किनाऱ्याविषयी बोलू काही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |

 coast _1  H x W
 
 
 
लांबवर पसरलेला वाळू आणि खडकांचा उंच सखल भाग, त्यावर खळाळणार्‍या लाटा, लहान मोठ्या खाड्या, मध्येच जमिनीवरून डोकावणारी नारळी किंवा उंचच उंच सुरुची बने. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण अशी ही कोकण किनारपट्टी अर्थात महाराष्ट्राला लाभलेला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा. त्याविषयी...

 
 
 
 
रेश्मा पितळे - किनारा म्हटले म्हणजे सगळा भरती ओहोटीचा खेळ...
 
हळूहळू खळबळ करींत लाटा,
येऊन पुळणीवर ओसरती
जणू जगाची जीवन स्वप्ने ,
स्फुरती, फुलती, फुटती, विरती!
कुसुमाग्रजांनी किती सहजपणे मानवी जीवन या लाटेच्या खेळाबरोबर गुंफून टाकलंय...
 
 
खरे सांगायचे, तर कवितेत म्हटल्याप्रमाणे मात्र व्यवहारी दृष्टिकोनातून अनेक स्वप्ने आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण पाहिली. ती साकारण्याच्या अविरत प्रयत्नात सागरी किनारपट्टी ही सागरी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, हे मात्र आपण सोयीस्कररित्या विसरलो. त्यामुळे या कल्पना विश्वातून जरा बाहेर येऊन किनार्‍याचे वास्तववादी स्वरूप आणि त्याचे महत्त्व जाणणे अपरिहार्य आहे. किनार्‍यावरील प्राकृतिक रचना, त्यातून निर्माण होणारे विविध सूक्ष्मजीवांसाठीचे अधिवास आणि या सगळ्या भौतिक आणि जैविक घटकांची मिळून एक स्वतंत्र आणि प्रचंड गुंतागुंत असणारी एक परिसंस्था आहे. हे कधी आपण फारसे लक्षात घेतले नाही. किंबहुना महाराष्ट्राच्या ७२० किमी लांबीच्या वाळू-दगडी किंवा खाड्यांचे सविस्तर समान निकषांवर अवलोकन असे झालेच नाही.
 
 
प्लवकांसारख्या (plankton) सूक्ष्म अवस्था किनार्‍यावर येऊन स्थिरावतात आणि येथील जैवविश्व फुलत राहते. हे अपृष्ठवंशीय प्राणी (marineinvertebrates) प्रवाळ आणि माश्यांसाठी कधी अधिवास म्हणून, तर कधी खाद्य म्हणून अन्नसाखळीतील महत्वाचे स्तर अशी आपली भूमिका बजावतात. खरे सांगायचे, तर या अपृष्ठवंशीय प्राण्यांचे आणि शैवाल प्रजातींचे दगडी-वाळू किनार्‍यांवरील जग हे एखाद्या प्रवाळ रीफ इतकेच अतर्क्य, रम्य, रंगीत आहे. लाखो प्रजाती समवेत या परिसंस्था कुठल्याही मानवी हस्तक्षेपांचा किंवा नैसर्गिक घटनांचा सागरी जीवनावर वावगा परिणाम होऊ न देता समतोल राखण्याचे अखंड काम करतात. या सार्‍याचे महत्त्व जाणून ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या अवलोकनास सुरुवात केली आणि समृद्ध जैवविविधतेचा उलगडा होऊ लागला. वाळू, दगड किंवा एखाद्या खाडीतील दलदल हे भौतिक अधिवास जसे बदलतात पर्यायाने तसेच बदल तिथल्या जैवाविविधतेतही प्रकर्षाने दिसतात.
 
 

वाळूचे किनारे
 
  
या किनारपट्टीच्या दक्षिण टोकावर वसलेल्या वेंगुर्ल्यापासून ते निवती-भोगवे, आचरा-मालवण, देवबाग, वायंगणी, विजयदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील माडबन, भाट्ये, मिर्‍या, पाडवे, काजित भाटी ते गणपतीपुळे-रीळ, पालशेत, वेळास. त्यापुढे रायगड जिल्यानातील श्रीवर्धन-काशीद-आक्षी आणि पालघर जिल्ह्यात पसरलेले पांढर्‍या, भुरा-पिवळसर किंवा अगदी काळी अशी रंगसंगती असलेले वाळूचे किनारे आपले नैसर्गिक रूप धरून आहेत. वाळू धरून ठेवण्यार्‍या आणि किनार्‍याची धूप होण्यापासून रक्षण करणार्‍या पुळणीवरच्या नाजूक वेलींच्या काही विशेष प्रजाती इथे सापडतात. मात्र, काही पुळण अधिवासांचे नैसर्गिक स्वरूप बदलून तिथे सुरुच्या झाडांची लागवड केलेली आढळून आली. ही सुरुची बने तिथल्या नैसर्गिक वनस्पतींसाठी घातक, तर आहेतच परंतु कधीकधी समुद्री कासवांच्या विणीच्या मार्गातही अडथळे निर्माण करतात.
वाळूतील सेंद्रिय घटकांचे अविरत प्रत्यावर्तन करून अन्नसाखळीत महत्त्वाचे घटक असणार्‍या शंख-शिंपल्यांच्या, खेकडे किंवा गांडूळ सदृश किड्यांच्या (Polychete worms) शेकडो प्रजाती आणि त्यांच्या पोटजाती वाळू किनारी वास्तव्यास आहेत. समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी वाळूचे किनारे वापरत असल्यामुळे खरे तर या किनार्‍यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे म्हणतात की, कासवांची मादी जिथे आपला जन्म झाला आहे, त्याच किनार्‍यावर पुन्हा अंडी घालण्यासाठी येते. त्यामुळे वर्षानुवर्ष या वाळूची पोत किंवा किनार्‍याची संरचना तशीच अनुकूल असणे अपरिहार्य आहे. वेळास आणि आसपासच्या किनार्‍यांवर प्रामुख्याने दोन समुद्री कासवांच्या प्रजाती बहुसंख्येने घरटी करत असली, तरी वर नमूद केलेल्या बर्‍याच किनार्‍यांवर ओलिव्ह रिडले कासवाची घरटी होत असल्याच्या नोंदी आहेत.
 
रायगडमधील काशीद-अलिबाग आणि पालघर जिल्ह्यातील वसई-दातिवरे परिसरातील वाळूच्या पट्ट्यांना सूरय (terns), कुरव (Gulls), चिखल्या (Plover), तुतारी (sandpipers) यांसारख्या पाणथळ पक्ष्यांची पसंती आहे. मागील अनेक वर्षे येथे स्थलांतरित आणि स्थानिक अनेक प्रजातींचा मूलतः अन्नभक्षणासाठी अगदी सहज वावर असल्याचे निदर्शनात आले आहे.
 
 


coast _1  H x W 
 
 
 
खडकाळ किनारे
 
 
बहुतांशी बेसॉल्टच्या (Basalt) काळ्या दगडातील विविध आकाराचे गोटे, सपाट मंचकाप्रमाणे लांबवर पसरलेला दगडी भाग, त्यातील खाचा-खोबणी किंवा उथळ अथवा खोल तळी अशी काहीशी भौतिक जडण घडण खडकाळ किनार्‍यांवर पाहायला मिळते. हे सारेच भौतिक अधिवास आपापली खासियत घेऊन विशिष्ठ अधिवास म्हणून या परिसंस्थेचा एक घटक होऊन जातात. आपल्या सगळ्यांची आवडती कालवे, खाचा-खोबणीत लपलेली लाल-गुलाबी समुद्री फुले, स्पंज, विविध आकारांचे शंख-कवड्या, हिरव्या- लाल किंवा मातकट रंगांच्या शैवाल प्रजाती अगदी सहज नजरेत भरतात. मोहक हिरव्या किंवा काहीशी गडद रंगसंगती घेऊन, सपाट दगडी मंचकावर किंवा साचलेल्या तळ्यांमध्ये पसरलेले ’झूअँथीड्स’ हे अक्षरशा एखाद्या फुलांच्या गालिच्यासारखे भासतात. काळपट रंगाच्या समुद्री काकडीचा वावर ही इथे सहज असतो. दगडी खोबणीत हिरव्या किंवा निळसर रंगाचे काटेरी अर्चीन (seaurchins) किंवा एखादा छोटा दगड उलटून पहिला तर ’स्टारफिश’ (तारामासा) अगदी सहज पाहता येतील. हे खडकाळ-दगडी किनारे जमिनीलगतच्या भूभागाचे मोठ्या लाटांपासून संरक्षण करतात. तांबळडेग-कुणकेश्वर, देवगड, विजयदुर्ग, आंबोळगड-कशेळी, मिर्‍या-उंडी, पालशेत-वेळास-श्रीवर्धन, काशीद-आक्षी या पट्ट्यातील खडकाळ किनार्‍यांवर एखाद्या प्रवाळ रीफमध्ये आढळेल इतकीच जैवाविविधता आणि रंगसंगती इथे अभ्यासायला मिळते. विजयदुर्ग आणि मालवण पट्यातील किनार्‍यालगतची प्रवाळ रीफ (जवळ जवळ 21 प्रवाळ प्रजाती) आणि इतर भागातील लहान मोठ्या पट्ट्यांच्या स्वरूपातील प्रवाळ प्रजातींचे अस्तित्वही तर या किनारपट्टीची मोठी खासियत.
 
 

coast _1  H x W 
 
 
 
 
सध्या महाराष्ट्रातील काही निवडक किनार्‍यांवर कालानुरूप होणार्‍या बदलांचा अभ्यास करण्याचा उपक्रम ’बीएनएचएस’ करत आहे. या जटिल परिसंस्थेतील काही घडामोडींचा उलगडा या अभ्यासातून निश्चितच होईल. या उपक्रमादरम्यान विशिष्ट शंखांच्या आणि इतर सूक्ष्म प्राण्यांच्या नवीन प्रजातींचीही उकल नक्कीच होईल.
 
 
 
खाड्या आणि खारफुटी वने
 
 
खाड्या म्हणजे चिखल-दलदल आणि खारफुटी म्हणजे या दलदलीत प्रचंड खारेपणा, ऑक्सिजनची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्यासाठीच अनुकूल झालेल्या वनस्पती. समुद्रातील काही मासे, खेकड्यांच्या-कोलंबीच्या प्रजाती या पिल्ले/अंडी घालण्यासाठी खाड्यांमध्ये असलेला दलदल आणि खारफुटींचा अधिवास निवडतात. इथेच त्यांच्या पिल्लाची पुढील वाढ होते. त्यामुळे या अधिवासाचे महत्त्व काही निराळेच आहे. आचरा-कोलंब, विजयदुर्ग, नाटे, अनसुरे, भाट्ये, जयगड, दाभोळ, केळशी, दिघी, अगरकोट अशा काही महत्त्वाच्या खाड्या मिळून जवळजवळ खाजण वनस्पतींच्या १८ प्रजाती सापडतात. यामध्ये काही दुर्मीळ प्रजातींचाही समावेश आहे. नुसतेच गाळसंचयनाच्या प्रक्रियेत हातभार लावणे, त्सुनामी सारख्या महाकाय लाटांचा आघात सोसण्याची प्रचंड क्षमता असण्याव्यतिरिक्त एखाद्या घनदाट उष्णकटिबंधीय जंगलाच्या क्षमतेपेक्षा दोन ते तीन पट अधिक कार्बोनडायऑक्साईड शोषण्याची क्षमता खारफुटींमध्ये असते. जागतिक पातळीवर संकटग्रस्त श्रेणीत उल्लेख (IUCN Red List category-Vulnerable) असणार्‍या ’सी ग्रास’ (हॅलोफीला बेकारी) किंवा समुद्री गवताच्या या प्रजातीचे पट्टे नमूद केलेल्या काही खाड्यांमध्ये पाहायला मिळतात.
 
 
आपल्या किनारपट्टीवरचे हे अधिवास आणि त्यांचे विश्व कितीही रंगतदार असले तरी दुर्दैवाने या परिसंस्थांमधील जैविक समीकरणे आपण अजूनही पुरती ओळखू शकलेलो नाही. तशातच समुद्रात, किनार्‍यालगत अथवा खाड्यांमध्ये घालण्यात येणारे भराव, नव्याने येऊ घातलेले मोठ मोठाले कारखाने आणि वीजनिर्मिती प्रकल्प, बंदरांचा विकास या प्राथमिक विकास योजनांना अनुसरून होणारा गाव आणि शहरांमधील साहाय्यभूत विकास पर्यायाने वाढत जाणारी रोजगाराची क्षमता आणि लोकसंख्येचे संकेद्रीकरण ही साखळी प्रक्रिया आपल्या किनारी भागात बर्‍याच अंशी वेग धरू लागली आहे. यासोबतच सांडपाणी, विषारी रसायने,प्लास्टिक प्रदूषण, खारफुटीची कत्तल, तेल गळती, वाढते पर्यटन या समस्या प्रकर्षाने वाढत आहे. त्यांचे अवलोकन करताना सतत निदर्शनास आलेल्या समस्या आणि या सार्‍याचे संभाव्य परिणाम म्हणजे या नैसर्गिक अधिवासांचा आणि प्रजातीचा होणारा र्‍हास. विस्कळीत झालेली अन्नसाखळी आणि पर्यायाने ढासळत जाणारी मासेमारीतील उत्पादन क्षमता. ही परिस्थिती निश्चितपणे गंभीर असली, तरी वर नमूद केल्याप्रमाणे अजूनही आपले कोकण किनारपट्टीवरील काही किनारे त्यांचे नैसर्गिक स्वरूप आणि जैवविविधता टिकवून आहेत.
 
 

coast _1  H x W 
 
 
माहितीपट, सोशल नेटवर्किंग, वृत्तपत्रे आणि अनेक सरकारी धोरणे-पुढाकार अशा अनेक माध्यमातून सागरी विश्वाची महती, संकट ग्रस्त प्रजातींची माहिती, प्रदूषण-प्लास्टिक कचर्‍याचा, समुद्रात राहून गेलेल्या मासेमारीच्या जाळ्यांचा विविध प्रजातींवर होणारा परिणाम हे सारेच जनसामन्यांपर्यंत तीव्रतेने पोहोचू लागले आहे. समुद्रात ओतत असलेल्या कधीही विघटन न होणार्‍या गोष्टी आणि मग याच कचर्‍याचे लाटेबरोबर येऊन तयार झालेले ढिग मुंबई आणि आसपासच्या किनार्‍यांलगत किंवा खाड्यांमध्ये पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत नुकत्याच येऊ घातलेल्या प्लास्टिक/थर्माफोल बंदी सारखे नियम किंवा स्वच्छता अभियानासारखे उपक्रम निश्चितच जमेच्या बाजू आहेत. आपण सामान्य पण जबाबदार नागरिक म्हणून नक्कीच महत्त्वाच्या भूमिकेत आहोत. मुळात प्लास्टिकच्या वस्तूंचा किंवा पिशव्यांचा वापर दैनदिन जीवनात टाळणे, किनारी भागात किंवा खाड्यांमध्ये सर्रास फेकण्यात येणारा कचरा/निर्माल्य न टाकणे, मूर्तींच्या विसर्जनसाठी वेगळ्या पर्यांयांचा अवलंब करणे अश्या अनेक सवयी आपण सहज अंगवळणी पाडू शकतो. सागरी पर्यटन करताना जैव विविधतेला धोका पोहोचणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी निक्षून पाळल्यास विकास कार्यांचा सागरी विश्वात होणारा हस्तक्षेप आणि किनार्‍यांचे मूलतः संपूर्ण सागरी सृष्टीचे संवर्धन या सार्‍याचा समतोल राखणे काही अंशी सोपे होईल.
 
(लेखिका ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’मध्ये (बीएनएचएस) वैज्ञानिक पदावर कार्यरत आहेत)
 
 
तापमान वाढीचे संकट
 
 
मागील काही दशकानुसार अंशाअंशाने वाढत जाणारी जागतिक तापमान वाढ (Global Warming) आणि त्याची परिणती म्हणून सरासरी समुद्र पातळीत होणारी वाढ (Sea Level Rise) आणि समुद्राच्या विशेषतः वरच्या काही स्तरांमध्ये नोंदवली गेलेली तापमान वाढ या मुद्द्यांचा आवाका चांगलाच मोठ्ठा आहे. नुसत्या समुद्री परिसंस्थांमध्येच नव्हे, तर मानवी जीवनावरही या बदलांचे दूरगामी परिणाम दिसून येतात. अगदी सोपे उदाहरण द्यायच झालेच तर आपल्या पूर्व किंवा पश्चिम किनारपट्टीवरील काही सखल भागात किंवा किनारी भागांची धूप झालेल्या प्रदेशात पावसाळ्यात जरा अधिक उंच लाटा आल्या तरी होत असलेला कहर आपण ऐकून आहोत. न जाणे पुढील काही वर्षांत निर्माण होणार्‍या संकटाची ही चाहूल असेल किंवा छोटीशी झलक. उलटपक्षी २००४ साली झालेल्या त्सुनामीच्या हाःहाकारात दक्षिण भारतातील काही भागांना खाजणाच्या जंगलांमुळे मिळालेले संरक्षण किंवा तत्सम अनेक सकारात्मक उदाहरणेही पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर किनार्‍यालगतच्या प्राकृतिक आणि जैविक अधिवासांची हेळसांड, किनार्‍याला लागून होणारे बांधकाम, खाड्यांमधले भराव, खाजणांची वारेमाप कत्तल म्हणजे निसर्गानेच देऊ केलेल्या संरक्षक भिंतींचा र्‍हास करणे आहे. या सगळ्याचा एकत्रित अतिरेकी परिणाम म्हणजे एक दिवस प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी असेल, असे उल्लेख अनेक वैज्ञानिक शोधनिबंधातून किंवा अभ्यासातून कायमच प्रस्तावित केले गेले आहेत. जागतिक तापमान वाढ ही मूळ मुद्द्याला अनुसरून असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जैवविविधतेशी निगडित अशा अनेक पैलूंचा बारकाईने विचार आणि निरनिराळे मतप्रवाह (काही एककल्ली तर काही अनेक मुद्द्यांना समावेशक) अनेक पातळ्यांवर दिसून येतात. परंतु, या मतमतांतराच्या कोलाहलात, किनारी भागांचे व्यवस्थापन आणि संरक्षणासाठी आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या ’किनारी नियमन क्षेत्र’ कायद्याचे आणि प्रस्थापित असलेल्या ’किनारी नियमन क्षेत्रा’चे (Coastal Regulation Zone - सीआरझेड) काटेकोर पालन आणि परिस्थितीकी अभ्यास हेच पर्याय भविष्यात वर्तवल्या गेलेल्या गंभीर परिणामांची व्याप्ती नक्कीच कमी करू शकतात.
 
@@AUTHORINFO_V1@@