बॉलीवूडचा ‘चिंटू’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020
Total Views |
Rishi kapoor_1  

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी मुंबईतील चेंबूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव ऋषी राज कपूर. द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे ते पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते नातू. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते प्रसिद्ध होते.


ऋषी कपूर यांनी १९७०साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी ‘राजू’ हे पात्र साकारले होते. बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केलेल्या या अभिनेत्याला १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने खरी प्रसिद्धी मिळवून दिली. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.


मेरा नाम जोकर या चित्रपटापूर्वीही त्यांनी राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटात काम केले आहे. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ या गाण्यात पावसामध्ये तीन लहान मुले चालत असतात. त्यातील एक मुलगा म्हणजे खुद्द ऋषी कपूर होते. ते यावेळी फक्त ३ वर्षांचे होते. गेल्या ४० वर्षांपासून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत घालवला आहे.


‘बॉबी’, ‘लैला मजनू’, ‘रफू चक्कर’, ‘सरगम’, ‘कर्ज’, ‘प्रेम रोग’, ‘नगिना’, ‘हनिमून’, ‘चांदनी’, ‘हिना’ हे नव्वदच्या दशकातील त्यांचे चित्रपट फार गाजले. ‘खेल खेल मै’, ‘कभी कभी’, ‘हम किसीसे कम नही’, ‘बदलते रिश्ते’, ‘आप के दिवानी’ आणि ‘सागर’ यांसारख्या १३ चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या कर्ज चित्रपटातील ‘ओम शांती ओम’ या गाण्याने त्यावेळी चांगलाच धुमाकूळ घातला होता.


ऋषी कपूर यांनी आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या. नायकापेक्षा लक्षात राहिल्या त्या त्यांच्या नकारात्मक भूमिका... या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांचा ‘सायको किलर’ हा चित्रपटात चांगलाच गाजला. त्यानंतर हृतिक रोशन याच्यासोबत ‘अग्निपथ’ चित्रपटातही त्यांनी ‘रौफ लाला’ हे खलनायक पात्र रंगवले.


ऋषी कपूर यांनी १९७३ ते २००० या काळात जवळपास ५१ चित्रपटात काम केले. यातील ४० चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तर केवळ ११ चित्रपट हिट झाले. ऋषी कपूर यांना ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. ‘बॉबी’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्राप्त झाला होता. १९९९ मध्ये त्यांनी ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यात राजेश खन्ना, ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना यासांरखी तगडी स्टार कास्ट होती.


२००० नंतर त्यांनी सहकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. ‘ये हे जलवा’, ‘हम तुम’, ‘फना’, ‘नमस्ते लंडन’, ‘लव आज कल’, ‘पटियाला हाऊस’ या सारख्या चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले. ‘हाऊसफूल २’ या चित्रपटात त्यांनी भाऊ रणधीर कपूर सोबत काम केले. ‘खजाना या चित्रपटानंतर हा दोन्ही भावांचा एकमेव चित्रपट होता.


नव्वदच्या दशकात अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. त्यांनतर तब्बल २७ वर्षांनी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ नावाचे आत्मचरित्र लिहिले. अवघ्या तीन वर्षांपूर्वी म्हणजे १७ जानेवारी २०१७ ला हे पुस्तक प्रदर्शित झाले होते.



ऋषी कपूर यांना २०१८ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. या उपचारादरम्यान, बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ असे बिरूद मिरवणारे, कपूर खानदानाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे आणि सत्तर-ऐंशी-नव्वदचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेले. अशा हा गुणी अभिनेत्याला दै.’मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!!!
@@AUTHORINFO_V1@@