नोकरदार ते उद्योजक

03 Apr 2020 13:30:49
dry clean_1  H
पलक्कड... तामिळनाडू आणि केरळच्या सीमारेषेवर असलेला एक भाग. मल्याळम भाषेत ‘कड’ म्हणजे जंगल. खर्‍या अर्थाने हा जंगल प्रदेश. या भागात राहणारा पी. राधाकृष्णन १९४० साली मुंबईत राहायला आला. एका प्रथितयश मासिकात काम करू लागला. पुढे त्याचा मुलगा विविध पदव्या घेऊन आणि डोळ्यात उद्योजकतेचे स्वप्न घेऊन अपार कष्ट करू लागला. या अपार कष्टातूनच आकारास आला ‘अद्वया उद्योगसमूह.’ या उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा म्हणजेच नंदकुमार कृष्णन होय.


पी. राधाकृष्णनचा विवाह कंदावती या सुविद्य तरुणीसोबत झाला. ती एका शाळेत शिक्षिका होती. या दाम्पत्याला पुढे दोन मुली आणि एक मुलगा झाला. कालांतराने मोठी मुलगीसुद्धा शिक्षिका झाली तर धाकटी बीएआरसी इस्पितळात परिचारिका म्हणून काम करू लागली. नंदकुमारचं शालेय शिक्षण गोरेगावच्या विवेक विद्यालयात झाले. या मुलांचा जन्म मुंबईतला. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर त्यांची चांगली पकड होती. मात्र, आपल्या मुलांनी मातृभाषा विसरता कामा नये म्हणून त्यांच्या आईने त्यांस तामिळ, मल्याळम शिकविल्या जाणार्‍या विवेक विद्यालयात धाडले. दहावीनंतर नंदकुमारने अंधेरीच्या चिनॉय महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून त्याने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली.


पदवीधर झाल्यावर नातेवाईकाच्या ओळखीने तो देव आनंदच्या ‘नवकेतन फिल्मस्’मध्ये कामाला लागला. तिथे सहा महिने त्याने काम केले. त्यानंतर युडीआयने भारतातील पहिले ‘येल्लो पेजेस’ सुरू केले होते. तेथे काही महिने त्याने काम केले. ‘नवकेतन’मध्ये असताना नंदकुमारचे काम देव आनंद यांनी पाहिले होते. त्यांना नंदकुमारचा प्रामाणिकपणा आणि कामात झोकून देण्याची वृत्ती आवडली होती. त्यांनी नंदकुमारला परत बोलावून आनंद रेकॉर्डिंगची जबाबदारी दिली. त्या काळात आनंद रेकॉर्डिंगमध्ये चित्रपटाचे मिक्सिंग, डबिंग, रेकॉर्डिंगसारखी पोस्ट प्रॉडक्शनची कामे चालत. ‘मैंने प्यार किया’, ‘तेजाब’सारख्या सिनेमांच्या पोस्ट प्रॉडक्शनची कामे याच स्टुडिओमध्ये पार पडली होती.


वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्यानंतर नंदकुमार काम करत शिकत होता. मुंबईच्या एका विधी महाविद्यालयातून त्याने ‘बॅचलर इन जनरल लॉ’ ही विधी शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘कॅनेडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतून ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल मॅनेजमेंट’ ही दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. दरम्यान, स्टील पाईप्स आणि ऑईल्स या क्षेत्रात अग्रणी असणार्‍या एका नामांकित कंपनीमध्ये एका छोट्या पदापासून नंदकुमारने सुरुवात केली. उपाध्यक्ष पदापर्यंत तो पोहोचला. स्वत:चं काहीतरी करायचं, या उद्देशाने त्याने कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याने ‘ओम कन्सल्टंट्स’ नावाची स्वत:ची सल्ला क्षेत्रातील कंपनी सुरू केली. विविध कंपन्यांना मार्केटिंगच्या बाबतीत सल्ला देण्याचे काम कंपनी करू लागली.


दरम्यान, त्यांनी ‘एक्झिम मॅनेजमेंट’ या विषयात पदविका प्राप्त केली. ‘ओम कन्सल्टंट्स’च्या माध्यमातून उद्योजकांना ते सल्ला देण्याची सेवा पुरवित होते. पण, आता त्यांना सर्वसामान्यांना चांगली सेवा द्यावी, असा उद्योग करण्याचे ठरविले. पुष्कळ अभ्यास केल्यानंतर त्यांनी ठरविले की, आपला व्यवसाय ‘रोटी-कपडा-मकान’ या मूलभूत गरजांच्या त्रयींपैकी एकाशी संबंधित असावा. त्यातून त्यांना लॉण्ड्रीचा व्यवसाय खुणावू लागला. काही महिने या क्षेत्रातील बाजारपेठेचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. अमेरिकेतील एका प्रख्यात लॉण्ड्री कंपनीसोबत सहकार्य करार केला. तिथल्या धर्तीवरची आधुनिक लॉण्ड्री त्यांनी भारतात उभी केली.


‘अद्वया ड्राय क्लिनिंग’ ही कपडे सफाई क्षेत्रातील एक क्रांतिकारी संस्था आहे. साधारणत: कपडे सफाईसाठी वापरले जाणारे ‘पर्क्लोरोएथिलीन’ नावाचे घातक रसायन ‘अद्वया ड्राय क्लिनिंग’मध्ये वापरले जात नाही. पर्यावरणपूरक असे अमेरिकेतील अलायन्स लॉण्ड्रीची यंत्रसामुग्री ‘अद्वया ड्रायक्लिनिंग’मध्ये वापरली जाते. या स्वयंचलित यंत्रणेमुळे पाण्याची बचत होते. कपडे धुण्यासाठी पर्यावरणपूरक अशा अल्कधर्मी पावडरचा वापर केला जातो. या प्रक्रियेमुळे कपडे निव्वळ उजळत नाही, तर त्यांना मजबुतीही मिळते. स्टीम आयर्निंग, फॉर्म फिनिशिंग मशीन यासारख्या अद्ययावत यंत्रणा येथे कार्यरत आहेत. यामुळे अवघ्या तीन तासांमध्ये कपडे ग्राहकांना मिळण्याची सुविधा हे सुद्धा ‘अद्वया’चे ठळक वैशिष्ट्य आहे.


विविध संस्थांसोबत संलग्न होऊन समाजाने दान स्वरूपात दिलेले कपडे गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘अद्वया’ करते. ‘अद्वया ड्राय क्लिनिंग’च्या विविध शाखा लवकरच विविध शहरांत सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. “रोजगार निर्मिती हे आपले प्रमुख उद्दिष्ट असून जर कोणाला ‘अद्वया’ची शाखा सुरू करायची असेल, तर आपण सर्वतोपरी सहकार्य करू,” असे नंदकुमार कृष्णन यांचे म्हणणे आहे.


नंदकुमार यांना त्यांच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबाची अनमोल साथ लाभली. त्यांच्या पत्नी इंदू यासुद्धा सासूप्रमाणेच शिक्षिका आहेत. मोठा मुलगा गौरव जर्मनीमधून ‘इंजिनिअरिंग मॅनेजमेंट’ विषयात ‘मास्टर्स’ करतोय, तर छोट्या गौतमने बारावीची परीक्षा दिली आहे.


Powered By Sangraha 9.0