भाषाचिंतक लोकमान्य टिळक (उत्तरार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2020
Total Views |


lokmanya tilak_1 &nb



लोकशक्ती एकत्र करण्यासाठी मराठी भाषेची प्रचंड आवश्यकता टिळकांना जाणवत होती. इंग्रजी राज्यात आम्ही कुठली भाषा बोलावी यावर ब्रिटिशांचे राज्य नव्हते
, तरीही आंग्लभभाषेच्या प्रभावाने आम्ही भाषिक पारतंत्र्यच भोगत होतो. म्हणून वाटेल त्या रीतीने देशी भाषांचे महत्त्व टिळकांनी आमच्या कानी कपाळी ओरडून सांगितले. वयाच्या पंचविशीत त्यांनी याच हेतूने मराठी वर्तमानपत्र काढले, देशी भाषेत शिक्षण देणार्‍या शाळा काढल्या आणि वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही टिळक म्हणत, “मला मिळालेले ज्ञान मराठी भाषेत मिळाले असते, देशी भाषेत मिळाले असते, तर हे सर्व ५२ वर्षांचे ज्ञान २५व्या वर्षी अगर ३०व्या वर्षीच मला मिळाले असते.” आतातर स्वातंत्र्याची सत्तरी उलटून गेली आहे, तरीही इंग्रजीसाठीचा आमचा हट्ट काही केल्या कमी होत नाही, हे कुठले दुर्दैव?



लोकांना एकत्र करण्यासाठी ‘भाषा’ हे माध्यम टिळकांनी जोरकसपणे वापरले, भारतीय भाषांबद्दल लिहिताना टिळकांनी मराठी भाषेचा इतिहास आरंभापासून कसा मांडला हे पाहूया.


मराठी भाषारंभ


नर्मदेच्या दक्षिणेला आणि घटप्रभेच्या उत्तरेला महाराष्ट्र भाषेचा प्रारंभ झाला, तो काळ असावा सुमारे पाचव्या-सहाव्या शतकाचा. नर्मदेच्या उत्तरेकडून आर्यांचे जे संघ दक्षिणेत आले, त्यांनी इथल्या लोकांमध्ये आपली प्राकृत भाषा मिसळली आणि प्राकृत आणि इथल्या संस्कृताधिष्ठित भाषा एकत्र येऊन मराठीचा जन्म झाला. टिळक तिला ‘महाराष्ट्र भाषा’ म्हणतात. पुढे महाराष्ट्रात यादव राजाच्या आश्रयाने मराठीला पहिल्यांदा राजाश्रय मिळाला. पण, मुसलमानी राजवट आल्याने पुन्हा भाषेवर संकट आले. राज्याचा व्यवहार परकीय भाषेत सुरू झाला. मुसलमानी छळ हा शारीरिक असल्याने आणि ‘धर्मात सहभागी हो’ असा असल्याने हिंदूंची आपल्या धर्मावरील श्रद्धा अधिकाधिक वाढली. ज्यांचा छळ होऊ लागला, त्यांची प्रतिकाराची इच्छा वाढू लागल्याने त्यांना आपला क्षोभ प्रकट करण्यासाठी देशी भाषेचा अवलंब करावा लागू लागला. छळ हा समाजातल्या सर्व स्तरांत होत असे. त्यामुळे प्रतिकारासाठी ‘भाषा’ ही तळागाळात पसरली. ती टिकवून ठेवण्याचे महत्कार्य आमच्या संतांनी केले. विद्वान लोकांचे ज्ञान संस्कृत भाषेत असल्याने त्यांनी मराठी भाषा स्वीकारताना नाके मुरडली, संतांना हे काम अतिशय कठीण गेले.


राजवाड्यांच्या प्रसिद्ध आक्षेपाचे निराकरण


टिळक म्हणतात, ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत झालेल्या संत मंडळींची भाषेच्या संबंधाने कामगिरी पाहता तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अवश्य विचार केला पाहिजे. राजसत्ता परधर्मी लोकांच्या हातात असल्याने या परकीय भाषेतच बहुतेक राजकीय व्यवहार चालत. न्याय, व्याकरण आदी व्यवहार पंडितांकडून संस्कृत भाषेत चालत. अशा परिस्थितीत धर्माची बाब जर संत मंडळीने हात घेतली नसती, तर मराठी भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ हा पहिला आणि शेवटचाच ग्रंथ झाला असता. भक्तिमार्ग किंवा भागवतधर्म यांच्या प्रवर्तकांनी देशावरील संकट टाळले हे आम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. एकनाथ महाराजांच्या ठायी देशभक्ती होती, पण ती बोलून दाखवण्यासाठी अनुकूल काळ नव्हता. त्यांच्या साहित्यातील देशभक्ती दाखवून देणार्‍या काही कविता ‘केसरी’त टिळकांनी छापलेल्या सापडतात. मुसलमानी राजवटीत संत मंडळी राजकीय भानगडीत पडले नाहीत आणि त्यासाठी त्यांना दोष देणे चुकीचेच आहे, असे टिळक आग्रहाने सांगतात. शिवाजीच्या पूर्वीचे वाड्मय धार्मिक आहे, पण त्यामुळे देशासाठी काहीच चांगले घडले नाही, असे म्हणता येत नाही. मुसलमानी कारकिर्द सुरू होण्यापूर्वी यादवांच्या राज्यात नुकताच मराठीला कोठे राजाश्रय मिळालेला होता. हा राजाश्रय तुटल्यानंतर मुसलमानी आमदानीत धर्माची जी एक बाजू मोकळी दिसत होती, त्या दिशेनेच त्या वेळच्या थोर पुरुषांनी धर्म आणि भाषा राखून महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्रपण’ कायम ठेवले. विठोबाची पंढरी ही ‘धर्म’ आणि ‘भाषा’ या दोन्हीच्या दृष्टीने महाराष्ट्राची राजधानी झाली होती आणि या राजधानीच्या आसपास म्हणजेच हल्ली मोगलाईत असलेल्या औरंगाबाद, गुलबर्गा आणि दक्षिणेस विजापूर वगैरे प्रांतातून मराठी भाषेची जी व्याप्ती आढळून येते, तिचे श्रेय मराठी संत कवी मंडळींनाच दिले पाहिजे.



मराठी संतांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्रपण टिकवले, व्याप्ती वाढवली. स्वराज्यनिर्मिती करताना अठरा पगड जातीच्या लोकांशी शिवाजी महाराज संवाद करू शकले तो या भाषेच्या माध्यमातूनच. समर्थांचे अनुयायी गावोगाव हिंडून स्वराज्य, स्वधर्म यांच्याबद्दल जागृती घडवू शकले ते मराठी मायभाषेच्या बळावरच. तत्पूर्वी भाषा वाचवण्याची कामगिरी संतांनी केली नसती तर ३००-४०० व मुसलमानी आमदानीत भाषेची सरभेसळ होऊन रामदास किंवा शिवाजी महाराज यांस महाराष्ट्र धर्म किंवा महाराष्ट्र देश कोणता, हे सांगायची पंचाईत पडली असती. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र देशातील लोकांच्या हातून जी कामगिरी त्यांनी करून घेतली, ती त्यांस करून घेता आली नसती. म्हणूनच टिळकांच्या मते, शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय आहे. शिवाजी महाराजांच्या काळात भाषेला राजसत्तेची जोड मिळाली. सह्याद्रीतील किल्ले, त्यांचे व्यवहार, बोलणे, चालणे, त्यामुळे भाषेत जोम आला.



शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे झाले नाहीत. कारण
, राज्यकारभार आणि समाजव्यवहार भाषेसाठी अनुकूल नव्हते. “रामोश्यांच्या लावण्या, सगनभाऊंचे पोवाडे, वामन पंडित, मोरोपंत, तुकाराम व मुक्तेश्वर, श्रीधर वगैरे कवी व साधुसंत यांनी महाराष्ट्र भाषेस हाती धरून शिवाजी, बाजीराव वगैरे स्वराज्याची वृद्धी करीत असता, इकडे स्वभाषेची वृद्धी करण्याचा उद्योग चालवला होता.हा उद्योग मुख्यत: स्वदेशी धर्मसंस्था आणि साधुसंतांनी केला. त्यासाठी कुणी परकीय आले नाहीत. किंबहुना, असे भाषिक उत्कर्षाचे उद्योग आपल्याच लोकांकडून करून घेतले पाहिजेत, याबद्दल टिळक आग्रही दिसतात. पुढे पेशव्यांच्या काळात उत्तरेकडे अटकेपर्यंत मराठी भाषा वाढली. शिंदे-गायकवाड-होळकर यांनी ग्वाल्हेर, गुजरात आणि माळवा ठिकाणी मराठीचा ध्वज रोवला. नागपुरात भोसले. बेळगाव-धारवाड-म्हैसूर पूर्वीच सर झालेली होती. संतांनी औरंगाबाद वगैरेकडे मराठीची छाप बसवली.



अभिमानाने टिळक म्हणतात, “निजामापासून त्याच्या वासुलीचीच चौथाई आम्ही घेतली. एवढेच नव्हे तर चौथाईपेक्षा अधिक मुलुख महाराष्ट्र भाषेच्या टापूखाली ठेवण्यास तत्कालीन मराठ्यांचे शौर्य कायम झाले. आमच्या संत मंडळींचे ग्रंथ हे केवळ महाराष्ट्राचे मर्यादित वाङ्मय न राहता त्यांची व्याप्ती मराठी राज्याइतकीचं वाढत जाऊन तिने हिंदुस्तानचा तृतीयांश तरी भाग व्यापला.इथे टिळक एक महत्त्वाचा सिद्धांत मांडतात. राष्ट्र वाढले म्हणजे भाषा लोकांना गोड वाटू लागते. त्याप्रमाणे ऐतिहासिक गद्य-पद्य जन्माला आले. संस्कृतचा हट्ट गेला. मराठी चौघडे वाजू लागले. हा काळ राष्ट्राच्या आणि भाषेच्या अभ्युदयाचा काळ ठरला.



 ‘राष्ट्र वाढले म्हणजे भाषा गोड वाटू लागते,’ हा टिळकांचा सिद्धांत विचारत घेतला तर तत्कालीन स्थितीत इंग्रजांच्या राजकीय वर्चस्वामुळे, त्यांच्या भाषेचा आणि परिणामी संस्कृतीचा आमच्या वाङ्मयीन संस्कृतीवर प्रभाव पडणार हे नक्की. मुसलमानी आक्रमणापेक्षा ब्रिटिशांचा आमच्या भाषेवर, परिणामी वाङ्मयीन संस्कृतीवर जास्त जोरकसपणे आणि सर्वव्यापी प्रभाव पडला. महाराष्ट्रापुरता विचार केला, तर त्यामुळे मराठी भाषा दुर्बल झाली आणि इंग्रजी भाषा श्रेष्ठ होण्याला राजसत्ता हेच कारण प्रधान ठरले. इंग्रजी राज्यात पुन्हा आम्ही हतबद्ध झालो. म्हणूनच टिळकांना हिंदुस्तानच्या सर्वांगीण र्‍हासासाठी जी कारणे दिसतात, त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आमचा भाषाक्षय आणि भाषिक अध:पतन. म्हणूनच टिळक म्हणतात, “आमची कल्पकता, बुद्धिमत्ता, उमेद, साहसप्रियता इत्यादी सद्गुणांची पार माती झाली. ते जळून भस्म झाले! तेव्हा ज्ञानसंपादन स्वभाषेतूनच व्हावे. अनिर्वाह प्रसंगी उपयोगी पडण्यापुरते इंग्रजीचे ज्ञान असले म्हणजे पुरे.



राष्ट्रात नवा जोम आणण्यासाठी आपल्याच पूर्वजांचा पराक्रम टिळकांच्या मदतीला आलेला दिसतो. मराठी भाषा बोलणे, लिहिणे कमीपणाचे ज्यांना वाटत होते आणि आता आमच्या सर्वांगीण उन्नतीसाठी फक्त आंग्लभाषा आमच्या मदतीला धावून येईल, अशांना उद्देशून टिळक सवाल करतात, “सर्व भरतखंड यवनाक्रांत झाले असता श्रीछत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामदास यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांचा पूर्णोद्धार एकट्या आपल्या मराठी भाषेतून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर नाही का घडवून आणला? भट पेशव्यांचे किंवा फडणवीस भानूंचे पराक्रम काय अरबी, फारसी किंवा इंग्रजी, फ्रेंच या भाषांच्या ज्ञानाभावाने थिजून राहिले? इंग्रजीसाठी सुरू असलेली माथेफोड ही आमच्या शारीरिक व मानसिक दौर्बल्याचे कारण आहे.


इंग्रजांच्या राज्यात आमच्या भाषेत काव्य होत नाही. काव्य-कथेची मासिके बंद पडतात. भाषेच्या उद्धारासाठी धडपडणार्‍या संस्था तयार होत नाहीत, झाल्या तर टिकत नाहीत. कोशवाड्मय तयार होताना दिसत नाही. दिवसेंदिवस ग्रंथालये ओस होत आहेत आणि भाषेकडे कुणाचेही लक्ष नाही. अशा वेळी पूर्णवेळ भाषेच्या उन्नयनासाठी झटणारी एखादी संस्था असायला हवी,” असे टिळक सुचवतात. भाषेचा इतिहास, ग्रंथनिर्मिती, प्रकाशन, भाषाप्रसार, व्याकरण, वाङ्मयीन संशोधन अशा सर्वच प्रांतांत भाषेची अभिवृद्धी करणारी सर्वांगीण संस्था टिळकांना अत्यावश्यक वाटते. खरंतर महाराष्ट्रात मराठी ग्रंथांच्या उद्धारासाठी न्यायमूर्तींनी काही विशेष उपक्रम सुरू केले होतेच. लोकहितवादी आणि न्यायमूर्तींच्या प्रोत्साहनाने महाराष्ट्रात ग्रंथकार संमेलने सुरू झाली होती. पाचवे ग्रंथकार संमेलन भरले पुण्यात नागनाथ पाराजवळ मळेकरांच्या वाड्यात. कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भरले. ती तारीख होती, २७ मे १९०६. मराठी भाषा आणि साहित्याच्या अभिवृद्धीसाठी सतत कार्यरत राहील अशा संस्थेचा प्रस्ताव याच संमेलनात मांडला गेला आणि या सूचनेला जागेवरून उठून पाठिंबा दिला तो, लोकमान्य टिळकांनी! लोकमान्यांच्या सक्रीय पुढाकाराने मराठीसाठी क्रियाशील प्रयत्न करणारी पहिली संस्था म्हणजे ‘महाराष्ट्र साहित्य परिषद.’


राजद्रोहाच्या दुसर्‍या खटल्याच्या वेळी आपली सगळी बाजू टिळकांनी भाषेच्या जोरावर लढवली
, हे लक्षात घेतले पाहिजे. “माझ्या लेखांची इंग्रजी भाषांतरे कशी चुकीची कशी आहेत आणि त्या चुकीच्या भाषांतराच्या जोरावर तुम्ही न्याय करू शकणार नाहीत. तेव्हाही मराठी भाषेतील प्रत्येक शब्दाला अद्याप इंग्रजी प्रतिशब्द तयार झालेला नाही,” अशीच त्यांची भूमिका होती. टिळक एका पत्रात म्हणतात, “इंग्रजीच्या ऐवजी हिंदीत ज्युरी मिळाले असते, तर आपण खटला जिंकलो असतो.” शिक्षा होऊन टिळक मंडालेच्या कारागृहात गेले, तेव्हाही जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकण्याची पुस्तके त्यांनी मागवली आणि सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पाच महिन्यांतच पूर्ण केला. फ्रेंच भाषासुद्धा टिळक पाचव्या महिन्यात व्यवस्थित वाचू लागले. टिळकांच्या सुटकेसाठी विलायतेत धडपडणार्‍या दादासाहेब खापर्ड्यांना टिळकांनी आग्रहाचा सल्ला दिला, “तुम्हीही फ्रेंच भाषा शिकून घ्याच.” विलायतेत कुठे शिकता येईल याचे पत्तेही टिळकांनी पाठवलेत, हे वाचून आश्चर्य वाटेल.


इंग्रजी राज्यव्यवस्था नकोशी असली तरी इंग्रजी भाषा किमान अचूक असावी, हे त्यांना प्रकर्षाने वाटत असे. मंडालेच्या तुरुंगातून टिळकांच्या मुलाने लिहिलेल्या पत्रात इंग्रजीच्या व्याकरणाच्या दोन चुका काढल्या आहेत. रामभाऊने लिहिलेल्या आठ ओळींमध्ये व्याकरणाच्या दोन चुका आहेत, असे म्हणून त्यांनी त्या चुका कोणत्या आणि त्या दुरुस्त कशा कराव्या, हे लिहून पाठवलेले दिसेल. “भाषा उत्तम अवगत असावी अभ्यासाकडे लक्ष दिलेच पाहिजे,” असा सज्जड दमही दिलाय. बापूने ‘दुसरी भाषा’ म्हणून संस्कृतऐवजी पाली भाषा घ्यायला साफ नकार कळवला आहे. पाली म्हणजे संस्कृतचे भ्रष्ट रूप, पालीचा आपल्याला नंतरच्या आयुष्यात काहीही उपयोग नाही असं सांगून प्रश्नच निकालात काढला.


‘एपिक पोएट्री’ या शब्दाला ‘आर्ष महाकाव्य’ हे देशी नाव टिळकांनी सुचवले. ‘ब्युरोक्रसी’ या शब्दाला ‘नोकरशाही’
हा नवा शब्द सुचल्यावर तर टिळक इतके आनंदित होते की दिवसभर भेटेल त्याला ते याबद्दलच सांगत. टिळकांच्या कारकिर्दीत ‘केसरी’ने सुमारे सहा हजार नवे शब्द मराठी भाषेला प्रदान केले हे वाचून अनेकांच्या भुवया नवलाने उंचावतील. लोकशक्ती एकत्र करण्यासाठी मराठी भाषेची प्रचंड आवश्यकता टिळकांना जाणवत होती. इंग्रजी राज्यात आम्ही कुठली भाषा बोलावी यावर ब्रिटिशांचे राज्य नव्हते, तरीही आंग्लभभाषेच्या प्रभावाने आम्ही भाषिक पारतंत्र्यच भोगत होतो. म्हणून जमेल त्या रीतीने देशी भाषांचे महत्त्व टिळकांनी आमच्या कानी कपाळी ओरडून सांगितले, पण आम्ही अजूनतरी शहाणे झालोय का?

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@