गेले कुठे सहिष्णुतेचे तथाकथित रखवालदार? : आमदार अँड. आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2020
Total Views |
Ashish shelar_1 &nbs 
 
 
 
 
 


असहिष्णूतेच्या नावाने गळा काढणारे गेले कुठे? पुरस्कार वापस करणारे गेले कुठे?

 
व्यक्तिस्वातंत्र्य, माध्यम स्वतंत्र्य, याच्या नावाने ओरडणारी माणसे गेली कुठे...? महाराष्ट्रातील ही माणसे आहेत कुठे? असा सवाल सध्या या देशातील बऱ्याच जणांना पडतो आहे. त्याची कारणे ही तशीच आहेत. महाराष्ट्रात तीन निष्पाप माणसांना जमावाने ठेचून मारले, तर एका संपादकावर हल्ला झाला. दोन टीव्ही पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले. सोशल मिडियावरुन सरकारवर, मंत्र्यांच्या विरोधात लिहिणाऱ्यांना ठेचून काढले... हेतर भंयकर अमानवी आहे ना, मग ते पुरस्कार वापसीकार गेले कुठे ? आता कुठे गेले सहिष्णुतेचे तथाकथित रखवालदार?... म्हणून गझलकार इलाही जमादार म्हणतात तेच सत्य आहे... अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा! या देशातील विशेषतः महाराष्ट्रातील अशा मुखवटाधारी ढोंगी चेहऱ्यावरील मुखवटे आता गळून पडू लागले आहेत.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशात सरकार आल्यानंतर या देशातील काही विध्वंसक शक्तीनी देश डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. जसे की भाजपचे नेतृत्व, भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपाचे मतदार या देशात वेगळ्या ग्रहावरुनच आले आहेत, असे वातावरण तयार करण्यात आले. या देशातील जनतेने लोकशाही मार्गाने दुसऱ्यांदा प्रचंड विश्वासाने पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांना बसविले पण जनमतांचा हा कौल सुध्दा न मानणारी माणसे कोण आहेत, ते सगळे चेहरे जगासमोर आले.
 
 
आता या सगळ्या चेहऱ्यांवरील ढोंगी मुखवटे बघा कसे गळून पडू लागले आहेत आणि आजून ही जे मुखवटे घालून बसलेत त्यांचे मुखवटे आम्ही आता फाडून त्यांचे ढोंग जगासमोर आणायला हवे. महाराष्ट्रात गेली २५ वर्षे आमचा मीत्रपक्ष शिवसेना आमच्या सोबत युतीत होता, कधी सत्तेत आमच्या सोबत राहिला आता आम्हाला सोडून वेगळी चूल मांडली. त्या राजकीय भूमिकांचे आज विश्लेषण इथे मी करत नाही. पण संदर्भासाठी त्याची आठवण करुन दिली यासाठी की, आमचा हा परममित्र पक्ष आमच्या सोबत असोवा, सोबत नसो, या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे सदैव भाजपावर, विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेतच आहेत.
 
 
गेल्या सहा वर्षातील कुठलाही सामनाचा अंक काढून पहा, अग्रलेखापासून रोखठोक पर्यंत आणि हेडलाईन पासून वाचकांच्या पत्रांपर्यंत व्यक्तीगत आणि भाजपावर पातळी सोडून टीका टीका आणि.टीकाच आहे. आजही हे सुरु आहे. या संपादक महोदयांनी मोदी-शाह जोडीचे जे आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचे नेतृत्व आहे, आमचे आदराचे स्थान असलेल्या या दोन नेत्यांचे कधी बाप काढले, कधी खानाची फौज म्हटले तर कधी पिंडाला कावळा शिवे पर्यंत लिहून जिवंतपणी आमचे श्राध्दही घातले. आम्ही त्याला टीकेला टीकेने उत्तर दिले पण भाजपाचा कार्यकर्त्याने लोकशाहीच्या मर्यादा ओलांडल्या नाही. या आमच्या सोबत देशात आणि महाराष्ट्रात सत्तेत असताना रोज सामनाने आमच्या दोन्ही सरकारवर टीका केली त्यावरुन इतर वर्तमानपत्रांचे रखानेच्या रखाने भरले, टीव्हीची तर बुलेटीनवर बुलेटीन निघाली. पण भाजपच्या नेत्याने, कार्यकर्त्यांनी संयम कधीच सोडला नाही.
 
 
तरी दुर्दैवाने आम्हाला असहिष्णुतेच्या रँपरमधे गुंडाळले. गेल्या सहा वर्षातील भाजपावर झालेली जहरी टीका त्याचे सामना हे एक टोक तर सोशल मिडिया हे दुसरे टोक. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शाह, देवेंद्र फडणवीस असो वा मी..आम्हाला सोशल मिडावर ट्रोल करणाऱ्यांना आम्ही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले तसे ढोरासारखे मारले नाही. कधी आम्ही तो विचारच आमच्या मनाला शिवला नाही. आमचं सोडा या देशाती जनमाणसाने लोकशाहीने निवडून दिलेल्या, आंतरराष्ट्रीय स्थरावर सन्मान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तर रोज कुठल्याही गल्ली बोळातील माणूस उठसूट शिव्या देतो, त्याला सोशल मिडीयावर भाजप कार्यकर्त्यांनी जरुर उत्तर दिले असेल, पण आव्हांडासारखा अमानुष हल्ला नाही केला.
 
 
स्वतः पंतप्रधानांनी कधी अशा लोकांचा दुस्वास केला नाही. पण त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देणारे मोदी प्रेमी, भाजप प्रेमी आहेत त्यांना "ट्रोलरची टोळी" ठरवून शोध ग्रंथ ही प्रकाशित झाले. तिथेही भाजपाने आणि भाजपाच्या प्रगल्भ नेतृत्वाने संयमच दाखवला. मग देशातील कोणती ही एखादी घटना भाजपाशी जोडून साप साप म्हणून सुध्दा भाजपाला अनेकांनी धोपटले. आम्ही तेही सहन केले, तरी या देशात आम्ही असहिष्णू ठरलो. वारे वा पुरस्कार वापसीवाले!
 
 
मग आज प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो, महाराष्ट्र सरकार मधील मंत्री पदाची शपथ घेतलेले जितेंद्र आव्हाड जे एका सोशल मिडीयावर लिहीणाऱ्याला जीव जाईपर्यंत मारतात ते आव्हाड हे सहिष्णूतेचे तुमचे आदर्श काय? एक अर्णव गोसामी त्यांच्या अर्ध्या तासाच्या शो मध्ये टीका टीपणी करुन पाच दहा मिनिटे बोलले तर त्यांच्यावर थेट हल्ला? त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतात. त्यांना १२ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते. ही वागणूक ? मी इथे आव्हांडावर टीका करणाऱ्यांचे किंवा अर्णव यांनी मांडलेल्या मतांचे चर्चा करीत नाही. त्यांची वैयक्तिक मत आहेत ती, ज्यांना पटत नाही त्यांनी त्यांच्यावर हल्ले करायचे? मग आता कुठे गेले विचार स्वातंत्र्य? भाषण स्वातंत्र्य? माध्यम स्वातंत्र्य? बरं अर्णव त्यांच्या बाबतीत जे घडले ते ही एक घटना नाही.
 
 
 
टाईम्स नाऊच्या पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले. एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णीचा काय मोठा गुन्हा होता? एक बातमी दिली त्यामुळे म्हणे बांद्रयात जमाव गोळा झाला? म्हणून राहुल कुलकर्णी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन त्यांना.बांद्र्याच्या पोलिस ठाण्यात डांबले. वर्तमानपत्रांची वितरण बंदी घातली मग दडपशाही या पेक्षा वेगळी असते का? सोशल मिडीयावर कोणीही सरकार विरोधी लिहीले तर तातडीने गुन्हे दाखल होतात. एवढेच नव्हे तर एक आयपीएस दर्जाचा अधिकारी या सरकारने या कामासाठी बसवले आहेत अशी माहिती मिळते? मग हे काय सहिष्णुतेचे वातावरण आहे का?
 
 
 
नागरीकांनी, माध्यमांनी बोलायचे नाही बोलला तर एकतर दांडूक्याने ठेचून काढू नाही तर पोलीस ठाण्यात डांबून ठेवू! हे या सरकारचे धोरण. तीन माणसे ठेचून मारली जातात पण त्यामुळे सहिष्णुतेचे वातावरण बिघडत नाही, कारण भगवी वस्त्र घातलेले ते साधू होते म्हणून? का वस्र भगवी घालणारा माणूस, माणूस नसतो? त्याचे मरण मरण नसते? का अर्णव गोसामी यांना या देशाचा नागरिक नाही? त्याला बोलण्याचा अधिकार नाही? का राहुल कुलकर्णी पत्रकार नाही? त्याला उपलब्ध कागदानुसार बातमी देण्याचा अधिकार नाही? एवढेच कशाला, या देशाच्या स्वतंत्र्य संग्रामात दोन जन्मठेपेची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान केला जातो, ते महाराष्ट्राचे सुपुत्र नव्हते?
 
 
 
आम्ही बोललो... आम्ही प्रश्न विचारले, आम्ही जनतेचे प्रश्न मांडले, की आम्ही असिष्णु ठरतो.. वा रे वा, आज महाराष्ट्रात काय सुरु आहे ? राज्य सरकार सहिष्णू आहे का? प्रसिद्धी माध्यमांना स्वातंत्र्य आहे का? देशात आयोग्य आणिबाणी आहे पण महाराष्ट्रातील आणिबाणी आरोग्यापर्यंत मर्यादित आहे की, त्यापेक्षा जास्त आहे ? हेही पुरस्कार वापसी करणाऱ्यांनी तपासून पहायला हवे. राज्य तेच आहे सरकार मात्र वेगळी आहेत. मग या दोन सरकारच्या काळात दोन संपादकांच्या उदाहरणे डोळ्या समोर आहेत. आता या दोन संपादकांना दिलेली वागणूक काय सांगते? महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा खरा चेहरा उघड नक्की करते. आम्ही हे बोलून सुध्दा दोषी ठरु, याची आम्हाला कल्पना आहे. पण आम्ही जनतेचे प्रश्न मांडणार. आम्हाला राज्यातील सरकारने मग असहीष्णु ठरवावे, किंवा दोषी ठरवावे. आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. आम्हाला महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने अधिकार दिले आहेत. आम्ही घटनादत्त अधिकारीने या सरकारला सवाल विचारत राहू! त्याशिवाय ढोंगी मुखवटे फाटणार नाहीत. जगाच्या आरशात काही माणसांचे खरे चेहरे दिसणार नाही.
 
 
 
- आमदार अँड. आशिष शेलार,
(माजी, शालेय शिक्षण मंत्री)
@@AUTHORINFO_V1@@