सोलापूर : ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदूत्ववादी कार्यकत्या, अपर्णा ताई रामतीर्थकर यांचे मंगळवार २८ एप्रिल रोजी निधन झाले. गेल्या महिन्यात गुढीपाडव्याला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर सोलापूर येथे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परखड मते मांडणाऱ्या वक्त्या अशी त्यांची ओळख होती. ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. सोलापूरातील पाखरं संकूल या अनाथ मुलांच्या वसतीगृह उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. संस्कार भारतीच्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या. तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना स्वकतृत्वावर उभे करण्यासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या. महिला बचतगटांच्या माध्यमातून त्यांनी कित्येक कुटूंबांना रोजगार उपलब्ध करून दिला.
एकत्र कुटूंबपद्धती जपण्याची गरज, हरवत चाललेला कुटूंबातील एकोपा, नव्या जीवनशैलीत दुर्लक्षित होत असलेला संस्कारांचा वसा, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर त्यांनी परखड मते मांडली. भारतातील प्रत्येक कुटूंबात प्रत्येक व्यक्तीने नाते जपण्याची गरज असल्याचेही त्यांनी वेळोवेळी सांगितले.
मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले. एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर वकीली सुरू केली. मात्र, न्यायालयात पीडित महिलांची व्यथा आणि वकीलांचे वर्तन पाहून त्यांनी वकीली करायची नाही, असे ठरवले.
अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घालून त्यांनी कित्येक प्रकरणे तडीस नेली. याच माध्यमातून त्यांची ओळख बनली.
चला नाती जपूया, आईच्या जबाबदाऱ्या, अशा विषयांवर त्यांनी हजारो भाषणे दिली आहेत.
समाजातील तुटलेली नाती कुटूंबे पुन्हा जपण्याचे काम त्या नेटाने करत होत्या. गावागावात कामासाठी जाताना केला जाणारा प्रवास केवळ एसटीने करत, त्यांच्या वतृत्वशैलीने आणि समाजकार्याने आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून व नातू, असा परिवार आहे.