डोंबार्‍यांच्या दोरांनी नरसिंह जखडेल काय?

30 Apr 2020 14:15:31
agralekh_1  H x
 
 
धर्माचे राजकारण करून योगींना राजकीय सापळ्यात अडकविण्याचे प्रयत्न करणार्‍यांनी आपल्या अस्तनीत काय जळते आहे, ते जरूर पाहावे. धर्म आणि कर्तव्याच्या ऐरणीवर तावून सुलाखून सिद्ध झालेला तो नरसिंह या डोंबार्‍यांच्या दोरांनी जखडला जाणार आहे का?
 
उत्तर प्रदेशात दोन साधूंच्या हत्या झाल्या. साधूंच्या हत्या ही खरंतर कुणाही संवेदनशील मनाला चटका लावणारी गोष्ट. साधूंच्या हत्या, मग त्या पालघरमधील गडचिंचले असो किंवा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर. मात्र, महाराष्ट्रात कोरोनासोबत अजून एक रोग पसरला आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांचे सवाई पक्षप्रमुख हे दोन घटक या रोगाला कारणीभूत आहेत. हा रोग आहे, संकटाचा काळ आहे, राजकारण करू नका, असे म्हणत अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करण्याचा! हा रोग आहे, स्वत:च्या अपयशाचे खापर दुसर्‍याच्या माथी फोडण्याचा! हा रोग आहे, विवेकाचा बळी देऊन सत्तेसाठी छद्म सेक्युलर सैतानासोबतही शय्यासोबत करण्याचा! दोन साधू जे पालघरमध्ये मारले गेले आणि दोन साधू जे उत्तर प्रदेशात मारले गेले, यांच्यातील कुठलाच फरक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जाणवत नाही. एखाद्या माथेफिरूने साधूंचा खून करणे आणि एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावाने हिंसक झालेल्या जमावाने अत्यंत क्रूरपणे पोलिसांच्या समोर दोन वाट चुकलेल्या साधूंच्या हत्या करणे हाच तो फरक आहे.
 
 
सेक्युलॅरिझमची कावीळ इतकी जबरदस्त असते की, सगळे जगच मग सेक्युलॅरिझमच्या विरोधात पिवळे दिसू लागते. शिवसेनेचेही तसेच झाले आहे. उत्तर प्रदेशात नशेच्या भरात असलेल्या एका इसमाने हे दोन साधू मारले आहेत ही घटना दुर्दैवी नाही, असे मुळीच नाही. परंतु, साधूंच्या हत्या झाल्यानंतरच्या २४ तासांत उत्तर प्रदेशात आरोपीच्या गचांड्या आवळल्या गेल्या आहेत. वाहनाच्या धडकेत बळी पडणार्‍या घटनेसारखे हे आहे. अपघाताने ट्रकखाली येऊन एखाद्यावर मरण ओढावणे आणि ट्रक घेऊन एखाद्याच्या अंगावर घालणे असे हे दोन प्रकार. कायदा आणि संविधानसुद्धा या दोन गोष्टी भिन्न मानते आणि शिक्षाही भिन्न ठोठावते. मग महाराष्ट्रात नेमके काय सुरू आहे? पालघरमधील प्रकार दोन दिवसांनी जसजसा तापायला लागला, तसतशी शासन, प्रशासनाला जाग यायला लागली. मग गडचिंचल्यावर पोलिसी वरवंटा फिरविला गेला. जसे जमेल तसे ११० आरोपी पकडले गेले आणि त्यातून पुढे मग जे व्हायचे ते काल-परवापर्यंत सुरू आहे. आजही पोलीस खरे आरोपी पकडले, असे अधिकृतपणे सांगू शकत नाहीत. गायब असलेल्या ‘तबलिगीं’च्या बाबत जसे सरकार गयावया करून त्यांना बोलावते, तसे या आदिवासींच्या बाबतीत केले गेलेले नाही. सरसकट लहान मुलेही यात उचलली गेली आहेत.
 
 
हत्यांच्या वेळी काढलेले व्हिडिओ पाहिले, तर एका दादाच्या येण्याचा आराडाओरडा होतो. हा दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. तो तिथे काय करीत होता? त्याने सोबत किती लोक आणले होते? कासा पोलीस ठाणे ते गडचिंचले हे अंतर जेमतेम वाहनाने अर्ध्या तासाचे; मग पोलीस किती वेळात पोहोचले? इतके पोलीस असतानाही त्यांनी त्या निर्घृण हत्या थंडपणे का पाहिल्या? जेव्हा या हत्या घडत होत्या, तेव्हा त्यांनी किमान हवेत गोळीबार का केला नाही? लाठीचार्जही का केला नाही? एक नि:शस्त्र महिला सरपंच जर या हिंस्त्र जमावाला दोन तास थांबवू शकते, तर मग शस्त्रधारी पोलीस बघ्याची भूमिका का घेऊन बसले आहेत? महाराष्ट्रातल्या साधूंच्या घटना या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे मागत आहेत. भारतीय जनता पक्षाचा आमदार या भागातून पराभूत झाल्यापासून रानटी डाव्या शक्तींनी आपला नंगानाच सुरू केला आहे. मिळेल त्या ठिकाणी, जमेल तशी हिंसा ही मंडळी करीत आहेत. तलासरी, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांच्या पाड्यापाड्यांवर अशा गोष्टी ऐकायला मिळतात. कित्येक ठिकाणी पोलिसांच्या दप्तरदरबारी त्यांची नोंदच नाही. तक्रार दाखल करायला गेलेल्या आदिवासीला पोलीस “तू रात्रीच्या अंधारात कसे पाहिलेस,” असा सवाल विचारतात.
 
साधूंच्या हत्येच्या काळजीपोटी बेगडी हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना फोन केला होता. महाराष्ट्रात जे झाले, त्यावर पहिल्या दिवसापासून चादरी पांघरून इकडे तिकडे पाहण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. आदिवासींना ‘अहिंदू’ सिद्ध करण्याची अहमहिका पालघर जिल्ह्यातल्या या तीन तालुक्यांमध्ये सुरू आहे. आदिवासींचे देव निराळे आहेत. तुमच्या हिंदूंशी काही संबंध नाही, असे सांगणार्‍या चळवळींना महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर चेव चढला आहे. धर्माचे राजकारण करून योगींना राजकीय सापळ्यात अडकविण्याचे प्रयत्न करणार्‍यांनी आपल्या अस्तनीत काय जळते आहे, ते जरूर पाहावे. धर्म आणि कर्तव्याच्या ऐरणीवर तावून सुलाखून सिद्ध झालेला तो नरसिंह या डोंबार्‍यांच्या दोरांनी जखडला जाणार आहे का? साधूंच्या हत्या सोडा, पण कोरोनासारख्या संकटात महाराष्ट्राची स्थिती आणि उत्तर प्रदेशाची स्थिती यांची तुलना केली, तर नेतृत्वाचे धोरणविषयक पंगुत्व अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.
 
 
लोकसंख्येत महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट असलेल्या उत्तर प्रदेशात रोग्यांची स्थिती काय आहे? दिल्लीहून कामगारांना आणण्यापासून ते विद्यार्थ्यांना आपल्या गावी सुखरूप आणण्यापासून ज्या कौशल्याने योगींनी प्रशासनावर मांड ठोकली आहे, ती विचार करायला लावणारी आहे. ‘कॅरम ते कोमट पाणी’ इथेच अद्याप महाराष्ट्र घुटमळत आहे. आपत्काळात राजकारण करू नये, पण तुम्ही राजकारण करण्यातले काहीच शिल्लक ठेवणार नाही आणि इतरांवर मात्र राजकारणाचे आरोप करणार असाल, तर या वृत्तीला सडेतोड शब्दांत उत्तर दिलेच पाहिजे. उत्तर प्रदेशातील घटनेचे राजकारण करणार्‍या संजय राऊतांना योगींच्या कार्यालयाने ट्विटरवर दिलेले उत्तर मुस्काट फोडण्याच्या अंदाजातच दिले आहे. पण, यातून राऊत सुधारणार नाहीत, याची आम्हाला पुरेपुर खात्री आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0