कोरोनाच्या लढाईत जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन

26 Apr 2020 13:46:17
man ki bat _1  
 
 
 


नवी दिल्ली : कोरोनामुळे अवघ्या जगभरातील व्यवहार ठप्प आहेत. देशातही कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाउन लागू केला. लॉकडाउनच्या काळात सर्वच यंत्रणा युद्ध पातळीवर लढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून याच पार्श्वभूमीवर देशवासीयांशी संवाद साधला. भारतीय जनता देत असलेल्या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलाम केला. “संकटाच्या काळात भारताने जगाला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवले आहे. जगभरातील देश भारतवासीयांचे आभार मानत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना जग आपली दखल घेत असल्याचेही ते म्हणाले.
 
 
 
 
मोदी म्हणाले,”संपूर्ण जग करोनाविरोधात एकवटले आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेने याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल. लॉकडाउनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीनं लढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. कोरोनाच्या काळात सगळेच झोकून देऊन काम करत आहेत. त्यामुळेच स्वच्छता ठेवणाऱ्यांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. कुणी घरभाडे माफ करतोय, कुणी किराणा देतोय. शेतकरी शेतात रात्रंदिवस मेहनत करून देशात कुणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेत आहे.कुणी पेन्शन देतेय, कुणी शेकडो गरिबांना मोफत जेवण देत आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुमच्या मनात असलेला भाव या लढाईला बळ देत आहे. स्वच्छ भारत अभियानापासून ते गॅस सबसिडी सोडण्यापर्यंत तुमच्या ही भावना दिसून आली. देशवासीयांच्या या भावनेला मी नमन करतो,” असे म्हणत त्यांनी १३० कोटी देशवासीयांचे आभार मानले.
 
 
 

दो गज दुरी, बहोत है जरुरी’- पंतप्रधान नरेंद्र मोदी
 

कोरोनापासून दूर राहण्यासाठी दो गज दुरी, बहोत है जरुरी या मंत्राचा अवलंब यापुढील काळातही करायचा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी मन बात द्वारे देशवासियांशी संवाद साधताना केले. कोरोनाविरोधातील लढ्यात सरकारला देशातील नागरिकांचे सर्वतोपरी सहकार्य लाभते आहे. संकटाच्या काळात लोक एकमेकांची ज्या पद्धतीने मदत करीत आहे, ते अतिशय अभिमानास्पद आहे. कोरोनाविरोधातील लढा हा खऱ्या अर्थाने जनतेचा लढा असून प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे. गरिबांची मदत असो, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था असो, रुग्णालयांची व्यवस्था असो, वैद्यकीय उपकरणांची देशातच निर्मिती करायची असो अशा प्रत्येत गोष्टीसाठी देशातील नागरिक सहभाग नोंदवित आहेत. भविष्यात जेव्हा कोरोनाविरोधातील लढ्याची जगभरात चर्चा होईल, तेव्हा भारतीय नागरिकांनी दाखविलेल्या असामान्य धैर्याचा विशेष उल्लेख केला जाईल. मात्र, अद्यापही देशातील नागरिकांनी दो गज दुरी, बहोत है जरूरी या मंत्राचे पालन यापुढेही करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
 
टाळी – थाळी वाजविणे असो किंवा विजदिवे मालवून दिवे लावणे असो अशा सर्व उपक्रमांमध्ये जनतेने सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे देशात एखादा महायज्ञ सुरू असल्यासारखे भासत आहे असून देशातील नागरिकांमध्ये लढाईत विजय मिळविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असतानाही देशवासियांना अन्नधान्याची कमतरता भासू नये, म्हणून शेतकरी शेतात काम करीत आहेत, कोणी घरभाडे माफ करीत आहे, कोणी निवृत्तीवेतन अथवा पुरस्कारामध्ये मिळालेली रक्कम कोरोना फंडात दान देत आहे. कोणी भाजीपाला वाटत आहे, तर कोणी गरिबांच्या अन्नपाण्याची सोय करीत आहे. देशातील १३० कोटी जनता आपापल्या परिने या लढाईत आपला सहभाग नोंदवित असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
 
कोरोनावॉरियर्स प्लॅटफॉर्मविषयी बोलताना मोदी म्हणाले की, यामध्ये सव्वा कोटी लोक जोडले गेले आहेतय त्यामध्ये डॉक्टर, आशा कार्यकर्त्या, परिचारिका आदी सर्व जोडले गेले आहेत. स्थानिक स्तरावरदेखील चांगल्या प्रकारचे काम होत आहे. त्याचप्रमाणे या संकटाने आपल्याला खूप काही शिकविले आहे. सर्वांत महत्वाचा धडा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली असून आता त्यादिशेने आपण काम सुरू केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी सर्व राज्य सरकारे कोरोनाविरोधात करीत असलेल्या कामाचेही कौतुक केले.




 
 
Powered By Sangraha 9.0