मराठमोळी दिल्ली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020   
Total Views |


maharshtra in delhi_1&nbs



दिल्ली... देशाची राजधानी असलेल्या शहराने अगदी प्राचीन म्हणजे महाभारत काळापासून स्वत:भोवती एक गूढ वलय निर्माण केले आहे. इंद्रप्रस्थ ते दिल्ली या प्रवासादरम्यान या शहराने बरीच स्थित्यंतरेही अनुभवली. राष्ट्रपती भवन, संसद भवन हा भाग म्हणजे दिल्लीतलीच एक वेगळी दिल्ली- ल्युटन्स दिल्ली.आता तर ल्युटन्स दिल्लीचाही चेहरामोहरा बदलण्याचे घाटत आहे. राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी असल्याने एक खास असा डौल आहे या शहराचा. म्हणजे तुम्ही दिल्लीला आणि दिल्लीने तुम्हाला स्वीकारले तर मग जे काही होतं ते या शहराच्या अधिकच प्रेमात पाडणारं असतं. तर अशा या खास दिल्लीतील आणखी एक दिल्ली म्हणजे मराठमोळी दिल्ली! आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या मराठमोळ्या दिल्लीचा खास असा आढावा घ्यायलाच हवा.



महाराष्ट्रासाठी दिल्ली नेहमीच दूर राहिली,’ असा प्रचार उगाचच करण्याची मराठी माणसाला जणू एक सवयच जडलेली. कारण, या दिल्लीवर आणि लाल किल्ल्यावर मराठ्यांनी महाराष्ट्राचा भगवा फडकविला होता. मराठा साम्राज्याच्या घोड्यांच्या टापाखाली ही दिल्ली आणि दिल्लीचा मुघल बादशहा अगदी गमगुमान राहत होता. दिल्लीची बादशाही वाचविण्यासाठी आणि अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी सदाशिवरावभाऊ याच दिल्लीत आले होते. याच दिल्लीतील बुराडी घाटावर बचेंगे तो और भी लडेंगेअसा खास मराठी बाणा दाखवित दत्ताजी शिंदे यांनी बलिदान दिले. ब्रिटिशांनीही दिल्ली जिंकली ती मराठ्यांकडूनच ! दिल्लीतल्या मराठेशाहीच्या स्मृती आजही आहेत, त्या चावडी बाजाराच्या रुपात.



पुरानी दिल्लीतल्या लाल किल्ला, जामा मशीद, चाँदनी चौक या भागामध्ये वसलेला चावडी बाजार. देशातील अन्य बाजारपेठांप्रमाणेच त्याचे स्वरूप असले तरीही मराठी माणसासाठी ते विशेष अभिमानाचे. कारण, पानिपतानंतर अवघ्या काही वर्षांत उत्तरेच्या राजकारणात महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याचा दबदबा पुन्हा निर्माण केला होता. शिंद्यांचे तर उत्तरेच्या राजकारणात दीर्घकाळ मोठेच वजन होते. अगदी मुघल बादशहाही मराठा साम्राज्याच्या दयेवरच जगत होता, तर लाल किल्ल्यानजीकच्या त्या भागामध्ये महादजी शिंदे यांची चावडी भरे असे आणि त्यामुळे त्या भागाला चावडी बाजारहे नाव मिळाले. दिल्लीत दीर्घकाळ काम करणारे ज्येष्ठ मराठी पत्रकार ही आठवण अगदी आवर्जून सांगत असतात. त्यामुळे खरे तर दिल्ली मराठी माणसाला कधीही दूर नव्हती, हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे.



ऐतिहासिक कालखंडानंतरही नोकरी
, व्यवसायानिमित्त दिल्लीत आलेल्या मराठी माणसांनी संस्कृती टिकवून ठेवली आहे. दिल्लीत आज लहान-मोठी अशी ४० पेक्षा जास्त मराठी मंडळे आहेत आणि गणेशोत्सव, शिवजयंती ते अगदी उत्साहात साजरे करतात. प्रत्येक मंडळाचे काम तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कारण, दिल्लीमध्ये मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती यांनीच टिकवून ठेवली आहे. मात्र, विस्तारभयास्तव तूर्तास मोजक्याच संस्थांचा समावेश केला आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी २०१८ सालापासून शिवजयंती राष्ट्रोत्सवास केलेला प्रारंभ तर राजधानीतील मराठी माणसाचा मानबिंदूच झाला आहे. शिवजयंती राष्ट्रोत्सवाचे महत्त्व म्हणजे केवळ दिल्लीतीलच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील म्हणजे पानिपत, सोनीपत, बरेली, मेरठ अशा सर्व ठिकाणची मराठी मंडळी एकत्र येतात. शिवजयंतीच्या पहिल्या वर्षी तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. दिल्लीतील शिवजयंतीला खर्‍या अर्थाने राष्ट्रोत्सवाचे स्वरूप देण्याचे श्रेय पूर्णपणे संभाजीराजेंचेच आहे.



दिल्लीतील सर्वांत जुने मराठी मंडळ म्हणजे
महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज.नुकतेच म्हणजे २०१९ साली या मंडळाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. दिल्लीतील मराठी मंडळींमधील बुजुर्ग असलेले चंद्रशेखर गर्गे अर्थात गर्गे काकांनी सांगितलेली त्याच्या स्थापनेची कहाणीही तितकीच मनोरंजक आहे. दिल्लीमध्ये रेल्वे खात्यात काम करणारी मराठी कुटुंबे पुरानी दिल्लीभागातील पहाडगंज - नया बाजार परिसरात राहायची. आता नोकरीनिमित्ताने दीर्घकाळ दिल्लीत वास्तव्य करायचे असल्याने ती मराठी मंडळ एकत्र आली आणि महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाजाची स्थापना झाली. त्यासाठी काकासाहेब गाडगीळ यांनी मोलाची मदत केली होती. पहाडगंडप्रमाणेच मराठी मंडळी करोलबाग भागातही राहायला होती. तेथे मग मराठा मित्र मंडळस्थापन झाले, त्याचे पहिले अध्यक्ष होते ते सी. डी. देशमुखांचे बंधू- बी. डी. देशमुख. त्यानंतर मंडळाचे अध्यक्षपद अण्णासाहेब शिंदे, शंकरराव चव्हाण, वसंतराव साठे यांनीही भूषविले. मराठा मित्र मंडळानेच प्रथम शिशुविहारही शाळा स्थापन केली, त्याचेच रुपांतर आता चौगुले स्कूलया दिल्लीतील नामवंत शाळेत झाले आहे.



दिल्लीतील आणखी एक मराठी संस्था म्हणजे
नूतन मराठी स्कूल.शाळेच्या प्राचार्या पूजा साल्पेकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “दिल्लीमध्ये नूतन मराठी स्कूलचे वेगळे महत्त्व आहे. शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे आठवीपर्यंत मराठी विषय सक्तीचा आहे आणि त्यानंतरही नववी, दहावी आणि अकरावी, बारावीमध्ये मराठीहा विषय ऐच्छिक विषय म्हणून घेता येतो. शाळेत आज मराठी विद्यार्थ्यांसह अमराठी विद्यार्थीही शिकत आहेत आणि अगदी गोडीने ते मराठी विषय शिकतात, गणेशोत्सवात सहभागी होतात आणि लेझीमही खेळतात.” दिल्लीमध्ये मग हळूहळू मराठी मंडळी वाढायला लागली आणि ती विविध ठिकाणी स्थायिक होऊ लागली. त्यातूनच जनकपुरी, रामकृष्णपुरम येथे मराठी वस्ती वाढली, आनंदवन, सह्याद्री अपार्टमेंट अशा खास मराठमोळ्या सोसायटीही आज दिल्लीत उभ्या आहेत. ही सर्व मंडळी दिल्लीत विविध गणेशोत्सव, शिवजयंती, कोजागिरी पौर्णिमा असे सर्व मराठी सण-उत्सव साजरे करीत असतात. दिल्लीतील अमराठी मंडळी, तर खास मराठी संस्कृती समजावून घ्यायला सहभागीही होत असतात. यामुळे दिल्लीत नव्यानेच येणार्‍या मराठी माणसाला एकटे वाटत नाही, हे सर्वांत महत्त्वाचे. आता तर दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसर म्हणजे नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद येथेही मराठी मंडळी नोकरी आणि व्यवसायाच्या रुपाने वसली आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये मराठी जेवणही आता अगदी सहजगत्या मिळते. नवे आणि जुने महाराष्ट्र सदन, करोलबाग येथे मराठी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अमराठी मंडळीही खास येत असतात.



एकूणच मराठी माणसाला दिल्ली कधीही दूर नव्हती आणि यापुढेही राहणार नाही. राजकीय क्षेत्राचा विचार करता
, २०१४ पासून केंद्रीय दळणवळणमंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहेत विशेष म्हणजे, दिल्लीच्या राजकीय संस्कृतीची नाडी गडकरींनी नेमकेपणाने ओळखली आहे. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट मंत्री तर रामदास आठवले, रावसाहेब पाटील-दानवे हे राज्यमंत्री आपल्या कामाची छाप पाडत आहेत. राज्यसभा सदस्य, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आयसीसीआरअर्थात भारतीय सांस्कृतिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी तर दिल्लीतील बुद्धिजीवी वर्तुळात दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठे दिल्ली पुन्हा काबीज करून लाल किल्ल्यावर जरीपटका फडकविणार, यात कोणतीही शंका नाही.



दिल्लीकरांनी अनुभवले शिवचरित्र...


दिल्लीतील एक महत्त्वाची संस्था म्हणजे दिल्ली मराठी प्रतिष्ठान. दिल्लीत
इंडिया गेटच्या हिरवळीवर दरवर्षी दिवाळीमध्ये दिवाळ पहाटसाजरी करण्याची सुरूवात प्रतिष्ठानने केली. प्रतिष्ठानतर्फे २०१८ साली दिल्लीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजाया महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे महानाट्य ऐतिहासिक लाल किल्ल्यावर हिंदी भाषेत -राजा शिवछत्रपतीया नावाने सादर झाले. यानिमित्ताने दिल्लीकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य यांचा देदीप्यमान इतिहास समजून घेता आला होता. विशेष म्हणजे दोन वर्षांनीही दिल्लीकर त्याची आठवण आवर्जून काढतात.


सराफा व्यवसायातही मराठी ठसा


दिल्लीमध्ये सराफा व्यवसायात
, प्रामुख्याने सोने शुद्धीकरणाच्या म्हणजे आटणीच्या व्यवसायात मराठी माणसे लक्षणीय प्रमाणात आहेत. दिल्लीत १९७८ सालापासून या व्यवसायात असलेले शहाजीराव पाटील सांगतात की, “सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, माणखटाव अशा भागातील मंडळी अगदी पूर्वीपासून या व्यवसायात आहेत. दिल्लीत त्यांची संख्या लक्षणीय आहेच, मात्र दिल्लीसह उत्तर प्रदेश, राजस्थान, काश्मीर आणि अगदी नेपाळमध्येही मराठी मंडळी आटणीच्या व्यवसायात आहेत. सुरुवातीला टिकून राहण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. मात्र आता आम्ही अगदी यशस्वीपणे व्यवसाय करीत आहोत.त्यामुळे देशाच्या राजधानीतील सुवर्ण बाजारपेठेवर महाराष्ट्राचेच वर्चस्व आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@