पाक क्रिकेटला पुन्हा फिक्सिंगची कीड ; 'या' खेळाडूवर घातली बंदी

27 Apr 2020 19:49:45

umar akmal_1  H
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघ आणि मॅच फिक्सिंग हे काय जगाला नवे समीकरण नाही. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर तीन वर्षाची बंदी घातली आहे. पीसीबीच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला ही शिक्षा ठोठवली आहे. या काळामध्ये त्याला क्रिकेटची संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये सहभाग घेता येणार नाही.
 
पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज म्हणून उमर अकमलची ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शिस्तपालन समिती तपास करत होती. त्याच अंतर्गत त्याची चौकशीदेखील केली गेली होती. या तपासानंतर त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रसिद्धी विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून उमर अकमलवरील कारवाईची माहिती दिली.
 
काय आहे प्रकरण?
 
 
उमर अकमलने एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की त्याला सामना सुरू असताना दोन वेळा चेंडू जाणूनबुजून सोडण्यासाठी २ लाख अमेरिकन डॉलर्स देण्याची लालूच दाखवली होती. भारताविरूद्धच्या सामन्यामध्येच त्याला चेंडू सोडण्यास सांगितल्याचेही त्याने मुलाखतीत स्पष्ट केले. २०१५ला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषका दरम्यान त्याच्याशी फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. पण त्याने ही बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितली नव्हती, त्यामुळे त्याला हा दणका देण्यात आला आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियमावलीनुसार, जर एखाद्या खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी कोणतीही ऑफर मिळाली किंवा संपर्क साधला गेला, तर त्याने याबाबत संघ व्यवस्थापन किंवा संघातील इतर अधिकारी वर्ग यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. जर एखाद्या खेळाडूने तसे न केल्यास आणि तो दोषी सिद्ध झाल्यास त्याच्यावर सहा महिन्याचे निलंबन ते आजन्म बंदीपर्यंतची तरतूद आहे.
Powered By Sangraha 9.0