लेखणीचे स्वातंत्र्य...

    दिनांक  30-Apr-2020 20:35:08   
|
FOP _1  H x W:
 
जे जीवाची बाजी लावून अन्याय अत्याचार दहशतवाद, भ्रष्टाचाराविरोधात लिहितात, बोलतात. त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मौल्यवान आहे. त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ३ मे या ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना’चे महत्त्व मोठेच आहे.

 
येणारा रविवार म्हणजेच ३ मे हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९९१ मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहिमेला सुरुवात केली. ३ मे १९९१ रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढील वर्षांपासून (१९९२ सालापासून) ३ मे हा दिवस ‘प्रेस फ्रिडम डे’ (पत्रकारिता स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जाऊ लागला. 
 
१९९३ मध्ये ‘युनेस्को’ने ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यास मंजुरी दिली. ‘युनेस्को’तर्फे १९९७ सालापासून दरवर्षी ३ मे रोजी ‘ ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना’निमित्त ‘गिलेरमो कानो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज अ‍ॅवॉर्ड’ दिले जाते. पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या पत्रकाराला हा पुरस्कार प्रदान केला जातो.
 
 
तर हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याची गरज काय, तर ‘वर्ल्ड प्रेस इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट’ या संस्थेने ११९० ते २०१५ या काळात जगभरात पत्रकारांवर झालेल्या हल्लाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार या २५ वर्षांमध्ये २२९७ पत्रकारांची हत्या झाली. या काळातला ‘शार्ली हेब्दो’वरील हल्ला तर भयंकरच म्हणायला हवा. पत्रकारांवरील हल्ल्यातील नमुनेदार उदाहरणे पाहूया. जमाल खाशोगी आणि स्लोवाकियाचे पत्रकार जेन कुसक यांची हत्या करण्यात आली. 
 
 
कुसक संघटित गुन्हेगारी आणि सरकार यावर शोधपत्रकारिता करत होते. त्यांची आणि त्यांच्या नियोजित वधूची हत्या करण्यात आली. त्यासाठी तेथील पंतप्रधानांना राजीनामाही द्यावा लागला. क्याव सोए ओ, वा लोन या म्यानमारच्या दोन पत्रकारांना तुरूंगवास भोगावा लागला. कारण, म्यानमारमध्ये रोहिंग्याचे हाल यावर ते लिहीत होते. बातम्या देऊन जगाला माहिती देत होते. माल्टामध्ये डेफ नी कारूआन गेलिटसिया या महिला पत्रकाराची हत्या होते. 
 
 
अपघात झाला, असे भासवले जाते. पण नंतर कळते की, पनामा कागदपत्रासंदर्भात डेफ नी शोधपत्रकारिता करत होत्या. भ्रष्टाचारासंदर्भात त्यांना काहीच लिहिता येऊ नये म्हणून त्यांचा खून करण्यात आला. झेव्हिअर वाल्देन कार्डेज या मेक्सिकोच्या पत्रकाराचीही हत्या झाली. कारण, कार्डेज यांनी स्थानिक दहशतवाद, गुन्हेगारी याविरोधात सातत्याने लिखाण करून आवाज उठवला.
 
लॅटिन अमेरिका, सौदी अरेबिया आणि इतर मध्य पूर्वेतील इस्लामिक राष्ट्रांमध्ये पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. भारतातही सध्या अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर त्यांचीच १२ तास झालेली पोलीस चौकशी चांगलीच गाजते आहे. पत्रकार मग ते वृत्तपत्रांचे असू देत की, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे, त्यांच्यावर होणारे हल्ले हे निंदनीयच आहेत. राजकीय किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या सत्ताधारी व्यक्ती, संस्था यांच्या विरोधात लिहिले-बोलले की, त्यावर निर्बंध ठेवण्यासाठी अनेक प्रकारची दडपशाही वापरली जाते.
 
त्यामध्ये मग असे लिहिणार्‍या-बोलणार्‍या पत्रकारांना आमिष देणे, वेगवेगळे पुरस्कार, सवलती देणे आणि तरीही ऐकले नाही, तर त्यांना धमकावणे, त्यांना ऐनकेन प्रकारे त्रास देणे, ते जिथे काम करत असतील तेथील वरिष्ठांना सांगून त्या पत्रकाराची बदली करणे किंवा थेट त्या पत्रकाराला, संपादकालाही बडतर्फ करणे, तरीही तो बधत नसेल तर थेट त्याच्यावर हल्ला करणे आणि तरीही तो थांबला नाही, तर त्याची वाचा कायमचीच बंद करणे, म्हणजेच त्याची हत्या करणे. असे प्रकार घडताना दिसतात.
 
यावर दुसरेही एक मत असे आहे की, आज जगभरात काही नामधारी पत्रकार आहेत, ज्यांचे काम एकच असते ते म्हणजे माहिती अधिकाराचा गैरवापर करणे किंवा ठरवून सुपारी घेतल्यासारख्या एखाद्याबद्दल खोटी बातमी, लेख लिहून दुसर्‍यादिवशी जगभरात प्रसिद्ध मिळवणे मात्र, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे की, पत्रकारिता हे एक सतीचे वाणच आहे. आपल्या तत्त्वांशी, कर्तव्यांशी आणि विचारांशी कोणतीही तडजोड न करता समोर आलेले तथ्य सत्यात मांडायचे हे ते वाण. ते वाण सगळ्यांनाच प्रसन्न असते असे नाही. अशी पत्रकारिता करणारेही पत्रकार आज जगात आहेत. जे जीवाची बाजी लावून अन्याय अत्याचार दहशतवाद, भ्रष्टाचाराविरोधात लिहितात, बोलतात. त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मौल्यवान आहे. त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ३ मे या ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना’चे महत्त्व मोठेच आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.