चिन्यांचे चित्रविचित्र खानपान

    दिनांक  03-Apr-2020 22:00:45   
|
wuhan market_1  
 
 कुत्रे आणि मांजरी हे पाळीव प्राणी आहेत. त्यांचा आणि माणसाचा खूप जवळचा संबंध. या पाळीव प्राण्यांचे मांस खाण्यावर हाँगकाँग आणि तैवानमध्ये बंदी आहे. ही बंदी मानवी सभ्यतेला अनुकूल आहे, असे सांगत दक्षिण चीनच्या शेन्जेन प्रांत प्रशासनानेही कुत्रे आणि मांजरींना मारून खाण्यास बंदी घातली आहे. मे महिन्यापासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्थात, या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती कोरोनाची.


कोरोना आणि चीनच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अमेरिकन राजनेता आणि सिनेटर जॉन कॉर्नयनने एक विधान केले होते. जॉन कॉर्नयन जे म्हणाले
, त्याचा थोडक्यात मथितार्थ असा की, चीनमधूनच कोरोना आला. कारण, या देशाची खानपान संस्कृती. वटवाघूळ, साप आणि कुत्रे, मांजरे खाणारा हा देश. त्यांच्या या खानपानामुळेच रोग उत्पन्न होतात. सार्स, मेस आणि स्वाईन फ्लूू सुद्धा चीननेच जगाला दिलेली देणगी आहे. तर यावर काहींनी कॉर्नयन यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यांचे म्हणणे होते की, चीनची बदनामी करण्यासाठी आणि चीनबद्दल जगभर द्वेष उत्पन्न व्हावा म्हणून मुद्दाम अमेरिकेच्या सिनेटरने हे असे विधान केले. मात्र, कॉर्नयनच्या विधानाला जगभरातून समर्थनही दिले गेले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या खानपान सवयींबद्दल प्रसारमाध्यमांवर अनेक संदेश
, व्हिडिओसुद्धा दाखवले गेले. वटवाघळाचे सूप पिताना, कुत्र्याचे मांस खाताना, उंदराची पिल्ले दारूसोबत रिचवताना आणि चटणीसारखे किडे आणि मुंग्या खाताना चिनी अशाप्रकारचे हे व्हिडिओ होते. खरे तर हे सगळे आपल्या भारतीयांसाठी अंगावर शहारे आणणारे. चीनमधल्या या असल्या खानपान सवयींविषयी बोलताना एकाने लिहिले आहे की, चीनमध्ये आपण विचारही करू शकत नाही, अशा प्राण्यांचे विशिष्ट अवयव काढून त्यांचे पदार्थ बनवले जातात, तर अशा या चीनमध्ये एक सुविचार आहे, तो म्हणजे देवाने सृष्टी निर्माण केली ती माणसांसाठी. प्राण्यांना माणसांसोबत राहण्यासाठी देवाने बनवले नाही, तर माणसांच्या उपयोगासाठी देवाने प्राण्यांना बनवले. चीनमध्ये या खाद्यपरंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे.


चिनी लोक कुत्रे
, मांजरी, साप आणि उंदीर का खातात, असे एक सर्वेक्षण काही वर्षांपूर्वी केले गेले. त्यामध्ये निष्कर्ष होते की, चिनी लोकांच्या परंपरेमध्ये देवाला प्रसन्न करण्यासाठी कुत्र्याचा बळी देणे, हे भक्तीचे प्रतीक होते. तसेच चिनी औषधी परंपरेमध्ये कुत्र्याच्या मांसाला औषधी सांगितले आहे. त्यामुळे चिनी लोकांचा समज आहे की, कुत्र्याचे मांस खाल्ल्यावर पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते. तसेच उंदीर खाल्ला की, केस गळायचे थांबतात, टक्कल पडत नाही आणि पांढरे केस काळे होतात म्हणूनही उंदरावर ताव मारणारे चिनी लोक आहेत. त्यामुळे चीनमध्ये कोंबडी किंवा बैलाच्या मांसापेक्षा उंदराचे मास महाग आहे. साप का खातो, यावर चिन्यांचे उत्तर होते, “साप कुणीही खाऊ शकत नाही. उच्चभ्रू लोकच साप खाऊ शकतात.” याचे दुसरेही एक कारण आहे की, साप कुठेही मिळत नाही. तसेच सापाला पकडून त्याचे मांस शिजवणे हे शौर्याचे काम आहे. विशेष पाहुणे किंवा अतिशय आदरणीय व्यक्तीसाठी सापाचे सूप असते. तसेच सापाचे सूप प्यायल्याने श्रीमंती येते, रक्त शुद्ध होते आणि त्वचा नितळ होते, असाही त्यांचा गैरसमज आहे.


छे
, काय गैरसमज आहेत. त्यांच्या या गैरसमजातून मुक्या प्राण्यांचा जीव गेला. चीनमध्ये युलिन शहरात तर ‘डॉग मिट फेस्टिव्हल’ही होतात. हे सगळे कल्पनातीत आहे. यावर जगाने आक्षेप घेतला, तर चिन्यांचे म्हणणे कुत्रा आणि बैल यामध्ये काय फरक आहे? तसेच कुत्रे आणि मांजरींना खाण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर कुत्र्याचे मांस विकणार्‍या चीनची मोठी कंपनी ‘फॅनक्युई डॉग मिट’ नावाच्या कंपनीने म्हटले की, “कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी म्हणजे चीनच्या संस्कृतीवर आघात आहे.


आपली प्राचीन संस्कृती संपवण्याचा पाश्चात्त्यांचा कट आहे.” मात्र
, या विधानावर चीनच्या काही विचारवंतांनी म्हटले की, कुत्रा आणि मांजर खाल्ल्यामुळे जगभरात चीनची नालस्ती होते. चिनी लोकांना खाली पाहायला लागते, तर आपण जगाच्या सोबत चालायला हवे. त्यामुळे कुत्रा आणि मांजरीचे मांस खाणे बंद करावे. तेही संपूर्ण चीनमध्ये. आता चीनने कायदा तर केला आहे, पण माणूस सोडून सर्वच खाणार्‍या चीनमध्ये हा कायदा पाळला जाणार का? हाही प्रश्न आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.