रा.स्व.संघ स्वयंसेवकांतर्फे राज्यभरात मदतकार्याचा ओघ सुरूच

03 Apr 2020 18:02:04
RSS_1  H x W: 0

पुणे महानगर 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने दि. १८ व १९ मार्च रोजी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने केवळ २४ तासांच्या पूर्वसूचनेने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले. रा.स्व. संघ जनकल्याण समिती कोरोना आपदग्रस्तांसाठी सुरु केलेल्या सेवा कार्यासाठी संस्थेच्या वतीने समितीला अकरा लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
देवदासींना मदत

पुण्यात कसबा नगर तसेच बुधवार पेठ व शुक्रवार पेठ येथील महिलांच्या(देवदासी) सेवा वस्तीमधे दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपदा केद्रांतून १२५ भोजन पाकिटे दिली जात आहेत. स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाकडून यासाठी मोलाचे सहकार्य मिळते आहे. या उपक्रमामुळे त्या महिलांच्या जेवणाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

पुणे जिल्हा
 
मुळशीमध्ये होतकरू व्यक्तींना मदत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मुळशी तालुक्यात २ एप्रिल पर्यंत एकूण २३७ कुटुंबांना धान्य वितरण करण्यात आले. त्यात तालुक्यातील कातकरी वस्ती, कामगार, मजूर वर्गाचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक गणेश मंडळाने सहकार्य केले आहे. तसेच शिंदेवाडीतील कानिफनाथ मंदिर विश्वस्तांकडून २८ मार्च पासून दररोज सकाळी आणि रात्री कामगार वर्गासाठी भोजन वितरण होत आहे. दिवस भरात साधारण ४००-५००जणांना त्याचा लाभ होत आहे.
कामगारांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप
 
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महेंद्र हेवी इंजिन लि., चाकण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक
संघ यांनी एकत्रितपणे दि. ३ एप्रिल २० पासून भोसरी, लांडेवाडी, मोशी, आळंदी,चाकण या भागातील रोजगारावर अवलंबून असलेल्या कामगारांना जेवणाच्या  पॅकेटचे वाटप सुरू केले आहे. पहिल्या दिवशी एकूण ५५० समाज बांधवांपर्यंत ही मदत पोहचविण्यात आली आहे. आगामी दहा दिवस हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार असून आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय गेल्या सात दिवसांपासून याच भागातील १५० ते १६० स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांना रोज नाष्टा देण्यात येत आहे. या सेवाकार्यात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
 
तळेगाव दाभाडेमध्ये आपदग्रस्तांना शिधा आणि जेवणाचे डबे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे तळेगाव दाभाडे येथे कोरोना आपदग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. गरजू कुटूंबांना शिधा व तयार जेवण पोहोचविण्यात येत आहे. २७६ गरजू कुटूंबांना अंदाजे ५ दिवस पुरेल इतका शिधा देण्यात येत असून ५ दिवसांनंतर पुन्हा शिधा वाटप करण्यात येत आहे. याशिवाय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसोबत तयार जेवणाच्या ८०० डब्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात ७० स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्यांनी तळेगाव शहरामधील विविध वस्त्यांमधे प्रत्यक्ष जाऊन माहिती संकलित केली आणि २७६ गरजू कुटूंबांची यादी तयार केली. प्रत्येक कुटूंबासाठी २ प्रतिंमध्ये रेशन कार्डसारखी कार्ड तयार करण्यात आली. त्याची एक प्रत संबंधित कुटूंबाकडे तर एक प्रत कार्यालयात ठेवण्यात आली असून त्यावर शिधा दिल्याची नोंद करण्यात येत आहे. काही स्वयंसेवकांनी निधी व वस्तूरूपी मदत देखील संकलित केली
आहे.
खेड राजगुरुनगरमध्ये मदत
 
पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगरमधील बाजारपेठ परिसरात बजरंग दल आणि संघातर्फे 2 एप्रिल रोजी भोजनाच्या एकूण ७३ डब्यांचे नियोजनपूर्वक संकलन करून योग्य पद्धतीने वितरण करण्यात आले. 

बारामतीत परराज्यांतील ट्रक ड्रायव्हरना शिधा वाटप
 
बारामती जिल्ह्यात (परिसरात) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीतर्फे कोरोना आपदग्रस्तांना शिधा वाटप करण्यात येत आहे. बारामतीतील एम.आय.डी.सी. मध्ये ५३, इंदापूरमध्ये महामार्गावर १६ तर भोर आणि वेल्हा येथे महामार्गावर ५२ ट्रक ड्रायव्हर अडकून पडले आहेत. हे सर्वजण परराज्यातील आहेत. त्यांना १५ दिवस पुरेल एवढा शिधा देण्यात आला. त्यामध्ये तांदूळ १० किलो, तूरडाळ २ किलो, आटा पीठ १० किलो, दोन किलो कांदे, दोन किलो बटाटे, दोन किलो तेल, एक किलो मीठ, चटणी तसेच साबण चुऱ्याचा एक पुडा, अंगाच्या साबणाची एक वडी, एक काडीपेटी असे साहित्य आहे. भांबोली येथे झारखंड राज्यातून आलेल्या नागरिकांना मदत करण्यात आली.
 
पाटणमध्ये रक्तदान शिबिर
 
गुढे ता. पाटण येथे गावातील युवा कार्यकर्ते व रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या सहभागातून बुधवार, ता. 1 एप्रिल रोजी रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये एकुण ८० जण सहभागी झाले. यात दोन महिलांचा समावेश होता.
कराडमध्ये हेल्पलाईन

लॉक डाऊनच्या काळात नागरिकांना, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना, योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा यासाठी राष्ट्र संवर्धन संस्था, कराडतर्फे 🚩'डॉक्टर्स हेल्पलाईन' सुरु करण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत ही हेल्पलाईन सुरू असेल. डॉ प्रकाश सप्रे (9657719841), डॉ निखिल आगवेकर (9423830195), डॉ कृष्णात शिंदे (7045600007), डॉ मकरंद बर्वे (9403783105), डॉ दीपक माने (8308181230), डॉ सुजित भालेकर (7875082087), डॉ एस. आर. पाटील (9423272689) आणि डॉ संभाजी फडतरे (8600920751) यांचा यात सहभाग आहे.
जीवनदायी रक्तदाता सूची

कराड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रक्तपेढी व रक्तदाते यांच्यामध्ये संवाद निर्माण करण्याच्या हेतुने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात रक्तदात्यांची नोंदणी करण्यात येते.. त्यानंतर 'सोशल डिस्टन्सिंग'च्या नियमांचे योग्यप्रकारे पालन करता रक्तपेढीच्या आवश्यकतेनुसार या दात्यांना रक्तदानासाठी पाठवले जात आहे. आतापर्यंत १२६ रक्तदात्यांची सूची तयार झाली असून 4 रक्तपेढ्यांना रक्तदान केले जात आहे. आजपर्यंत ३१ जणांनी रक्तदान केले आहे.
सांगली जिल्हा

शासनाने विनंती केल्यानुसार मिरज हायस्कूल मध्ये निवासासाठी आलेल्या २२५ नागरिकांची एक वेळ जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मिरज येथून १५० जणांना २ वेळचे जेवण आणि सांगली येथून १२५ जणांचे दोन वेळचे जेवण या हिशेबाने बनवलेले ७७५ जेवणाचे संच गरजूं पर्यंत पोहचवले. गरजू कुटुंबे ज्यांच्या घरी शिजवायची व्यवस्था आहे अशा १०६ जणांना शिधा घरी दिला आहे. त्यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, १ किलो डाळ आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर येथील संघ स्वयंसेवक, उद्योजक सिद्धार्थ शिंदे यांनी होम क्वारंटाईनसाठी स्वतःचे थ्री स्टार हॉटेल मागील आठवड्यापासून प्रशासनाला खुले करून दिले आहे. शहरातील ताराबाई पार्क परिसरात कीज सिलेक्ट कृष्णा इन हे त्यांचे हॉटेल आहे. हॉटेलमधील २८ रुम या कोरोनाबाधित रुग्णांसाठी देण्याचे त्यांनी ठरविले. ही कल्पना त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर मांडली. त्यानंतर सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन सिद्धार्थ यांनी आपले हॉटेल होम क्वारंटाईनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी खुले केले. एकूण २२ व्यक्ती सध्या या हॉटेलमध्ये एक आठवड्यापासून आहेत. क्वारंटाईन असलेल्या ज्यांना घरातून डबा येणे शक्य आहे, त्यांना घरातून जेवणाचे डबे येतात. मात्र ज्यांना जेवणाचे डबे येत नाहीत त्यांच्यासाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय सिद्धार्थ यांनी केली आहे. सिद्धार्थ भारतीय किसान संघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. प्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांचे नातू सिद्धार्थ शिंदे २०१३ पासून कोल्हापुरात हॉटेल व्यवसाय यशस्वीपणे चालवतात. व्यवसायाला मानवतेची जोड देवून आदर्श निर्माण केला आहे.

डॉ. हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजीच्या माध्यमातून हेल्पलाईन

कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक शासकीय व खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटल मध्ये रुग्णांची अनावश्यक गर्दी वाढत आहे. ही गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकते. ही गर्दी टाळण्यासाठी तसेच प्राथमिक उपचार देण्यासाठी इचलकरंजी येथे सेवाभारती वैद्यकीय हेल्पलाईन (medical helpline) सुरू करण्यात आली आहे. आरोग्यविषयक किंवा मानसिक कोणतीही समस्या असल्यास तुम्ही आपल्या परिसरातील डॉक्टर व सायकोथेरपीस्ट (समुपदेशक) यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क करून तुमच्या शंका दूर करू शकता अथवा उपचार घेऊ शकता, अशी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांची सूची उपलब्ध असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सोलापूर जिल्हा सोलापूर रुग्णालय आणि नवीन विडी कामगार वसाहत येथे 1 एप्रिल पासून रोज एका वेळेस 300फूड पॅकेट पूर्ण जेवण वाटप सुरु आहे. पंढरपूर शहरामध्ये कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटूंबांना शिधा व तयार जेवण पोहोचवण्याचे दृष्टीने मदतकार्य नियोजनपूर्वक सुरू करण्यात आले आहे. वेदांत भक्तनिवास येथे तामिळनाडू येथील १०२ युवकांची रहाण्याची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था संघ कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे. विविध वस्तीतील १० कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन उत्पन्नावर अवलंबुन आहे त्यांना पुढील १० दिवसांचा शिधा वाटप करण्यात आले. ज्यात ५ किलो गहू, २ किलो तांदुळ, १ किलो डाळ व १ लि. तेल ई. चा समावेश आहे.
रक्तदान शिबिर

रा.स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. सोलापुरातील विक्रमादित्य नगर येथील जुने विठ्ठल मंदिर मंडळ आणि कसबा गणपती मंडळ (मल्लिकार्जुन मंदिर) यांच्या वतीने रक्तदान शिबिर झाले त्यात सुमारे ४८ जणांनी रक्तदान दिले.

नाशिक जिल्हा, शहरी भागात भाजी व फळांची घरपोच सेवा

रा.स्व.संघ गिरनारे नगर आणि व्हेज बास्केट यांच्या संयुक्त प्रयत्नाने गिरनारे परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल घरपोच विक्री उपक्रम सुरू आहे. परिसरातील ४ ते ५ स्वयंसेवकांनी एकत्र येऊन व्हेज बास्केट नावाने व्हाट्स एप ग्रुप च्या माध्यमातून उपक्रम सुरु केला. यात वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, धान्य व फळे ऑर्डर प्रमाणे गिरनारे येथून पॅक करून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचवले जाते. कोरोना पासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने प्रत्येक नागरिकाला घरात राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत, मात्र जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. रा.स्व.संघाच्या सेवा आणि महाविद्यालयिन विभागाने शहराच्या महात्मा नगर, गंगापुर रोड, कॉलेज रोड, त्र्यम्बक रोड परिसरातील नागरिकांना घरपोच शेतमाल मिळावा व शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीचा सुद्धा प्रश्न सुटावा या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केला आहे.
 
 
विश्व संवाद केंद्र,पुणे व प्रांत प्रचार विभाग द्वारा प्रकाशित 
Powered By Sangraha 9.0