ममतादीदी, आडमुठी भूमिका घेऊन काय साधले जाणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020   
Total Views |


mamata bannerjee_1 &


ममता बॅनर्जी यांच्या साम्राज्यास भारतीय जनता पक्षाने हादरा दिल्यापासून तर त्या जास्तच आक्रस्ताळेपणे वागताना दिसत आहेत. राज्यपाल हा घटनेनुसार राज्याचा प्रमुख असतो, हे ममता बॅनर्जी यांना मान्य नाही. आपल्याला कोणत्याही प्रकारचा सल्ला देणारे राज्यपाल कोण, असे त्यांना नेहमी वाटत आले आहे. सध्याच्या कोरोना संकटाच्याच बाबतीत नव्हे, तर या आधीही त्यांनी अनेक वेळा राज्यपालांचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला आहे.


संपूर्ण देशात कोरोना विषाणूने जे भीषण संकट निर्माण केले आहे, त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत असताना, काही राजकीय पक्षांना आणि त्या पक्षातील नेत्यांना, सरकार लोकांना घराबाहेर पडू नका, याव्यतिरिक्त अन्य काहीच करीत नसल्याचे वाटत आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी संपल्यानंतर काय करायला हवे, याची काही ठोस योजना सरकारकडे नसल्याचे काही महाभागांना वाटते. पण, या मंडळींचे आरोप तथ्यहीन आहेत असे म्हणता येईल. कोरोना संकटावर मात करण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे, या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे काहींच्या लक्षात येत नसावे किंवा त्याकडे ते मुद्दाम डोळेझाक करीत असावेत! तर काही राज्यांतील नेते आपल्यालाच सर्व काही कळते, अन्य कोणी आपल्याला शहाणपण शिकवू नये, अशा भूमिकेत वावरताना दिसतात. अशा नेत्यांपैकी एक म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी.
 

ममता बॅनर्जी यांच्या साम्राज्यास भारतीय जनता पक्षाने हादरा दिल्यापासून तर त्या जास्तच आक्रस्ताळेपणे वागताना दिसत आहेत. राज्यपाल हा घटनेनुसार राज्याचा प्रमुख असतो, हे ममता बॅनर्जी यांना मान्य नाही. आपल्याला कोणत्याही प्रकारचा सल्ला देणारे राज्यपाल कोण, असे त्यांना नेहमी वाटत आले आहे. सध्याच्या कोरोना संकटाच्याच बाबतीत नव्हे, तर या आधीही त्यांनी अनेक वेळा राज्यपालांचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपाल हे आपल्या सरकारच्या कारभारात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांना वाटत असते. कोरोना संकटाची स्थिती ममता बॅनर्जी यांचे सरकार योग्य प्रकारे हाताळत नसल्याचे राज्यपालांनी त्यांच्या निदर्शनास आणून देताच ममतादीदी एकदम भडकल्या. राज्यपाल जगदीश धनकड यांनी, कोरोना संकटाचा सामना करणार्‍या डॉक्टरांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना ‘पीपीई किट’ आणि अन्य साधनसामग्री पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे राज्यपालांनी ममतादीदी यांच्या लक्षात आणून दिले. राज्यपालांच्या सूचनेची योग्य ती दखल घेऊन कृतीची त्यांच्याकडून अपेक्षा होती. राज्यपाल या पदाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या सूचनांचा आदर राखून काही कृती करणे अपेक्षित होते. पण, राज्यपालांचे ऐकतील तर त्या ममता बॅनर्जी कसल्या? ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांचे म्हणणे तर लक्षात घेतले नाहीच, उलट त्यांनाच पत्र लिहून, त्यांना घटनेने कोणते अधिकार दिले आहेत, ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले! ममता बॅनर्जी यांची ही कृती म्हणजे आपण राज्यपालपदास काही महत्त्व देत नसल्याचेच दाखवून देणारी होती.
 
राज्यपाल जगदीश धनकड यांनी ममता बॅनर्जी यांना तसेच सडेतोड उत्तर दिले. “राज्यातील जनतेचे हित डोळ्यापुढे ठेवून मी आपल्या निदर्शनास काही गोष्टी आणून दिला होत्या,” याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. इस्पितळांतील डॉक्टर आणि अन्य सेवक वर्ग यांना योग्य सामग्रीचा अभाव असल्याकडे राज्यपालांनी त्यांचे लक्ष वेधले होते. प. बंगालमध्ये रेशन देण्याची जी व्यवस्था आहे, त्यात भ्रष्टाचार असल्याचे यानिमित्ताने उजेडात आले आहे. तसेच भाजपच्या खासदारांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये रेशन वितरण करण्याची जी व्यवस्था केली होती, त्यासही ममता सरकारकडून अटकाव करण्यात आला, असे लक्षात आले आहे. कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून ज्या तुकड्या प. बंगालमध्ये पाठविण्यात आल्या होत्या, त्यांना योग सहकार्य केले गेले नाही. गेल्या आठवड्यात केंद्राची एक तुकडी कोलकाता येथे आली असता, ममता सरकारने आम्हाला न कळविता ती तुकडी आलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. शिष्टाचाराचे संकेत पायदळी तुडविण्यात आले, असा आरोप ममता सरकारकडून करण्यात आला.
 
ममता बॅनर्जी यांचे सरकार, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात या महामारीचे संकट नसल्याचे म्हणत आहे. असे असताना मग अनेक भाग ‘हॉटस्पॉट’ आणि ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून का घोषित करण्यात येत आहेत, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. बंगालमध्ये कोरोनाच्या कमी केसेस असताना, अनेक क्षेत्रे ‘धोकादायक’ म्हणून का घोषित करण्यात आली, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी विचारला आहे. तसेच रुग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या मृत्यूच्या दाखल्यात वेगळेच कारण का दाखविले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात ममता सरकार लपवाछपवी करीत असल्याचा संशय त्यांनी असा आरोप करून व्यक्त केला आहे. एकूणच, कोरोनासारख्या संकटाचा राजकारण बाजूला ठेवून सामना करायला हवा, हे सदैव राजकारणात बुडालेल्या आणि भाजपद्वेषाने पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांच्या कधी लक्षात येणार?
 
साधूंच्या हत्येच्या निमित्ताने...


महाराष्ट्रात पालघर परिसरात दोन साधूंची जी अमानुष हत्या घडली, त्या घटनेवरून प. बंगालमध्ये अशीच एक भीषण घटना घडली होती. त्याचे स्मरण करून द्यावेसे वाटते. हे हत्याकांड झाले तो महिनाही एप्रिल होता. ३० एप्रिल, १९८२ या दिवशी कोलकात्यामधील बिजन सेतू या परिसरात १७ साधूंना त्यांच्या वाहनांमधून खेचून बाहेर काढण्यात आले. मार्क्सवादी गुंडांनी त्यांना अमानुष मारहाण केली. नंतर त्या साधून जाळून टाकण्यात आले. हे सर्व साधू ‘आनंद मार्ग’ या संघटनेशी संबंधित होते. पण, या घटनेसंदर्भात आवाज उठविण्याचे साहस जनतेने केले नाही. कारण, त्यावेळी प. बंगालमध्ये मार्क्सवाद्यांची जबरदस्त दहशत होती. त्या हत्याकांडाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया संतापजनक होती. “काय करू शकणार होतो? अशा गोष्टी घडतच असतात,” असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यांची ही प्रतिक्रिया लक्षात घेता त्या कृत्यास सरकारचा छुपा आशीर्वाद तर नव्हता ना, अशी शंका कोणास यावी! या घटनेच्या आधी १९६७ मध्ये पुरुलिया भागात आनंद मार्गाच्या पाच साधूंची हत्या झाली होती. आपल्या विरोधकांवर रक्तरंजित हल्ले करून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे डाव्यांचे असे प्रयत्न देशाच्या विविध भागांमध्ये सुरू आहेत. केरळमध्ये तर अशी असंख्य उदाहरणे दिसून येतील. पण, असल्या दहशतवादी प्रकारांना कोणी भीक घालीत नाही, हेही या डाव्या शक्तींना अनेकदा दाखवून देण्यात आले आहे. पालघरमध्ये साधूंची जी हत्या झाली, त्या पार्श्वभूमीवर कोलकात्यामध्ये घडलेल्या एक भीषण घटनेचे स्मरण वाचकांना करून द्यावेसे वाटले. डाव्या शक्ती कशा वागत आल्या आहेत, ते यानिमित्ताने वाचकांच्या लक्षात आले असेलच!

 
@@AUTHORINFO_V1@@