‘कोरोना’ आणि ‘डब्ल्यूएचओ’

    दिनांक  26-Apr-2020 21:33:27   
|
WHO_1  H x W: 0
 
दुसर्‍या जागतिक महायुद्धाची फलश्रुती म्हणजे ‘संयुक्त राष्ट्र संघटना’ असे म्हटले तर निश्चितच वावगे ठरणार नाही. याच राष्ट्र संघटनेचे महत्त्वाचे अंग म्हणून ‘जागतिक आरोग्य संघटना’ अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ची ओळख जगाला आहे. जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’चे महत्त्वदेखील आज जागतिक पटलावर अधोरेखित होत आहे.
 
 
जगातील जवळपास सर्वच देशांच्या आरोग्य यंत्रणेला ‘डब्ल्यूएचओ’ची मार्गदर्शक तत्त्वे ही कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी निर्णायक ठरली आहेत. संसर्गजन्य असणार्‍या या आजारापासून बचाव कसा करावा इथपासून ते आगामी काळात जगाचे कोरोनाबाबत भवितव्य काय असेल, याचा अंदाज बांधण्यापर्यंतच्या सर्वच बाबींसाठी ‘डब्ल्यूएचओ’ची भूमिका ही निश्चितच महत्त्वाची आहे.
 
 
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला असताना कोरोनामुळे होणारा खरा विनाश तर अजून सुरू व्हायचा असल्याचा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ने नुकताच दिला. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णतः टळलेले नसताना अनेक देश आपल्या येथील निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’कडून हा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या महासभेने एक प्रस्ताव मंजूर करत जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे जगात जवळपास पावणेदोन लाख लोकांचा बळी गेला आहे. पण, “आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून आपल्याला दिसायचा आहे,” असे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख ट्रेड्रोस अ‍ॅधानोम घेनेयेसेस नुकतेच म्हणाले आहे.
 
 
मात्र, यावेळी विनाशाचे स्वरूप नेमके कसे असेल याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. आगामी काळात कोरोना विषाणूचा प्रसार आफ्रिकेतून सुरू होणार असल्याची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट सुरू झाल्यानंतर आशिया व युरोपातील काही देशांकडून ‘लॉकडाऊन’चे नियम शिथील केले जात आहेत. मात्र, हे निर्बंध शिथील करणे म्हणजे कोणत्याही देशातील साथीच्या आजाराचा अंत नसून उलट असे केल्याने साथ पसरण्याचा धोका वृद्धिंगत होणार असल्याचेदेखील ‘डब्ल्यूएचओ’द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. ही वेळ निर्बंधामध्ये सवलत देण्याची नसून भविष्यात जीवन जगण्याच्या नवीन पद्धतीसाठी स्वतःला तयार ठेवण्याची आवश्यकता प्रतिपादित करणारी आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’चे म्हणणे आहे.
 
 
त्यातच ‘डब्ल्यूएचओ’तर्फे अशा प्रकारच्या भविष्यातील महामारीपासून जागतिक स्तरावरील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करता यावे यासाठी ‘कोविड-19’च्या प्रादुर्भावास अटकाव घालण्यासाठी काही ऑनलाईन अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी परिचारिकांसाठीदेखील हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या पूर्ततेतून संकटाशी लढण्याचे नवे बळ नक्कीच प्राप्त होण्यास मदत होणार आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या संकेतस्थळावरदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनानेही विद्यापीठातील घटकांना या अभ्यासक्रमांच्या पूर्ततेसाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. यानुसार आता विद्यापीठाच्या कुलसचिवांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालयांना केले आहे.
 
 
संकट काळात संकटमुक्तीची दिशा मिळणे हे महत्त्वाचे असते. तसेच संकटाची भीषणता अचूक पद्धतीने सांगणे व त्याचे भविष्यातील परिणामाबाबत अवगत करणे हे नेतृत्व म्हणून निश्चितच आवश्यक असते. कटू असणारे सत्य सांगतानाच उपाययोजना राबविण्याचे कार्य ‘डब्ल्यूएचओ’च्या माध्यमातून होत आहे. तसेच, भविष्यात अशी स्थिती उद्भवल्यास जगात या संकटाचा सामना करणारे ज्ञान असावे व त्याच बरोबर सध्याच्या घडीला नवीन प्रेरणा मिळावी, यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सारखी सुविधादेखील ‘डब्ल्यूएचओ’ उपलब्ध करून देत आहे, हे निश्चितच सकारात्मकतेचे प्रतीक आहे. महासत्तेला देखील आज कोरोनाचा विळखा बसला आहे. अशा वेळी विकसनशील आणि अविकसित राष्ट्रे यांच्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’चा इशारा आणि उचलण्यात आलेली पावले ही निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणारी आहेत. या धोरणात संघटनेचा निधी रोखणार्‍या अमेरिकेने या प्रस्तावामध्ये आडकाठी आणली नाही, यावरून देखील विकसित राष्ट्रांचा बदलणारा दृष्टिकोन जागतिक स्तरावरील कोरोनाची भीषणता दिसून येते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.