, दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत असलेलं काम, सह्याद्री वृक्षबँक आणि आरे कॉलनीविषयीची तळमळ त्याच्या बोलण्यातून प्रामाणिकपणे जाणवते.


वृक्ष हा सदृढ पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. वृक्ष लागवड
, संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलामधील त्याचे सकारात्मक कार्य अधोरेखित करण्यासाठी देशातील पहिले वृक्ष संमेलन मराठवाड्यात, बीड शहराजवळील पालवणच्या एकेकाळच्या उजाड डोंगरमाथ्यावर आता फुललेल्या नंदनवनामध्ये नुकतेच त्याच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यासाठी सयादादाने प्रचंड मेहनत केली. जीवाचं रान केलं आणि हे संमेलन यशस्वी करून दाखवलं. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने दिलेल्या दोनशे हेक्टर क्षेत्रात ‘सह्याद्री देवराई’ हा वृक्षलागवडीचा प्रकल्प त्याच्या मार्गदर्शनाखाली साकारला गेला.त्याने शासन, वृक्षप्रेमी आणि लोकसहभागातून ‘येऊन येऊन येणार कोण? झाडांशिवाय आहेच कोण?’ अशी घोषणा देत ग्रामीण युवकांमध्ये वृक्षप्रेम निर्माण करून या दुष्काळी क्षेत्रावर विविध प्रकारच्या साठ प्रजातींची तब्बल २ लाख ९० हजार ३१७ झाडे यशस्वीपणे लावली आहेत.अशी चित्रपटसृष्टीबरोबर सामाजिक क्षेत्रात त्याची वाटचाल कौतुकास्पद आहे. हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मुलखात ‘शेर’ असली तरी दक्षिणेकडे मात्र सारेच ‘सव्वाशेर’ आहेत. पण, आज खलनायकांच्या मांदियाळीत ‘सयाजी’चे आदराने आवर्जून नाव घेतले जाते. त्याच्या भूमिकांचे कौतुक केले जाते. त्याच्या सामाजिक जाणिवेची दखल घेतली जाते. अशा अफाट उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या माणुसकीच्या कलाकाराला मनापासून सलाम आणि त्याच्या पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा.

- आशिष निनगुरकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.