सर्वांची परीक्षा

03 Apr 2020 22:20:50
mumbai gateway of india _
 



सध्याची करतीसवरती पिढी सांगतेच, पण जे शंभरीपर्यंत पोहोचले आहेत आणि ज्यांनी आयुष्याचे शतक पार केले आहे, तेही सांगतात की, मुंबई एवढी कधीच थांबली नव्हती. आजघडीला देशांतर्गत विमानवाहतूक सेवा बंद आहेच, पण आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक सेवाही बंद आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय रेल्वेसेवा बंद आहे. बेस्ट बससेवा फक्त अत्यावश्याक सेवांसाठी उपलब्ध आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेदेखील बंद आहेत. जेथे रस्ता तेथे धावणारी एसटीही बंद आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर सगळ्या सीमा बंद आहेत. ‘तू माझ्याकडे यायचे नाही आणि मी तुझ्याकडे येणार नाही,’ अशा प्रकारची ही बंदी आहे. पण, हे कोणी ठरवून केले असते तर ते शक्य नव्हते, पण एका विषाणूच्या दहशतीने हे घडले आहे. आज प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव आहे ते कोरोना. प्रत्येकाला त्याने एकाच जागी थिजवून ठेवले आहे. केवळ कोरोनाच्या भयापोटी; अन्यथा घड्याळाच्या काट्याप्रमाणे २४ तास धावणारी मुंबई पंधरा दिवस ते पाऊण महिना थांबणे शक्य नव्हते. एकट्या मुंबईत रेल्वेने सुमारे दररोज ७० लाख लोक प्रवास करतात आणि ‘बेस्ट’ बसने सुमारे ३० ते ३५ लाख लोक प्रवास करतात. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या शब्दात ताकद होती म्हणून त्यांच्या हाकेसारशी रेल्वेची चाके थांबायची. २६ जुलै, २००५ पासून मुंबईकरांनी वरुणराजाची एवढी दहशत घेतली आहे की, अर्धा-पाऊण तास सातत्याने जोरदार बरसला तरी मुंबईला तात्पुरता का होईना ‘ब्रेक’ लागतो. मात्र, कोरोनाने या सर्व घटना विस्मृतीत जायला लावाव्या, एवढी दहशत निर्माण केली आहे. ’बेटा बाहेर जाऊ नको, नाही तर वाघोबा घेऊन जाईल,’ अशी भीती माता मुलांना दाखवतात. त्यांनी वाघ पाहिलेला नसतो. पण एक अनामिक भीती निर्माण होते. तशीच भीती आता कोरोनाविषयी निर्माण होत आहे. घरात थांबाल तर वाचाल, पण बाहेर पडाल तर कोरोना गिळंकृत करेल, अशी ही भीती आहे. पंतप्रधानांनी तर दरवाजाबाहेर लक्ष्मणरेषाच आखायला सांगितली आहे. कोरोनाच्या पराभवासाठी ही सर्वांची परीक्षा आहे. तेव्हा, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कुठलाही अभ्यास करायचा नाही, तर फक्त घरी राहून स्वत:ची काळजी घ्यायची आहे, एवढेच!

 

बाजार थांबवा!

 

राज्यात शिरकाव केलेल्या कोरोनाने आता आपला विळखा आणखीन घट्ट करायला सुरुवात केली आहे. दोन-चार संख्येने आढळणारे कोरोनाबाधित आता मोठ्या संख्येने आढळू लागले आहेत. गर्दीचे शहर असलेल्या मुंबईत बुधवारी ५९ आणि राज्यभरात ७२ रुग्ण आढळताच सर्वत्र खळबळ माजली. गुरुवारीही त्याच संख्येने रुग्ण आढळले. मुंबईत ५७ तर राज्यात ९१ रुग्ण सापडले. कोरोनाबधितांची संख्या मुंबईत २३८ वर पोहोचली असून राज्यभरात ४१६ झाली आहे. कोरोनाचा हा पुढचा टप्पा सुरू झाला असून शासन आणि प्रशासन आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत. लोक त्याला साथ देत आहेत. मात्र, १० टक्के लोक असे आहेत की, त्यांच्यामुळे सर्व व्यवस्थाच विस्कळीत होत आहे. ‘लॉकडाऊन’ असले तरी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा २४ तास सुरू ठेवला असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दिवसभर सुरू ठेवली आहेत. ठराविक वेळेत दुकाने खुली ठेवली तर नागरिक गर्दी करतील आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ पळाले जाणार नाही, ही भीती. मात्र, तरीही काही टक्के बेफिकीर नागरिक शासनाच्या उद्देशालाच हरताळ फसताना दिसत आहेत आणि त्याचे परिणाम सर्व समाजाला भोगावे लागत आहेत. सध्या सर्वत्र आणीबाणीची वेळ आहे. अशावेळी जिभेचे चोचले न पुरवता जे मिळेल ते खाऊन वेळ निभावून नेली पाहिजे. मात्र, काही लोक साग्रसंगीत भोजनासाठी भाजीबाजारात गर्दी करत आहेत. हे निश्चितच समाजासाठी घातक आहे. दादरच्या भाजीबाजारात गर्दी होते म्हणून तो बाजार दहिसर, मुलुंड या टोलनाक्यांवर तसेच बीकेसी आणि सोमय्या मैदानांवर नेला. पण तेथेही तीच गर्दी आणि तोच बेशिस्तपणा. बोरिवलीत पोलीस ठाण्याच्या बाजूला आणि न्यायालयाच्या अगदी लगत रस्त्यावर भरणार्‍या भाजीबाजारात तीच गर्दी. यावेळी नियमही धुडकावले जात आहेत. त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागत आहेत. त्यापेक्षा काही दिवस हा बाजारच थांबवणे इष्ट ठरेल. त्या दृष्टीने विचार करावा, हेच योग्य. ती वेळ आली आहे, हे निश्चित.


- अरविंद सुर्वे 


Powered By Sangraha 9.0