धारावी परिसरातील २५०० लोक होम क्वारंटाइन

03 Apr 2020 12:27:57
dharavi_1  H x

मुंबई महानगर पालिकेकडून खबरदारीचा उपाय

मुंबई : धारावीमधील बालिगा नगर परिसरातील २ हजार ५०० लोकांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. बालिगा नगरमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर २४ तासांत याच परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाही कोरोना विषाणूची बाधा झाली. बालिगा नगर परिसरात ३०८ सदनिका आणि एकूण ९१ दुकाने आहेत. हा संपूर्ण परिसरच सील करण्यात आला आहे. या अडीच हजार लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तू त्यांना मुंबई महानगर पालिकेकडून पुरवल्या जाणार आहेत.


मुळचा वरळी येथील रहिवासी असलेला आणि बालिगा नगर परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. तो सध्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत धारावीमध्ये काम करणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांच्या हातावरही होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.


तर बालिगा नगरमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेला ५६ वर्षांचा व्यक्ती हा तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा संशय आहे. मात्र या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ही बाब नाकारली आहे. पोलिस याचा अधिक शोध घेत आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ७० हाय रिस्क असलेल्या व्यक्तींची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. या हाय रिस्क व्यक्तींमध्ये सायन रुग्णालयातील काही व्यक्तींचा समावेश आहे, उपचारांसाठी तो या रुग्णालयात गेला होता.
Powered By Sangraha 9.0