दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा रंगणार 'श्री कृष्णा'लीला!

25 Apr 2020 12:50:53
shri krishna_1  

‘रामायण’, ‘महाभारत’नंतर प्रेक्षकांची मागणी विचारात घेत दूरदर्शनची घोषणा



मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनवर जुन्या मालिका प्रसारित केल्या जात आहेत. ‘रामायण’, ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकांसह ‘शक्तीमान’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘चाणाक्य’ या मालिकांनी दूरदर्शनवर वर्णी लावली. जुन्या मालिका नव्याने भेटीला आल्याने प्रेक्षकांनीही उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्याने सर्व चॅनल्सला मागे टाकत टीआरपीच्या स्पर्धेत दूरदर्शन चॅनल अव्वल ठरले. आता अजून एक जूनी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायण, महाभारत नंतर आता ‘श्री कृष्णा’ ही पौराणिक लोकप्रिय मालिका दूरदर्शनवर पुनःप्रसारीत केली जाणार आहे.


रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका 'रामायण' संपल्यावर 'उत्तर रामायण' सुरु झाले आहे. त्यातच आता ‘श्री कृष्णा’ मालिका पुन्हा पाहायला मिळणार असल्याची घोषणा दूरदर्शनने केली आहे. यासाठी त्यांनी खास ट्विट केले आहे. श्री कृष्णा ही मालिका कधी, कोणत्या वेळेत पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. मात्र लवकरच ही मालिका भेटीला येईल इतकेच दूरदर्शनने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.


जुन्या मालिकांच्या प्रदर्शनाकरीता दूरदर्शनने 'डीडी रेट्रो' चॅनल सुरु केले आहे. तसंच लहान मुलांच्या आवडीचा 'छोटा भीम' ही मालिका देखील दूरदर्शनवर पाहयाला मिळत आहे. रामायण मालिका पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर मालिकेने लोकप्रियेतेचा उच्चांक गाठला. आता श्री कृष्णा मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0