पाकी विचारविषाणू

28 Apr 2020 21:53:23
Tarik Jamieel_1 &nbs
 
 


एकवेळा कोरोना परवडला, पण मुल्लामौलवींचे विचारविषाणू नको, असे म्हणण्याची वेळ पाकिस्तानातील एका मौलवीच्या विवादित वक्तव्यामुळे आली आहे. ‘विवाद आणि पाकिस्तान’ हे समीकरण तसे जुनेच, पण कोरोनाच्या संकटकाळात आणि रमजानच्या पवित्र महिन्यात एका मौलवीसाहेबांनी अकलेचे तारे तोडल्यामुळे पाकिस्तानातूनही त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला आणि मग मौलवींनी मुकाट्याने माफीही मागितली.



पाकिस्तानात महिलांना, अल्पसंख्याकांना किती दुय्यम स्थान दिले जाते, हे वेगळे सांगायलाच नको. पण, मौलाना तारिक जमील यांनी तर चक्क कोरोना महामारीच्या फैलावासाठी महिलांसह इतर काही गोष्टींनाही जबाबदार ठरवत, महिलांनाच ‘जलील’ केले. आता कोणाही सुज्ञ व्यक्तीला हाच प्रश्न पडावा की, महिलांचा आणि कोरोना महामारीचा संबंध तरी काय? तर या महान मौलानांच्या मते, तोकडे कपडे घालून फिरणार्‍या महिलांमुळेच अल्लाची अवकृपा झाली आणि त्याने कोरोनारुपी शाप जगाला 
दिला.



आता मौलानांच्या या मौल्यवान विचारांना म्हणावे तरी काय? जर महिलांच्या कमी कपड्यांमुळे अल्ला क्रोधित झाला असता, तर हे संकट तर माणूस वल्कलांचा वापर करु लागला, तेव्हापासूनच अवघ्या मानवजातीवर घोंगावत असेल. पण, नाही, तेव्हा माणूस कमी कपड्यात, चक्क बिनकपड्याचा हिंडत असला तरी धर्म, अल्ला तरी कुठे अस्तित्वात होता म्हणा? पण, एवढ्यावर थांबतील ते मौलाना कसले... कोरोनाचा दोष महिलांच्या तोकड्या कपड्यांना देऊन झाल्यानंतर त्यांनी आपली गाडी समस्त मानवजातीच्या पापांकडेच वळवली. समाजातील खोटेपणा, फसवणूकदेखील म्हणे कोरोनाला जबाबदार. समाजातील हरवत चालेला मानसन्मान आणि श्रीमंतांच्या धनसंचयानेही मौलानांच्या मते कोरोनाला आमंत्रण दिले. आता समाजातले सगळेच वाईट कसे कोरोनाला कुरवाळणारे याची लांबलचक यादीच मौलाना महाशयांनी सादर केली.



खुद्द पंतप्रधान इमरान खानही या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अख्खा देश हा कार्यक्रम आपल्या टीव्हीवर बघत होता. पण, मौलाना बोलतायत म्हटल्यावर त्यांना थांबवण्याची कोणाची बिशाद? मुस्लीम समाजातील काही मुल्लामौलवींकडून महिलांप्रति होणारी अपमानास्पद टीप्पणी काही नवीन नाहीच. यापूर्वीही महिलांनी लिपस्टिक वापरु नये, केस मोकळे सोडू नये, वॅक्सिंग करु नये आणि इतर अनावश्यक फतव्यांची फौजच जुम्म्याला हजर व्हायची. पण, मानवाधिकार संघटना, सिव्हिल सोसायटी, महिला कार्यकर्त्यांकडून या सगळ्या गोष्टींना वेळोवेळी विरोध होऊनदेखील असले निंदाजनक प्रकार काही थांबलेले दिसत नाहीत. त्यातच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानमधील महिलांनी काढलेल्या मोर्च्यावर झालेली दगडफेक, शिवीगाळ कहर म्हणावी लागेल. पण, कोणाला काय फरक पडतोय, अशी विधाने सर्रास केली जातात आणि मग माफी मागून त्यावर पडदा टाकलो जातो.


पाकिस्तानात तर ही गोष्ट अगदी सामान्य. महिलांना कस्पटासमान दिली जाणारी वागणूक, समाजातील दुय्यम स्थान आणि आता तर चार पैशांसाठी पाकिस्तानी मुलींची चिनी विक्री यावरुन या देशात महिला किती सुरक्षित आहेत, याची कल्पना यावी. पण, मुल्लामौलवींच्या या बेजबाबदार आणि असंवेदनशील वक्तव्यांना या देशातील कायदाही तितकाच दोषी. मौलवींना ना कायद्याचे भय ना सैन्याचे. कारण, धर्म हेच त्यांचे हत्यार आणि तेच त्यांचे सुरक्षाकवच. त्यामुळे बरेचदा मौलवींनी पाकिस्तानात केलेल्या अशा तथ्यहीन विधानांवर कठोर टीका होत असली तरी गजाआड जाणारे कमीच! त्यातच जी विधाने, जे विचार हे मुल्लामौलवी सार्वजनिक व्यासपीठावरुन मांडतात, तर यावरुन खाजगीत, मदरशांमध्ये ती किती विष ओकत असतील, धर्मशिक्षण शिकवताना काय उदाहरणे देत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे धर्माच्या नावावर काहीही बरळण्याचा आपल्याला जणू जन्मसिद्ध अधिकारच आहे, या आविर्भावात ही मंडळी खासकरुन पाकिस्तानात मान वर करुन वावरताना दिसतात.


तेव्हा, पाकिस्तानी नागरिकांनीही या मौलवींच्या अशा वक्तव्यांचा केवळ तीव्र निषेध न करता त्यांच्यावर कडक कारवाईसाठी सरकारवर दबाव टाकावा, जेणेकरून महिलांप्रति अशी अर्वाच्च टीप्पणी करणार्‍यांना कायमची अद्दल घडेल आणि कोरोनापेक्षा भयंकर हे विचारविषाणूंचा प्रादुर्भाव कमी होईल.




Powered By Sangraha 9.0